आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल हंगामाचे कोरोना टाइमआऊट:आता या वर्षी आयपीएल कठीणच, डिसेंबरपर्यंत वेळच नाही

मुंबई( ‘भास्कर’साठी चंद्रेश नारायणन)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • २४ दिवस, २९ सामन्यांनंतर आयपीएल स्थगित, ३१ सामने शिल्लक

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलच्या थरारास २४ दिवस आणि २९ सामन्यांनंतर ब्रेक लागला आहे. बायोबबलमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लीगच्या १४व्या हंगामास स्थगिती देण्यात आली. लीगचे चेअरमन ब्रजेश पटेल म्हणाले, “अनिश्चित काळासाठी स्पर्धा स्थगित केली आहे. नवे स्थळ आता शोधू. या महिन्यात ही शक्यता कमीच आहे.’ सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक रिद्धिमान साहा व दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर हा निर्णय झाला. लीग सुरू झाल्यापासून ८ खेळाडू व काही कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. लीग पुन्हा सुरू होईल तेव्हा ३०व्या लढतीपासून पुढे चालेल. अजून ३१ सामने शिल्लक आहेत. यंदा कोरोनामुळे आयपीएलची व्ह्यूअरशिपही ३५%वर घसरली आहे.

स्थगित आयपीएल या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता या कारणांमुळे कमी...

  • जून महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाईल. (१८ ते २२ जून)
  • २१ जुलैपासून इंग्लंडच्या “द हंड्रेड’ स्पर्धेस प्रारंभ होईल. म्हणजे इंग्लिश खेळाडू व्यस्त.
  • ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान इंग्लंड-भारत यांच्यात ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबरदरम्यान पाच कसोटी सामने होणार आहेत. त्यामुळे नियोजन कठीण.
  • बीसीसीआयचा सप्टेंबरअखेर द. आफ्रिका, न्यूझीलंडविरुद्ध टी-२० लढतींचा विचार.
  • इंग्लंड संघ १४ व १५ ऑक्टोबरला पाकविरुद्ध टी-२० सामने खेळणार आहे.
  • १८ ऑक्टो. ते १५ नोव्हंेबर दरम्यान भारतात टी-२० वर्ल्डकप होत आहे. त्यापूर्वी कोणताही देश खेळाडूंना लीगमध्ये पाठवू शकणार नाही.

... संघाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरचे १६ दिवस व ऑक्टोबरचे १७ दिवस, म्हणजे एकूण ३३ दिवसाचा कालावधी दिसतो. या काळात यूएईमध्ये उर्वरित सामने घेण्यावर चर्चा सुरू आहे. दुसरीकडे देशातील कोरोना स्थिती पाहता टी-२० वर्ल्डकप यूएईमध्ये होणार हे निश्चित मानले जाते. आयपीएल झालीच तर यापूर्वी खेळाडूंना अनेक सामने खेळावे लागतील. कोणताही संघ खेळाडूंवर इतका भार देण्यास राजी होणार नाही.

  • टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर आयपीएल होणे कठीणच. कारण, डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेत टी-२० लीग आहे.
  • एप्रिल २०२२मध्ये सुरू होणाऱ्या आयपीएल-१५ मध्ये नवे संघ घेण्याची योजना आहे. ही स्पर्धा डिसेंबरपर्यंत लांबली तर पुढील हंगामात बदल करणे कठीण आहे.

जूनमध्ये यूएईत उर्वरित सामन्यांच्या आयोजनाची तयारी

जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड व भारत यांच्यात ५ कसोटी सामने होणार आहेत. इतर संघांना देखील सलग द्विपक्षीय मालिका खेळतील. त्यामुळे आयपीएलसाठी पुढील तारीख मिळणे कठीण दिसत आहे. अद्याप जुलैमध्ये भारतीय संघाची कुठलीही मालिका निश्चित नाही. मात्र, जुलैमध्ये इंग्लंडची नवीन स्पर्धा द हंड्रेडची सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्या काळात आयपीएलचे आयोजन शक्य नाही. उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले जाऊ शकते. त्यासाठी जवळपास एका महिन्याचा कालावधी हवा. मात्र, बीसीसीआय सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिका खेळवण्यावर विचार करत होती. सध्याची परिस्थिती पाहता, टी-२० विश्वचषकाचे आयोजन देखील यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे. टी-२० विश्वचषकानंतर आयपीएल होणे कठीण आहे. कारण, त्याचदरम्यान ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत टी-२० लीगला सुरुवात होईल.

अव्वल-४ संघांची आतापर्यंतची कामगिरी

दिल्ली कॅपिटल्स -
दिल्लीला अव्वलस्थानी पोहोचवण्याचे श्रेय शिखर धवन-पृथ्वी शॉ यांच्या सलामी जोडीला जाते. नवा कर्णधार ऋषभ पंतने अय्यरची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. रबाडा व वोक्ससह मिश्रा, अश्विन व अक्षरने सर्वांना अडचणीत आणले.

