आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्याचा पंजाबवर 5 गड्यांनी विजय:रिंकूची पुन्हा मॅचविनर खेळी, रसेलच्या तडाखेबंद 42 धावा, चहरच्या 2 विकेट

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 53 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 5 गड्यांनी विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा करत कोलकाताला विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले. कोलकाताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकांत हे आव्हान पूर्ण केले.

नितीश राणाचे अर्धशतक

कोलकात्याकडून नितीश राणाने सर्वाधिक 51 धावा करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. आंद्रे रसेलने तडाखेबंद 42 आणि रिंकू सिंहने मॅच विनिंग 21 धावा करत विजयाचा कळस चढवला. याशिवाय जेसन रॉयने 38 आणि रहमानुल्लाह गुरबाजने 15 धावांचे योगदान दिले. पंजाबकडून राहुल चहरने 2, तर नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

कोलकाताचा डाव

याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवातही खराबा झाली. त्यांचा ओपनर रहमानुल्लाह गुरबाज पाचव्या षटकात 15 धावांवर बाद झाला. नॅथन एलिसने त्याची विकेट घेतली. त्यानंतर आठव्या षटकात जेसन रॉय 38 धावांवर बाद झाला. हरप्रीत ब्रारने त्याची विकेट घेतली. यानंतर नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यरने डाव पुढे नेला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. चौदाव्या षटकात अय्यरला 11 धावांवर बाद करत राहुल चहरने ही जोडी फोडली. चहरने नंतर सोळाव्या षटकात नितीश राणालाही 51 धावांवर बाद केले. त्यानंतर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंहने 54 धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. संघाला विजयासाठी 2 धावांची गरज असतान रसेल धावबाद झाला. यानंतर शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार खेचत रिंकून संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

अशा पडल्या कोलकाताच्या विकेट

 • पहिलीः पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॅथन एलिसने रहमानुल्लाह गुरबाजला पायचित केले.
 • दुसरीः आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हरप्रीत ब्रारने जेसन रॉयला शाहरुख खानच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः चौदाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राहुल चहरने व्यंकटेश अय्यरला लियाम लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले.
 • चौथीः सोळाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राहुल चहरने नितीश राणाला लियाम लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले.
 • पाचवीः विसाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने आंद्रे रसेलला धावबाद केले.

शिखरचे अर्धशतक

पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक 57 धावा केल्या. त्यानंतर जितेश शर्मा आणि शाहरुख खानने प्रत्येकी 21, ऋषी धवनने 19, हरप्रीत ब्रारने 17, लियाम लिव्हिंगस्टोनने 15, तर प्रभसिमरन सिंगने 12 धावा केल्या. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 3, हर्षित राणाने2, तर सुयश शर्मा आणि नितीश राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

पंजाबचा डाव

प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर प्रभसिमरन सिंग दुसऱ्याच षटकात 12 धावांवर बाद झाला. हर्षित राणाने त्याची विकेट घेतली. राणाने नंतर चौथ्या षटकात भानुका राजपक्षेलाही शून्यावर बाद केले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि आणि शिखर धवनने डाव पुढे नेला. मात्र सहाव्या षटकात लिव्हिंगस्टोनला 15 धावांवर बाद करत वरुण चक्रवर्तीने ही जोडी फोडली. त्यानंतर धवन आणि जितेश शर्माने डाव पुढे नेत चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. तेराव्या षटकात जितेश शर्माला 21 धावांवर बाद करत वरूण चक्रवर्तीने ही जोडी फोडली. त्यानंतर पंधराव्या षटकात नितीश राणाने शिखर धवनला 57 धावांवर बाद केले. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने सतराव्या षटकात ऋषी धवनला 19 धावांवर बाद केले. तर अठराव्या षटकात सुयश शर्माने सॅम करनला 4 धावांवर बाद केले. शाहरुख खान आणि हरप्रीत ब्रारने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाची धावसंख्या 179 वर नेली.

अशा पडल्या पंजाबच्या विकेट

 • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षित राणाने प्रभसिमरन सिंगला रहमानुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद केले.
 • दुसरीः चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हर्षित राणाने भानुका राजपक्षेला रहमानुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद केले.
 • तिसरीः सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने लियाम लिव्हिंगस्टोनला पायचित केले.
 • चौथीः तेराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने जितेश शर्माला रहमानुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद केले.
 • पाचवीः पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नितीश राणाने शिखर धवनला वैभव अरोराच्या हाती झेलबाद केले.
 • सहावीः सतराव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने ऋषी धवनला बोल्ड केले.
 • सातवीः अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुयश शर्माने सॅम करनला रहमानुल्लाह गुरबाजच्या हाती झेलबाद केले.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11...

कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, रहमानुल्लाह गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, रिंकू सिंह, वैभव अरोरा, शार्दूल ठाकूर, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेयर्स : सुयश शर्मा, मनदीप सिंह, अनुकूल रॉय, टिम साउदी आणि कुलवंत खेजरोलिया.

पंजाब किंग्स : शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंह आणि प्रभसिमरन सिंह.

इम्पॅक्ट प्लेयर्स : नॅथन एलिस, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, कगिसो रबाडा, ऋषि धवन.

कोलकाताने 10 पैकी फक्त 4 सामने जिंकले
कोलकाताने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये 4 विजय आणि 6 पराभव पत्करले आहेत. संघाचे केवळ आठ गुण आहेत. जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज, आंद्रे रसेल आणि सुनील नरेन हे पंजाबविरुद्ध संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.

पंजाबने 10 पैकी 5 सामने जिंकले
पंजाबने या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले आणि 5 गमावले आहेत. संघाचे 10 गुण आहेत. सॅम करन, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन आणि कागिसो रबाडा हे कोलकाताविरुद्धच्या संघाचे 4 विदेशी खेळाडू असू शकतात. याशिवाय शिखर धवन, जितेश शर्मा आणि अर्शदीप सिंग हे खेळाडू दमदार खेळत आहेत.

कोलकाता पंजाबवर भारी
कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे पंजाबला अद्याप यश मिळालेले नाही. एकूणच हेड टू हेडबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ 31 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 20 वेळा तर पंजाबने 11 वेळा बाजी मारली आहे.