आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलच्या १५ व्या सत्रातील १२ व्या लढतीत लखनऊ सुपर जायंट्सने स्लॉग षटकांत तुफानी खेळ करत हैदराबाद सनरायझर्सला १२ धावांनी पराभूत केले. हैदराबादला अखेरच्या ४ षटकांत ४१ धावांची गरज होती व त्यांचे ६ गडी शिल्लक होते. मात्र लखनऊच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत केवळ २८ धावा दिल्या आणि ५ गडी बाद केले.
नाणेफेक जिंकून हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ७ बाद १६९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद निर्धारित षटकात ९ बाद १५७ धावा करू शकला. यात राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ४४ व पूरनने ३४ धावा जोडल्या. लखनऊच्या आवेश खानने २४ धावांत ४ बळी घेतले. कृणाल पांड्याने २ व जेसन होल्डरने ३ गडी टिपले.
लोकेश राहुलच्या अष्टपैलू कामगिरीने विजय
लखनऊच्या विजयाचे श्रेय लोकेश राहुलच्या नेतृत्वाला जाते. प्रथम त्याने बॅटने जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले. त्याने टाय व जेसन होल्डरसारख्या अनुभवी खेळाडूंना १८ वे षटक न देता आपला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आवेश खानवर विश्वास दाखवला. आवेशने कर्णधाराला निराश न करता पूरनला बाद केले. त्यानंतर समदला भोपळाही फोडू दिला नाही.
लखनऊ पाचव्या स्थानी; हैदराबादचा दुसरा पराभव
पहिला सामना गमावल्यानंतर नवख्या लखनऊ सुपर जायंट्सने सलग दुसरा विजय मिळवला. दुसरीकडे, हैदराबादला अद्याप आपल्या विजयाचे खाते उघडता आले नाही. लखनऊ चार गुणांसह सध्या तालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला. लखनऊच्या आवेश खानने १८ व्या षटकात सलग २ बळी घेत संघाला विजय निश्चित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.