आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL 2021:दिल्ली कॅपिटल्स-राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज अव्वलस्थानासाठी झुंज रंगणार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगळुरू संघ पुन्हा एकदा नंबर वन हाेण्यासाठी सज्ज; गत पराभवाने झाली घसरण

आयपीलच्या यंदाच्या सत्रात कोहलीच्या नेतृत्वात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पुन्हा एकदा विजयी मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे गत सामन्यातील विजयाने आगेकूच करत असलेल्या ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाची नजर आता गुणतालिकेतील अव्वल स्थानावर लागली आहे. त्यामुळे हे अव्वल स्थान गाठण्यासाठी आज मंगळवारी अहमदाबादच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम झुंज देणार आहे. ऋषभ पंतच्या दिल्ली संघाने गत सामन्यात रविवारी सुपर आेव्हरमध्ये धडाकेबाज विजयाची नोंद केली. दिल्लीने या सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या हैदराबादला पराभूत केले. यासह टीमने गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे धोनीच्या सुपरकिंग्जने सलग विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कोहलीच्या बंगळुरू टीमच्या मोहिमेला ब्रेक लावला. त्यामुळे बंगळुरू टीमला सलग चार विजयांनंतर पाचव्या सामन्यात पराभवाची धूळ चाखावी लागली. मात्र, आता पुन्हा एकदा बाजी मारून विजयी मोहीम सुरू करण्यासाठी बंगळुरू टीमचा मानस आहे. यासाठी कोहलीच्या नेतृत्वात टीमने कसून सराव केला आहे. दिल्लीला पराभूत करून विजयाची नाेंद करण्याच्या इराद्यानेच बंगळुरूचे खेळाडू आज मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे अहमदाबादच्या मैदानावरील हा दोन्ही संघांतील सामना अधिकच अटीतटीचा हाेण्याचे चित्र आहे.

दिल्लीचा मजबूत दावा : ऋषभच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ सत्रात चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे टीमचा या सामन्यातील विजयाचा दावा मजबूत आहे. पृथ्वी शाॅ पुन्हा एकदा फाॅर्मात आला. त्याने तिसरे अर्धशतक साजरे केले. गोलंदाजीत आवेश खान चांगली कामगिरी करत आहे.

२०१८ पासून दिल्लीविरुद्ध बंगळुरूची विजयासाठी झुंज
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम यांच्यात आतापर्यंत २५ सामने झाले. यातील १४ सामन्यांत बंगळुरूने विजय संपादन केला, तर दिल्लीने १० सामने जिंकले. मात्र, बंगळुरूला २०१८ च्या सत्रानंतर दिल्ली संघाविरुद्ध सलग चार लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

काेहली, पडिक्कलवर मदार :
बंगळुरू टीमला पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आणण्याची माेठी जबाबदारी कर्णधार विराट काेहली आणि सलामीवीर युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलवर आहे. या दाेघांनी अभेद्य भागीदारीतून संघाला एकतर्फी विजय मिळवून दिलेला आहे. मात्र, चेन्नई संघाविरुद्ध सामन्यात काेहली सपशेल अपयशी ठरला. पडिक्कलने ३४ धावांची खेळी केली. मात्र, त्याचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला.

बातम्या आणखी आहेत...