आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आयपीएल-16 च्या 8 व्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला 5 धावांनी मात दिली. पंजाबचा आयपीएलमधील राजस्थानवरील हा 11 वा विजय आहे. पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान पार करताना राजस्थानचा संघ 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला. कर्णधार शिखर धवनची 86 धावांची खेळी, प्रभसिमरनच्या 60 धावा आणि एलिसच्या 4 विकेट पंजाबच्या यशात महत्वाचे ठरले. तर राजस्थानच्या हेटमायरने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीने सामन्यातील रंगत वाढली. मात्र तो शेवटच्या षटकात धावबाद झाला आणि राजस्थानच्या बाजूने झुकणारा सामना पुन्हा पंजाबच्या बाजूने झुकला.
असा रंगला सामना
राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबने कर्णधार शिखर धवन आणि ओपनर प्रभसिमरनच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या राजस्थानला सुरुवातीलाच झटका बसला. त्यांचा ओपनर फलंदाज यशस्वी जैस्वाल 11 धावा करून आऊट झाला. अर्शदीपने त्याची विकेट घेतली. नंतर आर अश्विनलाही अर्शदीपने बाद केले. तर नंतर जोस बटलर 19 धावा करून एलिसच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर कर्णधार संजू सॅमसनने डाव सावरला. मात्र तो 42 धावा करून एलिसच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर एलिसने देवदत्त पडिक्कल आणि रियान परागचीही विकेट घेतली. एलिसने चार विकेट घेतल्या.
पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड
अशा पडल्या राजस्थानच्या विकेट
सॅमसनच्या 42 धावा
पॉवर प्लेमध्ये तीन विकेट पडल्यानंतर संजू सॅमसनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 चेंडूंत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. मात्र तो 19 वे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. एलिसने त्याची विकेट घेतली.
राजस्थानने पॉवर प्लेमध्ये गमावल्या 3 विकेट
198 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 57 धावांतच तीन विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वाल, जोस बटलर आणि आर अश्विन पव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार संजू सॅमसनने ओपनिंगमध्ये बदल करत अश्विन व जैस्वालला मैदानात पाठवले. अर्शदीपने जैस्वाल बाद करत राजस्थानला पहिला झटका दिला. त्यानंतर आलेला बटलरही लवकर आऊट झाला.
प्रभसिमरनची पहिली फिफ्टी, धवनचे 48 वे अर्धशतक
पंजाबचे ओपनर प्रभसिमरन व शिखर धवन दोघांनीही अर्धशतके केली. प्रभसिमरनने 34 चेंडूंत 60 धावा केल्या. हे त्याचे आयपीएलमधील पहिले अर्धशतक आहे. तर शिखर धवनने 56 चेंडूंत नाबाद 86 धावा केल्या. हे त्याचे 48 वे अर्धशतक आहे. जितेश शर्माने 27 धावा केल्या.
पंजाबचा डाव
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पंजाबने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या. राजस्थानसमोर विजयासाठी 198 धावांचे आव्हान असेल. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 86 धावा केल्या. तर प्रभसिमरनने 60 धावा केल्या. धवनने प्रभसिमरन आणि जितेश शर्मासह प्रत्येकी अर्धशतकी भागीदारी केली.
राजस्थानकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. अश्विन आणि चहलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अशा पडल्या राजस्थानच्या विकेट
धवन-प्रभसिमरनची अर्धशतकी भागीदारी
शिखर धवन व प्रभसिमरन या ओपनर जोडीने जोरदार सुरुवात मिळवून दिली. दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने जोरदार सुरुवात करत 14 षटकांत 141 धावा केल्या. प्रभसिमरनने कर्णधार शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. तो 60 धावा करून होल्डरच्या चेंडूवर बटलरच्या हाती झेलबाद झाला. तत्पूर्वी त्याने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले.
धवन-जितेशची दुसरी अर्धशतकी भागीदारी
प्रभसिमरनसह पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केल्यानंतर धवनने जितेश शर्मासह दुसऱ्या विकेटसाठी 30 चेंडूंत 60 धावांची भागीदारी केली. जितेश शर्मा 16 व्या षटकात चहलच्या चेंडूवर रियान परागच्या हाती झेलबाद झाला. त्याने 27 धावा केल्या.
धवनच्या शॉटवर राजपक्षे जखमी
डावाच्या 11 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भानुका राजपक्षे कर्णधार शिखर धवनच्या शॉटवर जखमी झाला. रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर धवनने स्ट्रेट शॉट मारला. हा शॉट इतका जोरदार होता की नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या राजपक्षेला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि त्याच्या हाताला बॉल लागला. बॉल लागल्यानंतर तो मैदानावरच बसला. खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला. नंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या जागेवर जितेश शर्मा खेळायला आला.
