आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचा दिल्लीवर 57 धावांनी विजय:बटलर-यशस्वीची अर्धशतके, चहल-बोल्टच्या 3-3 विकेट; दिल्लीचा हंगामातील तिसरा पराभव

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील शनिवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 57 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या राजस्थानच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 199 धावा करत दिल्लीसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने झुंजार 65 धावांची खेळी केली. मात्र संघाचे इतर फलंदाज चमकदार कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. दिल्लीकडून वॉर्नरनंतर ललित यादवने 38, तर रिले रुसोने 14 धावा केल्या.

राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर आर अश्विनने 2 आणि संदीप शर्माने 1 विकेट घेतली.

सामन्याचे टर्निंग पॉइंटस

 • जैस्वाल-बटलरची भागीदारी राजस्थानला ओपनर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने स्फोटक सुरुवात मिळवून दिली. दोघांनी 51 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली. यशस्वीने 60 तर बटलरने 79 धावा केल्या.
 • हेटमायरची खेळी राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरने 21 चेंडूंत नाबाद 39 धावांची खेळी करत संघाचा स्कोअर 200 च्या जवळ नेला. त्याने 4 षटकार व 1 चौकार ठोकला.
 • बोल्टने शून्यावर 2 विकेट घेतल्या ट्रेंट बोल्टने दिल्लीला पहिल्याच षटकात दोन झटके दिले. त्यामुळे दिल्लीला पॉवर प्लेमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 38 धावाच करता आल्या.

दिल्लीचा डाव

राजस्थानने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ आणि नंतर आलेला मनीष पांडे शून्यावरच बाद झाले. ट्रेंट बोल्टने त्यांची विकेट घेतली. यानंतर आलेला रिले रुसो अश्विनच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद झाला. त्याने 14 धावा केल्या. यानंतर वॉर्नरने ललित यादवसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र 13 व्या षटकात ट्रेंट बोल्टने ललित यादवला बोल्ड केले. तो 38 धावा करून बाद झाला. नंतर आलेला अक्षर पटेल 2 धावांवरच बाद झाला. त्याला संजू सॅमसनने चहलच्या गोलंदाजीवर स्टंपिंग केले. यानंतर रोवमन पॉवेल 2 धावा, अभिषेक पोरेल 7 धावा करून बाद झाले. तर 65 धावांची झुंजार खेळी करत कर्णधार डेव्हिड वॉर्नरही नंतर बाद झाला. तर शेवटच्या षटकात एन्रिक नॉर्त्याही शून्यावरच बाद झाला.

पाहा सामन्याचे लाइव्ह स्कोअरकार्ड

पॉवर प्लेमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांचे वर्चस्व

सामन्याच्या दुसऱ्या डावातील पॉवर प्लेवर राजस्थानच्या गोलंदाजांचे वर्चस्व दिसले. पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने ओपनर पृथ्वी शॉ आणि मनीष पांडेला बाद केले. त्यानंतर आर अश्विनने रिले रुसोला आऊट केले. 6 षटकांत दिल्लीला 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावाच करता आल्या.

अशा पडल्या दिल्लीच्या विकेट

 • पहिली: पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने पृथ्वी शॉला विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरी : पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ट्रेंड बोल्टने मनीष पांडेला पायचित केले.
 • तिसरीः सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अश्विनने रिले रुसोला यशस्वी जैस्वालच्या हाती झेलबाद केले.
 • चौथी: 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने ललित यादवला बोल्ड केले.
 • पाचवी : 15 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर युजवेंद्र चहलने अक्षर पटेलला संजू सॅमसनच्या हाती स्टंपिंग केले.
 • सहावीः 16 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनने रोवमन पॉवेलला हेटमायरच्या हाती झेलबाद केले.
 • सातवीः 19 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युजवेंद्र चहलने अभिषेक पोरेलला हेटमायरच्या हाती झेलबाद केले.
 • आठवीः 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने डेव्हिड वॉर्नरला पायचित केले.
 • नववीः 20 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संदीप शर्माने एन्रिक नॉर्त्याला बोल्ड केले.