चेन्नई सुपरकिंग्ज
यंदा चेन्नई यंदाच्या सत्रात शानदार लयीत आहे. डु प्लेिसस व ऋतुराज गायकवाडने चांगली सुरुवात करून देत आहेत. जडेजाने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात कमाल केली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कोहलीच्या संघाने जबरदस्त कामगिरीने केली. जेमिसन व सिराजमुळे संघाची गोलंदाजी एकदम बदलून गेली. मॅक्सवेलने मधल्या फळीत डिव्हिलियर्सचा चांगली साथ दिली. त्यामुळे विराट वरील दबाव कमी झाला. मात्र, यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदरने आतापर्यंत निराशा केली.

मुंबई इंडियन्स
गत विजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघात सातत्याचा अभाव दिसला. त्याचे सर्वात मोठे कारण चेन्नईतील संथ खेळपट्टी ठरली. रोहितने सलामीला काही चांगल्या खेळी केल्या. मात्र,सूर्या, ईशान, कृणाल, हार्दिक व पोलार्डची बॅट शांत राहिली.

युवा खेळाडूंना सर्वाधिक धक्का
युवा खेळाडूंसाठी सर्वात मोठा धक्का आहे. खेळाडू चांगली कामगिरी करत भारतीय संघात प्रवेश मिळवण्याच्या जवळ होते. निवड समिती आयपीएलमधील कामगिरीला महत्त्व देते.

हर्षल पटेल :१७ बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. त्याने संथ गतीच्या चेंडूवर फलंदाजांना अडचणीत आणले होते. तो मुंबई विरुद्ध ५ बळी घेणारा पहिला गोलंदाज बनला.

आवेश खान : दिल्लीच्या गाेलंदाजाने कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तो १४० किमी प्रति तासाच्या गतीने सलग यॉर्कर टाकू शकतो. तो टी-२० विश्वचषकासाठी दावेदार ठरू शकत होता.

चेतन साकरिया : भारतीय संघात दीर्घ काळपासून डावखुऱ्या स्विंग गोलंदाजाची उणीव आहे. साकरिया चेंडूला दोन्ही बाजूने स्विंग करू शकतो. मात्र, त्याला संधी मिळाली नाही.

पृथ्वी शॉ : भारतीय संघातून बाहेर झालेला पृथ्वी फाॅर्मात अाला. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटने जोरदार धावांचा पाऊस पाडला. त्याने १६६ च्या स्ट्राइक रेटने ३०८ धावा काढल्या आहेत.

वरुण चक्रवर्ती : इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय फिरकीपटू महागडे ठरले. मिस्ट्री स्पिनर वरुणला गत वर्षी शानदार कामगिरीमुळे संघात स्थान मिळाले होते. पुन्हा त्याच्याकडे दावेदारीची संधी होती.

देवदत्त पडिक्कल : बंगळुरूच्या पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफीत शानदार फलंदाजी केल्यानंतर आता स्पर्धेत शतक ठोकले. त्याला भारतीय संघात स्थान मिळाले असते. मात्र, स्पर्धा रद्दने गुणवत्तेची संधी हुकली.

ललित यादव : दिल्लीच्या ललितने अष्टपैलू कामगिरी केली. १०+ षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याची इकॉनॉमी सर्वात चांगली राहिली. त्याने नाबाद २२ धावा काढल्या.

संजू सॅमसन : संजू २७७ धावांसह पाचवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जाते. गत तीन डावांत त्याने ४०+ धावा काढल्या.

विदेशी खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्याचे आव्हान :
ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे खेळाडूंना परत जाणे कठीण बनले आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल यांनी म्हटले की, आम्हाला खेळाडूंना घरी पोहोचवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पर्याय शोधतोय. प्रवास बंदीनंतर बीसीसीआयने खेळाडूंना सुरक्षित घरी पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अाता हा माेठा पेच निर्माण झाला अाहे. दुसरीकडे अाॅस्ट्रेलियात कडक नियमावली जाहीर करण्यात अाली.

बायाे-बबलमध्येही खेळाडू कोरोनाबाधित होत असल्याने १४ व्या सत्रातील २९ सामन्यांनंतर आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली. सोमवारी कोलकाताचा वरुण चक्रवर्ती व संदीप वाॅरियर कोरोना पॉझिटिव्ह झाले. मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा आणि दिल्लीचा अमित मिश्रा देखील बाधित झाले. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पर्धा स्थगित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. काेराेनाने अाता अायपीएलचाही बळी घेतला. त्यामुळे बीसीसीअायला २२०० काेटींचा फटका बसला अाहे.

‘सध्या आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. आम्ही संघ, ब्रॉडकास्टर व त्यात सहभागी सर्वांशी चर्चा केली. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी खेळाडूंचे आराेग्य सर्वात महत्त्वाचे आहे. आम्ही लवकरच भेटून या स्पर्धेचा समारोप करण्याचे निश्चित करू. आता स्पर्धेसाठी पुढील तारीख कधी मिळते, अशी प्रतिक्रीया राजीव शुक्ला यांनी दिली. दरम्यान युएईत उर्वरित सामने अायाेजनावर चर्चा सुरू अाहे. मात्र, याचे अायाेजन हे बीसीसीअायसाठी अाव्हानात्मक असल्याचे चित्र अाहे.

बातम्या आणखी आहेत...