आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 2023:5 स्वस्त खेळाडूंनी महागड्या खेळाडूंवर केली मात, 16.25 कोटींच्या बेन स्टोक्सवर 50 लाखांचा रहाणे पडला भारी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 16व्या हंगामाचा दुसरा हाफ सुरू झाला आहे. या हंगामासाठी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी लिलावात असे अनेक खेळाडू होते, ज्यांना महागात विकले गेले. पण, या हंगामात त्या खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे, तर अनेक खेळाडू असे आहेत की ज्यांनी आधारभूत किमतीवर संघात सामील होऊन आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

बेन स्टोक्स असो वा कॅमेरून ग्रीन, हॅरी ब्रूक असो वा सॅम करण आणि निकोलस पूरन असो, फ्रँचायझींनी आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केला. आतापर्यंत झालेल्या सामन्यांच्या आधारे असे म्हणता येईल की, यातील अनेक खेळाडूंची कामगिरी सरासरी होती तर काही पूर्णपणे फ्लॉप ठरले.

या बातमीत आपण अशा 10 क्रिकेटर्सची चर्चा करणार आहोत, जे लिलावात महागात विकले गेले, पण संघासाठी काही खास करू शकले नाहीत. यासोबतच आपण अशा खेळाडूंबद्दलही जाणून घेणार आहोत, जे स्वस्त असूनही चांगली कामगिरी करत आहेत.

या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू सॅम करणपासून सुरुवात करूया...

सॅम करण, पंजाब किंग्स (18.5 कोटी)
आयपीएल 2023 मध्ये सर्वात महाग विकल्या गेलेल्या सॅम करणची कामगिरी पंजाब किंग्जसाठी आतापर्यंत सरासरी आहे. पंजाब संघाने सॅमवर 18.5 कोटी रुपये खर्च केले होते. त्याने केवळ एका सामन्यात चांगली कामगिरी केली. चालू हंगामातील 31व्या सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. उर्वरित सामन्यांमध्ये त्याला संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावता आली नाही.
अशा स्थितीत पंजाबला करणकडून मोठ्या आशा आहेत. सॅमने या हंगामात 11 सामन्यात अर्धशतकाच्या जोरावर 196 धावा केल्या आहेत. यादरम्यान सॅमचा स्ट्राइक रेट 137.06 होता. त्याच्या नावावर सात विकेट्स आहेत. त्याने 9.55 इकॉनॉमीसह धावा दिल्या आहेत.

कॅमेरून ग्रीन, मुंबई इंडियन्स (17.5 कोटी)
आयपीएलमधील या ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू खेळाडूचा हा पहिलाच हंगाम आहे. ग्रीनला मुंबईने 17.50 कोटी रुपयांना विकत घेतले. आतापर्यंतच्या सामन्यात ग्रीनला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत विशेष कामगिरी करता आलेली नाही. त्याने आतापर्यंत 11 सामने खेळले असून या कालावधीत त्याने एकूण 274 धावा केल्या आहेत. ग्रीनची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 64 धावा आहे. त्याने 6 विकेट्सही घेतल्या आहेत. 41 धावांत 2 बळी ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

बेन स्टोक्स, चेन्नई सुपर किंग्ज (16.25 कोटी)
बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने IPL 2023 च्या लिलावात तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेले नाही. स्टोक्सने गुजरात टायटन्सविरुद्ध 7 आणि लखनऊविरुद्ध 8 धावा केल्या. लखनऊविरुद्ध गोलंदाजी करताना स्टोक्सने एका षटकात 18 धावा दिल्या होत्या. वृत्तानुसार तो जखमी झाला आहे.

निकोलस पूरन, लखनऊ सुपरजायंट्स (16 कोटी)

लखनऊ सुपरजायंट्सने वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरनवर 16 कोटी रुपये खर्च केले. त्याने खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 24.80 च्या सरासरीने 248 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 160.00 आहे. आरसीबीविरुद्ध त्याने 19 चेंडूत 62 धावांची तुफानी खेळी केली. या हंगामात त्याच्या बॅटमधून 246 धावा झाल्या आहेत. अशा स्थितीत त्याने लखनऊला आतापर्यंत निराश केले नाही, असे म्हणता येईल. संघाला त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

