आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईने पंजाबला 6 गड्यांनी हरवले:ईशान-सूर्याने रचला पाया, टिम डेव्हिड-तिलक वर्माने चढवला विजयाचा कळस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल-16 मधील 46 व्या सामन्यात मुंबई इंडियन्से पंजाब किंग्सला 6 गड्यांनी हरवले. मोहालीच्या आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात पंजाबने विजयासाठी दिलेले 215 धावांचे आव्हान मुंबईने 18.5 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

ईशान किशन, सूर्यकुमार यादवची अर्धशतके

मुंबईकडून ईशान किशनने सर्वाधिक 75 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने 66, तिलक वर्माने 26, कॅमेरून ग्रीनने 23, टिम डेव्हिडने 19 धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिसने 2, तर ऋषी धवन आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तत्पूर्वी मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

मुंबईचा डाव

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर रोहित शर्मा पहिल्या षटकात शून्यावर बाद झाला. ऋषी धवनने त्याची विकेट घेतली. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमेरून ग्रीनने संघाचा डाव सावरत दुसऱ्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात ग्रीनला 23 धावांवर बाद करत नॅथन एलिसने ही जोडी फोडली. नंतर ईशान आणि सूर्यकुमार यादवने तडाखेबंद फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला. दोघांनीही फटकेबाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केली. सोळाव्या षटकात सूर्यकुमारला 66 धावांवर बाद करत एलिसने ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात अर्शदीपने ईशानला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर टिम डेव्हिड आणि तिलक वर्माने शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. टिम डेव्हिडने 19 तर तिलक वर्माने 23 धावा केल्या.

पाहा सामन्याचा लाइव्ह स्कोअरकार्ड

अशा पडल्या मुंबईच्या विकेट

  • पहिलीः पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ऋषी धवनने रोहित शर्माला मॅथ्यू शॉर्टच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नॅथन एलिसने कॅमेरून ग्रीनला राहुल चहरच्या हाती झेलबाद केले.
  • तिसरीः सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नॅथन एलिसने सूर्यकुमार यादवला अर्शदीप सिंगच्या हाती झेलबाद केले.
  • चौथीः सतराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अर्शदीप सिंगने ईशान किशनला ऋषी धवनच्या हाती झेलबाद केले.

लिव्हिंगस्टोनचे तुफानी अर्धशतक

प्रथम फलंदाजी करत पंजाबने 20 षटकांत 3 गडी गमावून 214 धावा करत मुंबईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान दिले. पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 82 धावा केल्या. त्यानंतर जितेश शर्माने 49 , शिखर धवनने 30, मॅथ्यू शॉर्टने 27 धावा केल्या. मुंबईकडून पीयूष चावलाने 2, तर अर्शद खानने 1 विकेट घेतली.

पंजाबचा डाव

प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबची सुरूवात खराब झाली. त्यांचा ओपनर प्रभसिमरन सिंग दुसऱ्या षटकात 9 धावांवर बाद झाला. अर्शद खानने त्याची विकेट घेतली. यानंतर शिखर धवन आणि मॅथ्यू शॉर्टने डाव सावरत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकात शिखर धवनला 30 धावांवर बाद करत पीयूष चावलाने ही जोडी फोडली. त्यानंतर बाराव्या षटकात मॅथ्यू शॉर्टलाही पीयूष चावलाने 27 धावांवर बाद केले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्माने संघाचा डाव सावरत शेवटपर्यंत नाबाद राहत 119 धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोनने तुफानी 82 धावांची तर जितेश शर्माने 49 धावांची खेळी केली. दोघांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 3 गडी बाद 214 धावा केल्या.

अशा पडल्या पंजाबच्या विकेट

  • पहिलीः दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शद खानने प्रभसिमरन सिंगला ईशान किशनच्या हाती झेलबाद केले.
  • दुसरीः आठव्या षटकात पीयूष चावलाने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूवर ईशान किशनने शिखर धवनला स्टंप केले.
  • तिसरीः बाराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पीयूष चावलाने मॅथ्यू शॉर्टला बोल्ड केले.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11...

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग आणि प्रभसिमरन सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर्स : नॅथन एलिस, सिकंदर रझा, भानुका राजपक्षे, कगिसो रबाडा, ऋषी धवन.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार),टिम डेव्हिड, तिलक वर्मा, कॅमेरून ग्रीन, पीयूष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), कुमार कार्तिकेय, जोफ्रा आर्चर आणि आकाश मेधवाल.

इम्पॅक्ट प्लेयर्स : सूर्यकुमार यादव, ऋतिक शौकीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि अर्जुन तेंडुलकर.

पंजाबला गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी
पंजाब किंग्जला गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची संधी आहे. सध्या पंजाब 10 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यातील त्यांना 5 मध्ये विजय 4 मध्ये पराभव मिळाला आहे. यंदाच्या मोसमात मुंबईविरुद्धचा सामना पंजाबने 13 धावांनी जिंकला होता. पंजाबने चांगल्या रनरेटने विजय मिळवल्यास पहिल्या क्रमांकावर असलेल्या गुजरातच्या बरोबरीचे 12 गुण होतील.

मुंबई जिंकल्यास प्लेऑफची शर्यत सोपी
मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 4 सामन्यात विजय आणि 4 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईने शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध खेळला. यामध्ये त्यांना विजय मिळाला. मुंबई जिंकली तर 10 गुण होतील आणि पुढचा रस्ता थोडा सोपा होईल.

मुंबई आता हळूहळू फॉर्ममध्ये येत आहे. सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. त्याचबरोबर टीम डेव्हिडनेही शेवटच्या सामन्यात मुंबईला क्लासिकल फिनिशिंग मिळवून दिले, हे संघासाठी चांगले लक्षण आहे.

आतापर्यंत झालेल्या 30 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 15-15 असा विजय मिळवला
आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन संघांमधील आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्यांच्या आधारे जर आपण हेड-टू-हेडबद्दल बोललो, तर दोघांमध्ये एकूण 30 सामने झाले आहेत. यापैकी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाबनेही एकूण 15 सामने जिंकले आहेत.