आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापराभवाच्या गर्तेत सापडलेला गत चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ यंदा १५ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी चेन्नई संघाला मंगळवारी आपल्या पाचव्या सामन्यात फाफ डुप्लेसिसच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे तगडे आव्हान असेल. अद्याप किताब जिंकण्यात अपयशी ठरलेल्या बंगळुरू संघाने यंदाच्या सत्रात आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे रवींद्र जडेजाच्या नव्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाला अद्याप विजयाची चव चाखता आली नाही. टीमने आतापर्यंत सलग चार सामन्यांत पराभवाची धूळ चाखली आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेन्नईने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. जडेजाच्या नव्या नेतृत्वात चेन्नईला अद्याप विजयाची नोंद करता आली नाही.दुसरीकडे कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर डुप्लेसिसच्या नेतृत्वात बंगळुरू संघाची यंदाच्या सत्रातील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे.
कागदावर चेन्नई किंग; मैदानावर यंदा बंगळुरू संघ फॉर्मात :
चेन्नई आतापर्यंतच्या आयपीएल रेकॉर्डमध्ये बंगळुरू टीमविरुद्ध किंग ठरला आहे. टीमने २९ पैकी १९ सामन्यांत बंगळुरूला धूळ चारली. मात्र, यंदाच्या सत्रामध्ये बंगळुरू संघ वरचढ मानला जात आहे. बंगळुरूने चारपैकी ३ सामन्यांत विजयी पताका फडकावली आहे. हीच विजयी मोहीम कायम ठेवण्याच्या इराद्याने बंगळुरू मैदानावर उतरणार आहे.
आता राजवर्धनला मिळणार पदार्पणाची संधी
सलगच्या पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कर्णधार रवींद्र जडेजाने आता संघात काहीसा बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यातून विश्वविजेत्या संघाचा युवा शिलेदार राजवर्धन हंगरगेकरला संधी मिळण्याचे चित्र आहे. चेन्नई टीमला सलग चार सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता जडेजाला संघात काहीसा बदल करण्याची गरज आहे. यातून राजवर्धनला मंगळवारी आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल. महाराष्ट्राच्या या युवा गोलंदाजाची आयसीसीच्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी काैतुकास्पद ठरली.
बंगळुरूचा अनुज फॉर्मात : तीन सामने जिंकणारा बंगळुरू टीमचा युवा फलंदाज अनुज रावत सध्या फॉर्मात आहे. त्याने पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध झंझावाती अर्धशतकी खेळी केली. त्याने संघाच्या विजयात ६६ धावांचे याेगदान दिले. तसेच या सामन्यात कोहलीने ४८ धावा काढल्या होत्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.