हॅरी ब्रूक, सनरायझर्स हैदराबाद (13.25 कोटी)
हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते, तो आतापर्यंत शांत आहे. हॅरीला आतापर्यंत संघासाठी फारसे योगदान देता आलेले नाही. हॅरीचा हा डेब्यू सीझन आहे. केकेआरविरुद्ध ब्रूकचे शतक वगळता त्याची कामगिरी निराशाजनक आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांमध्ये हॅरीने 121.64 स्ट्राइक रेटने केवळ 163 धावा केल्या आहेत. संघाने गेल्या सामन्यात ब्रुकला प्लेइंग-11 मध्येही ठेवले नव्हते. त्याची कामगिरी पाहून तो आतापर्यंत फ्लॉप ठरल्याचे बोलले जात आहे.

अनेक कमी किमतीच्या खेळाडूंनी केली उत्तम कामगिरी...

सुयश शर्मा, कोलकाता नाईट रायडर्स (20 लाख)
सुयश शर्मा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यांचे वय 19 वर्षे आहे. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. IPL 2023 च्या मिनी लिलावात KKR ने या भारतीय मिस्ट्री स्पिनरवर डाव लावला होता. संघाने त्याला 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले. याआधी सुयशने लिस्ट ए, फर्स्ट क्लास किंवा टी-20 सामना खेळला नव्हता. त्याने कोलकाताकडून आतापर्यंत 8 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 8.06 आहे. तर सुयशने अनेक सामन्यांमध्ये मॅचविनिंग इनिंग खेळली.

साई सुदर्शन, गुजरात टायटन्स (20 लाख)
या हंगामात दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी 21 वर्षीय साई सुदर्शनला संघात खेळण्याची संधी मिळाली. IPL 2023 मध्ये, गुजरातने साईला केवळ 20 लाखांच्या मूळ किमतीसाठी कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी साईने आयपीएलमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याने पाच सामन्यांत 145 धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने या हंगामातील पाच सामन्यांमध्ये 176 धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या हंगामातील 8व्या सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला साई सुदर्शन. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या 21 वर्षीय साईने 48 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या.

अजिंक्य रहाणे, चेन्नई सुपर किंग्ज (50 लाख)
या हंगामात अजिंक्य रहाणे वेगळ्याच फॉर्ममध्ये आहे. यंदाच्या आयपीएलमधील पॉवरप्लेमध्ये त्याने 222.22 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. या फलंदाजाचा सीएसकेने यंदा 50 लाख रुपयांच्या मूळ किमतीवर संघात समावेश केला होता. या हंगामात मुंबईविरुद्ध चेन्नई संकटात असताना रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. बंगळुरूविरुद्ध ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला, पण रहाणेने 20 चेंडूत 37 धावा केल्या. KKR विरुद्ध त्याने 29 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. रहाणे फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही कमाल करत आहे. सध्याच्या चालू हंगामात रहाणेने 9 सामन्यात 171.61 च्या स्ट्राइकवर 266 धावा केल्या आहेत ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

मयंक मार्कंडे, सनरायझर्स हैदराबाद (50 लाख)
IPL 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची कामगिरी आतापर्यंत काही खास नाही. पण, संघाची गोलंदाजीची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. मयंक सध्या एसआरएचसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. इकॉनॉमी रेटच्या बाबतीत, आयपीएल 2023 मधील त्याची कामगिरी पर्पल कॅपच्या दावेदारांपेक्षाही चांगली आहे. चालू हंगामात मयंक मार्कंडेने हैदराबादसाठी 8 सामने खेळले असून 11 विकेट्स घेऊन त्याने छाप पाडली आहे. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 7.31 होता. SRH ने मयंकला त्याच्या मूळ किंमत 50 लाखांना विकत घेतले. मयंकनेही अनेक सामन्यांमध्ये 30 धावा केल्या आहेत.

सिकंदर रझा, पंजाब किंग्ज (50 लाख)
झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. पंजाब किंग्जने त्याला लिलावात 50 लाख रुपयांना विकत घेतले. रझा चालू हंगामात पहिल्या तीन सामन्यांमध्ये फार काही करू शकला नाही आणि चौथ्या सामन्यातही खेळला नाही. 5व्या सामन्यात रझाला पुन्हा संधी मिळाली आणि त्याने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध (15 एप्रिल) संधी साधली आणि आपले पहिले आयपीएल अर्धशतक पूर्ण करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय रझाने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली.