आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत हंगामात बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा अर्ध्यावरच थांबवावी लागली. यावेळी असे घडून यासाठी बीसीसीआय अतिशय काळजी घेत आहे. त्यामुळे मंडळ स्पर्धा आयोजनातील सर्व निर्णय एकटेच घेत आहे. या प्रक्रियेत बीसीसीआयने राज्य संघटनांना सहभागी करून घेतले नाही. आयपीएल २६ मार्चपासून सुरू होत आहे. १५ व्या हंगामातील साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. प्लेऑफ सामने अहमदाबादेतील मैदानावर रंगू शकतात. हे सर्व सामने गुजरात, मुंबई तसेच महाराष्ट्रात होणार आहेत. मात्र बीसीसीआयकडून या हंगामात एका सामन्यासाठी किती मोबदला मिळणार, याबाबत या तीनही शहर, राज्यांच्या क्रिकेट संघटना अनभिज्ञ आहेत. नुकताच बीसीसीआयच्या टीमने पुणे मैदानाचा दौरा केला. मात्र याची माहिती राज्य संघटनेला देण्यात आली नाही. राज्य संघटनांच्या मदतीतून एका हंगामात कोट्यवधी कमावणारी बीसीसीआय आपल्या या सवंगड्यांकडे कानडोळा करत असल्याचे चित्र आहे.
आयपीएल सुरू होण्यास केवळ ८ दिवस उरले आहेत, मात्र तीनही संघटनांना सामना आयोजनातील नियोजनाबाबत काहीच माहिती देण्यात आली नाही. बीसीसीआयची टीम येते व एकट्यानेच नियोजन करते असा हा सारा खेळ. कोणालाच सहभागी करून घेतले जात नाही. राज्य संघटनांसमोर सामन्याच्या आयोजनाशिवाय तिकीट, सुरक्षा, चाहते, व्यवस्थापन असे अनेक प्रश्न आहेत. मात्र बीसीसीआयकडून त्यांना एकाही गोष्टीची माहिती मिळत नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आयपीएल देशात होत आहे. बोर्डाने महाराष्ट्र व गुजरातमध्ये साखळी सामन्यांच्या आयोजनाची घोषणा केली. मात्र सामन्याच्या तारखा तसेच इतर गोष्टींबाबत बोर्डाने या तीनही राज्ये तसेच शहराच्या क्रिकेट संघटनांना विश्वासात घेतले नाही.
चाहत्यांच्या उपस्थितीबाबत अद्यापही निर्णय नाही
महाराष्ट्रात स्पर्धा आयोजनाला अजून तरी शासकीय स्तरावर परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान, सरकारने आयपीएलदरम्यान ३० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला होकार दिला होता. मात्र त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याबाबत काहीच लिखित आदेश प्राप्त नाही. दुसरीकडे बीसीसीआयकडून प्रत्येक मैदानाला वेगवेगळे शुल्क प्रदान केले जाते. त्यात मैदानातील वातावरण, चाहत्यांची वाढती संख्या आदी गोष्टींचा विचार केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पंजाब, राजस्थानच्या मैदानांना मिळणाऱ्या मोबदल्यात प्रचंड तफावत असते. या सूत्राचा विचार केल्यास पुण्याच्या एक मैदानाला एका सामन्याचे ४०-५० लाख रुपये मिळतील. ही रक्कम मुंबई अथवा दुसऱ्या कोणत्याही मोठ्या मैदानाच्या तुलनेत १० टक्के कमी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.