राजस्थानचा डाव

तत्पूर्वी दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थानने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा करत दिल्लीसमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 79 धावा केल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वालने 60, तर शिमरॉन हेटमायरने 39 धावा केल्या.दिल्लीकडून मुकेश कुमारने 2, तर कुलदीप यादव आणि रोवमन पॉवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

राजस्थानचा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलरने स्फोटक सुरूवात मिळवून दिली. यशस्वीने पहिल्याच षटकात चौकारांची बरसात केली. मात्र 60 धावा केल्यानंतर यशस्वी जैस्वाल मुकेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. जैस्वालने बटलरसोबत 98 धावांची भागीदारी केली. यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसन शून्यावरच बाद झाला. कुलदीप यादवने त्याची विकेट घेतली. त्यानंतर रियान परागच्या रुपाने राजस्थानला तिसरा धक्का बसला. पॉवेलने त्याची विकेट घेतली. यानंतर मुकेश कुमारच्या चेंडूवर बटलर बाद झाला. त्याने 79 धावा केल्या.

जैस्वालचे 25 चेंडूंत अर्धशतक

राजस्थानचा ओपनर यशस्वी जायसवालने हंगामातील दुसरे अर्धशतक केले. त्याने 25 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. खलील अहमदच्या पहिल्या षटकातच 5 चौकार ठोकत त्याने संघाला स्फोटक सुरवात मिळवून दिली. त्याचे लीगमधील हे 5 वे अर्धशतक आहे. हंगामात दुसरे अर्धशतक करणारा तो दुसरा फलंदाज आहे. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडनेही दोन अर्धशतक केले आहेत.

ओपनर्सची स्फोटक सुरूवात

ओपनर्सनी राजस्थानला स्फोटक सुरूवात मिळवून दिली. दोघांनी 4 षटकांतच टीमची धावसंख्या 50 वर नेली. दोघांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या पॉवर प्लेमध्ये नाबाद 68 धावा झाल्या. जैस्वालने बटलरसोबत 51 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली.

अशा पडल्या राजस्थानच्या विकेट...

 • पहिली: नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुकेश कुमारने यशस्वी जैस्वालला कॉट अँड बोल्ड केले.
 • दुसरी : कुलदीप यादवने 10 व्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर संजू सॅमसनला एन्रिक नॉर्त्याच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः चौदाव्या षटकाच्या 5 व्या चेंडूवर रोवमन पॉवेलने रियान परागला बोल्ड केले.
 • चौथीः 19 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मुकेश कुमारने जोस बटलरला स्वतःच झेलबाद केले.

दोन्ही संघाचे प्लेइंग-11

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), रोवमन पॉवेल, रिले रुसो, मनीष पांडे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, ललित यादव, एनरिक नॉर्त्या, मुकेश कुमार, खलील अहमद.

प्रभावशाली खेळाडू: अमन हकीम खान, पृथ्वी शॉ, सरफराज खान, ईशांत शर्मा, प्रवीण दुबे.

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, ध्रुव जुरेल, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

प्रभावशाली खेळाडू : नवदीप सैनी, आकाश बिष्ट, एम अश्विन, केएम आसिफ, डोनावोन फेरेरिया.

दिल्ली पहिल्या विजयाच्या शोधात

या मोसमातील दिल्ली कॅपिटल्सचा हा तिसरा सामना असेल. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. ते चालू हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. पहिल्या सामन्यात दिल्लीचा लखनऊ सुपरजायंट्सने 50 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 गडी राखून पराभव केला होता.

राजस्थानविरुद्ध संघाचे 4 परदेशी खेळाडू डेव्हिड वॉर्नर, रोव्हमन पॉवेल, रिले रुसो आणि अॅनरिक नॉर्टया असू शकतात. याशिवाय अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि खलील अहमद हेही संघाला मजबूत करत आहेत. मिचेल मार्श त्याच्या लग्नासाठी ऑस्ट्रेलियाला गेला असून, तो जवळपास आठवडाभरानंतर पुन्हा संघात सामील होणार आहे. अशा स्थितीत तो आजचा सामना खेळणार नाही.

राजस्थानचा चालू हंगामातील तिसरा सामना

राजस्थान रॉयल्सचा चालू हंगामातील हा तिसरा सामना असेल. या संघाने एक सामना जिंकला असून एकात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. संघाने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात त्यांना पंजाब किंग्जविरुद्ध पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

दिल्लीविरुद्ध संघाचे चार परदेशी खेळाडू जो रूट, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट असू शकतात. याशिवाय कर्णधार संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन आणि यशस्वी जैस्वाल हे देखील संघ अधिक मजबूत करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोस बटलर दुखापतीमुळे जवळपास एक आठवडा कोणताही सामना खेळू शकणार नाही.