आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ॲनालिसिस:मुंबईकडे प्रत्येक खेळाडूचा पर्याय; प्लेइंग इलेव्हन स्पर्धेपूर्वी निश्चित!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच वेळचा आयपीएल विजेता संघ पुन्हा प्रबळ दावेदार

आयपीएलचा पाच वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स सत्रातील पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईच्या स्टेडियममध्ये बंगळुरूविरुद्ध खेळेल. मुंबईला स्पर्धेतील सर्वात संतुलित व मजबूत संघ म्हणता येईल. त्यांच्याकडे प्रत्येक खेळाडूला पर्याय आहे. क्रिस लिनसारख्या खेळाडूला गत सत्रात एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. मुंबईने आपला प्लेइंग इलेव्हन संघ निश्चित करून किताबाचा दावा केला.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मुंबई संघाची प्लेइंग इलेव्हनची नावेही निश्चित आहेत. कर्णधार रोहित शर्मा व क्विंटन डिकॉक जोडी डावाची सुरुवात करेल. रोहित यंदा युवा खेळाडू ईशान किशनसाठी सलामीची जागा सोडण्याची शक्यता आहे. असे घडल्यास रोहित नंबर चारवर फलंदाजीला येईल. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्यांच्याकडे केरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या व कृणाल पांड्यासारखे त्रिकूटदेखील आहे. सामन्यातील परिस्थितीनुसार त्याच्या क्रमात बदल केला जातो. त्याचबरोबर जिमी निशम, सौरव तिवारी, आदित्य तारे हेदेखील जबाबदारी सांभाळू शकतात.

वेगवान गोलंदाजांचा भडिमार; फिरकीची उणीव : जगातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह व बोल्टची जोडी त्यांच्याकडे आहे. बोल्ट नव्या चेंडूने आणि बुमराह डेथ ओव्हरमध्ये घातक ठरतो. त्याचबरोबर, अॅडम मिल्ने, कुल्टर-नाइल, मार्को जानसेनसारख्या विदेशी गोलंदाजांचा पर्याय आहे. फिरकीमध्ये राहुल चहर व जयंत यादव पूर्वीपासून संघात आहेत. अनुभवी पीयूष चावलाला खरेदी केले आहे. अनुभवी चावलाच्या चेंडूवर सर्वाधिक षटकार मारण्यात आले. जयंतला मोजक्या संधी मिळाल्या, तर अनुकूल रॉयने तीन सत्रात केवळ एक सामना खेळला.

हेझलवूडची आयपीएलमधून माघार
आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जाेश हेझलवुड यंदा १४ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. याची घोषणा त्याने गुरुवारी भारत दाैऱ्यावर निघण्यापूर्वी केली. ताे धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार हाेता. यापूर्वी मिशेल मार्शने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यातून आयपीएलमधून माघार घेणारा हेझलवूड हा आॅस्ट्रेलियन दुसरा क्रिकेटपटू ठरला.

कोहली-डिव्हिलियर्स चेन्नईत दाखल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली व प्रमुख फलंदाज एबी डिव्हिलियर्स चेन्नईत दाखल झाले. इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर विराट मुंबईतील आपल्या घरी परतला होता. दोन्ही खेळाडू आता ७ दिवस क्वॉरंटाइनमध्ये राहतील.

केकेआरचा नितीश राणा निगेटिव्ह
सत्र सुरू होण्यापूर्वीच कोलकाताचा फलंदाज नितीश राणा कोरोना पॉझिटिव्ह आढळला हाेता. सूत्रांनुसार, राणा गोव्यात सुटी घालवल्यानंतर संघात दाखल झाला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. बीसीसीआय व केकेआरकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता ताे पुन्हा टीमसाेबत सराव करताना दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...