प्रभसिमरनने 28 चेंडूंत केले अर्धशतक
प्रभसिमरनने IPL मधील आपले पहिले अर्धशतक केले आहे. त्याने 28 चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले.
पॉवर प्लेमध्ये प्रभसिमरनची फटकेबाजी
पहिल्या डावात पंजाबच्या ओपनर्सनी संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. प्रभसिमरन सिंग आणि कर्णधार शिखर धवनने 6 षटकांत 63 धावा केल्या. प्रभसिमरनने पॉवर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत 45 धावा कुटल्या.
धवन-प्रभसिमरनची अर्धशतकी भागीदारी
पंजाब किग्सकडून ओपनिंगला आलेल्या कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरनने अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 58 चेंडूंत 90 धावांची भागीदारी केली.
दोन्ही संघाचे प्लेइंग-11...
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पड्डीकल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट खेळाडू : नवदीप सैनी, संदीप शर्मा, मुरुगन अश्विन, ध्रुव जुरेल.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, सॅम करन, शाहरुख खान, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट खेळाडू : ऋषी धवन, हरप्रीत भाटिया, अथर्व तायडे.
राजस्थानने हैदराबादला घरच्या मैदानावर हरवले
राजस्थान रॉयल्सने स्पर्धेला विजयाने सुरुवात केली. संघाने हैदराबादमध्ये घरच्या संघाचा 72 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी अर्धशतक केले होते. त्याचवेळी युजवेंद्र चहलने दुसऱ्या डावात 17 धावांत 4 बळी घेतले.
संघात पंजाबविरुद्ध 4 परदेशी खेळाडू बटलर, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट असू शकतात. याशिवाय रविचंद्रन अश्विन, यशस्वी आणि देवदत्त पदीकल हे देखील संघाला मजबूत करत आहेत.
क्लोज मॅचमध्ये पंजाबने बाजी मारली
पंजाब किंग्जनेही लीगमधील पहिला सामना जिंकला. या संघाने मोहालीत डीएलएस पद्धतीने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ धावांनी पराभव केला. 3 बळी घेणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. त्याचवेळी भानुका राजपक्षे, शिखर धवन आणि सॅम करन यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली.
कागिसो रबाडा राजस्थानविरुद्ध पंजाब संघात परतणार आहे. भानुका राजपक्षे, सिकंदर रझा आणि सॅम करन हे उर्वरित परदेशी खेळाडू संघात असू शकतात. याशिवाय धवन, अर्शदीप आणि राहुल चहर हेही संघाला ताकद देत आहेत.
अश्विन-बटलरने सुरु केले वैर
2019 पासून राजस्थान आणि पंजाबमधील वैर वाढू लागले. त्यानंतर जयपूरमध्ये रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबने पहिल्या डावात 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान 12व्या षटकापर्यंत सामना जिंकण्याच्या स्थितीत होता, मात्र 13व्या षटकात अश्विनने 69 धावांवर फलंदाजी करणाऱ्या बटलरला मांकडिंगवर बाद केले. या विकेटनंतर राजस्थानने हा सामना 14 धावांनी गमावला.
या सामन्यानंतर, 2020 मध्ये, राजस्थानच्या राहुल तेवतियाने पंजाबच्या शेल्डन कॉट्रेलच्या षटकात 5 षटकार मारून आपल्या संघाला 224 धावांचे लक्ष्य गाठून दिले होते. 2021 मध्ये, राजस्थानच्या कार्तिक त्यागीने पंजाबविरुद्ध शेवटच्या षटकात 4 धावांचा बचाव करून आपल्या संघाला 2 धावांनी विजय मिळवून दिला होता.
गेल्या काही वर्षांपासून राजस्थानच्या दोन फॉरवर्ड संघांमध्ये हेड-टू-हेड सामना होत आहे. अशा स्थितीत आज पुन्हा एकदा या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हेड टू हेड सामन्यांबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ 24 सामने खेळले आहेत. रॉयल्स 14 वेळा आणि किंग्स 10 वेळा जिंकले.
खेळपट्टीचा अहवाल
गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. येथे सरासरी 153 धावा आहेत आणि खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही मदत मिळते. तथापि, ऑक्टोबर 2022 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 458 धावा झाल्या होत्या. दोन्ही संघांच्या केवळ 6 विकेट पडू शकल्या. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ पाठलाग करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
हवामान स्थिती
गुवाहाटीमध्ये बुधवारी रात्रीचे तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पाऊस पडणार नाही. नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दव पडल्यामुळे चेंडू पकडणे कठीण होऊ शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.