आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएल-16 हंगामातील 8 वा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला असला तरी संघाच्या एका खेळाडूच्या धडाकेबाज सादरीकरणाने सर्वांचेच मन जिंकले. हा खेळाडू दुसरा कुणी नसून ध्रुव जुरेल आहे. ध्रुव राजस्थानचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला. ध्रुव मैदानात उतरला तेव्हा राजस्थान संघ सामन्यातून जवळपास बाहेर झाला होता. मात्र जुरेलने वेगवान धावा करत सामन्यात राजस्थानच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या. त्याने 15 चेंडूंत 200 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 32 धावा केल्या. जुरेलच्या या खेळीमुळे पंजाबच्या विजयाच्या आशा काही काळ धूसर झाल्या होत्या.
वडील कारगिल युद्धातील सैनिक
आयपीएलमध्ये पहिल्यांदा दिसलेल्या ध्रुवचे वडील नेम सिंह जुरेल सैन्यात आहेत. त्यांनी कारगिल युद्धही लढले आहे. विशेष म्हणजे ध्रुवला वडिलांप्रमाणेच सैन्यात जायची इच्छा होती. मात्र नंतर त्याने क्रिकेटमध्ये करियरची निवड केली. सैन्य शाळेत शिकताना ध्रुव जुरेल पोहणेही शिकला. यानंतर गली क्रिकेटमध्ये खेळताना त्याला क्रिकेटची आवड लागली.
ध्रुव जेव्हा 12 वर्षांचा होता तेव्हा त्याने क्रिकेट किटची मागणी कुटुंबीयांकडे केली होती. जर क्रिकेट किट मिळाली नाही तर घर सोडून जाण्याची धमकी त्याने दिली होती. तेव्हा त्याच्या आईने सोन्याची चेन विकून त्याला क्रिकेट किट आणून दिली होती. ध्रुवला आता यावर खूप पश्चाताप होतो.
वयाच्या 10 व्या वर्षांपासूनच क्रिकेट खेळायला सुरूवात करणारा ध्रुव भारताच्या अंडर-19 संघाचाही भाग राहिला आहे. 2020 मध्ये तो अंडर-19 संघाचा कर्णधार होता आणि भारताने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र अंतिम सामन्यात भारताला बांग्लादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पहिल्यांदाच संधी मिळाली
ध्रुवला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. 20 लाखांच्या बेस प्राइसवर राजस्थानने त्याला खरेदी केले होते. पंजाब किंग्ससाठीच्या या धमाकेदार खेळीनंतर त्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.