आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराIPL मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने हैदराबादचा सलामीवीर तिलक वर्माला 1.70 कोटी रुपयांना खरेदी केले. तिलक वर्मा याचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांना स्वतःचे घरही नाही. घरचा खर्चही मोठ्या कष्टाने भागतो, पण वडिलांनी आर्थिक परिस्थितीचा परिणाम तिलकच्या क्रिकेटपटू होण्याच्या स्वप्नावर झाला नाही. तिलक आणि त्यांच्या थोरल्या भावाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या इच्छांचाही त्याग केला. तिलक वर्मा 2020 च्या अंडर-19 विश्वचषक संघाचा देखील भाग आहे. आता तिलकला आयपीएलमध्ये मिळालेल्या रकमेतून घर खरेदी करून वडिलांना भेट देण्याची इच्छा आहे. दैनिक 'भास्कर'ने तिलक वर्मा याच्याशी त्याच्या कारकिर्दीतील आव्हाने आणि भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली.
प्रश्न: तुला मुंबई इंडियन्सने 1.70 कोटींना खरेदी केले, ही रक्कम कुठे खर्च करणार?
उत्तर: माझे वडील नंबुरी नागराजू इलेक्ट्रिशियन आहेत. आमचा घराचा खर्चही कसाबसा भागत होता. आम्ही दोघे भाऊ होतो. मोठ्या भावाला अभ्यासात करिअर करायचे होते, तर मला क्रिकेटर व्हायचे होते. आम्हा दोघांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वडिलांनी अनेक त्याग केले आहेत.
मला अजूनही आठवतंय की, मी माझ्या वडिलांना काही वस्तू खरेदी करायला सांगायचो तेव्हा ते नकार देत नसत, फक्त मला काही दिवसांचा वेळ दे असे म्हणायचे. मग वडील ते सामान आणायचे आणि काही दिवसांतच मला द्यायचे. यासाठी अनेकवेळा त्यांनी त्यांच्या जीवनावश्यक वस्तूही खरेदी केल्या नाहीत. मला आयपीएलमधून मिळालेल्या पैशातून माझ्या वडिलांसाठी आणि आईसाठी हैदराबादमध्ये घर घ्यायचे आहे.
प्रश्न: तुला ही रक्कम मिळण्याची अपेक्षा होती का? तु लिलाव पाहत होता का?
उत्तरः मला इतक्या रकमेची अपेक्षा नव्हती. मी माझे प्रशिक्षक सलाम बायश यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर लिलाव पाहत होतो. मी रणजी खेळण्यासाठी ओडिशाला गेलो होतो. जेव्हा माझे नाव लिलावासाठी आले आणि राजस्थान रॉयल्सने बोली लावली तेव्हा मला धक्का बसला. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनेही मला खरेदी करण्यात रस दाखवला.
मुंबई इंडियन्सने मला घ्यावे, अशी माझी इच्छा होती. मुंबईने शेवटची बोली लावून मला संघात सामील केल्यावर मला खूप आनंद झाला. त्यानंतर घरच्यांशी बोललो. ते सर्व खूप आनंदी होते. एवढी रक्कम मिळेल याची त्यांना खात्री नव्हती. माझे वडील भावूक झाले. ते काही बोलू शकले नाहीत.
प्रश्न: तुला मुंबई इंडियन्समध्ये का जायचे होते? मुंबईतील तुझे आवडते खेळाडू कोण आहेत?
उत्तर: आयपीएल सुरू झाल्यापासून मी मुंबई इंडियन्समध्ये सचिन सर आणि रोहित सरांना फॉलो करायचो. मला असे वाटायचे की, जेव्हा मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल तेव्हा मी मुंबईसाठीच खेळावे. मुंबई इंडियन्सने त्यांच्यासोबत मला सहभागी केले, माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. रोहित सर आणि सचिन सर दोघेही माझे आवडते आहेत. मी रोहित सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक आहे.
प्रश्न: रोहित-ईशान ही सलामीची जोडी मुंबई इंडियन्समध्ये आहे. तु इतर फलंदाजी क्रमाने फलंदाजीसाठी तयार आहात का?
उत्तरः मी मधल्या फळीतही फलंदाजीसाठी तयार आहे. हैदराबादसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मी मधल्या फळीत धावा केल्या आहेत. संघाच्या गरजेनुसार मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
प्रश्न: तु हैदराबादचा आहेस. हैदराबाद हा बॅडमिंटनचा बालेकिल्ला आहे. पीव्ही सिंधू, सायना नेहवालसारखे बॅडमिंटनपटू आहेत, मग क्रिकेटमध्ये का आलास?
उत्तर : मी लहान असताना टीव्हीवर क्रिकेट बघायचो. सचिन सरांचा चाहता होतो, रस्त्यावर खेळताना सचिन सरांची बॅटिंग स्टाईल कॉपी करायचो. 2007 मध्येच टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनींच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकला होता. देशात क्रिकेटचे वातावरण होते. माझीही आवड वाढली. रस्त्यावर चांगले खेळल्यानंतर इतर मुलांनी मला अकादमीत जाऊन खेळण्याची प्रेरणा दिली. मग मी प्रशिक्षणासाठी सलाम बायश सरांकडे जाऊ लागलो.
प्रश्न: तुला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
उत्तर : माझे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझ्याकडे स्वतःचे किटही नव्हते. प्रशिक्षक सर नेहमी मदत करायचे. इतर मुलांकडून बॅट, पॅड, हातमोजे घ्यायचे. चार वर्षांपूर्वी जेव्हा मी वरिष्ठ गटात रणजी खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी पहिल्यांदाच मॅच फीमधून माझ्यासाठी बॅट विकत घेतली.
प्रश्नः देशांतर्गत क्रिकेटनंतर टीम इंडियाला जाण्यासाठी आयपीएल हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तु ते कसे पाहतो?
उत्तरः मी गल्लीतील सामनेही खूप गांभीर्याने खेळतो. मी आयपीएलबाबत खूप गंभीर आहे. जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी संघाच्या विजयात सर्वतोपरी योगदान देईन, हे माझे लक्ष्य आहे. मी गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही करतो. मला माझ्या क्षमतेनुसार 100 टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करयचा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.