आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. 2 एप्रिल रोजी भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2 एप्रिल 2011 रोजी भारताने मुंबईतील वानखेडे येथे श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक ट्रॉफी जिंकली. आता तब्बल 12 वर्षांनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षांनी मोठा निर्णय घेतला आहे.
12 वर्षांनंतर एमसीएचा निर्णय
धोनीने तेव्हा षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. आता एमसीए अध्यक्षांनी ज्या जागेवर चेंडू पडला त्या जागेला धोनीचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे म्हणाले की, नुवान कुलसेकराच्या चेंडूवर धोनीचा षटकार पडलेल्या स्टेडियममधील जागेला धोनीचे नाव देण्यात येईल. एमसीएने आज (सोमवार) स्टेडियमच्या आतील जागेला एमएस धोनीचे नाव देण्याचा निर्णय घेतला. 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध त्याने मारलेला सामना जिंकवून देणारा षटकार त्याच ठिकाणी पडला होता. आम्ही एमएस धोनीला उद्घाटनासाठी स्टेडियममध्ये येण्याची विनंती करू, जिथे त्याला स्मृतीचिन्हदेखील प्रदान केले जाईल, असेही ते म्हणाले.
वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावे स्टँड
वानखेडे स्टेडियमला यापूर्वीच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विजय मर्चंट यांसारख्या दिग्गजांची नावे देण्यात आली आहेत. पॉली उमरीगर आणि विनू मंकड यांच्या नावानेही द्वार आहेत. 2011 मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयाच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त धोनीने फायनलमधील काही किस्से देखील शेअर केले.
धोनीने वर्ल्ड कपच्या खास क्षणाबद्दल काय सांगितले?
धोनी म्हणाला - आम्हाला जास्त धावांची गरज नव्हती. आमच्या फलंदाजांनी चांगली आणि मजबूत भागीदारी केली. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी वंदे मातरम म्हणण्यास सुरुवात केली. मला असे वाटते की ते वातावरण पुन्हा तयार करणे खूप कठीण आहे. कदाचित यावर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषकातही असेच दृश्य असेल. त्यावेळचे वातावरण पुन्हा तयार होणे कठीण आहे, परंतु 2011 सारखीच संधी असेल तर ते होऊ शकते. तेव्हा 50 - 60 हजार लोक एकत्र गात होते.
धोनी म्हणाला- माझ्यासाठी विजयाचा क्षण सर्वात खास नव्हता, माझ्यासाठी खास क्षण सामना संपण्याच्या 15-20 मिनिटे आधी सुरू झाला होता, जेव्हा मी पूर्णपणे भावुक झालो होतो. मला तो सामना संपवायचा होता. त्या क्षणापासून आम्ही तो सामना जिंकू हे मला समजले होते. काम पूर्ण झाल्याचं समाधान वाटत होतं.
वर्ल्ड कप फायनलमध्ये काय घडलं?
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरच्या 97 धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 91 धावांच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 6 बाद 274 धावा केल्या. महेला जयवर्धने (103*) चे नाबाद शतक, कर्णधार कुमार संगकारा (48), नुवान कुलसेकरा (32) आणि थिसारा परेरा (22*) यांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेला चांगली धावसंख्या उभारता आली. युवराज सिंग आणि झहीर खानने प्रत्येकी दोन, तर हरभजन सिंगने एक विकेट घेतली.
275 धावांचा पाठलाग करताना भारताने सेहवाग (0) आणि तेंडुलकर (18) यांच्या विकेट लवकर गमावल्या. यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली (35) यांच्यातील 83 धावांच्या भागीदारीने भारताच्या संधी जिवंत ठेवल्या. गंभीरने 122 चेंडूत 97 धावा केल्या आणि कर्णधार एमएस धोनीसोबत चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. धोनी आणि युवराज (21*) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 54 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला 28 वर्षांतील पहिले विश्वचषक विजेतेपद मिळाले. धोनी 79 चेंडूंत 91 धावा करून नाबाद राहिला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.