आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ९ गड्यांनी जिंकली. यजमान संघाने ब्रिस्बेनच्या गाबामध्ये खेळवण्यात आलेली कसोटी चौथ्या दिवशी शनिवारी लंच टाइमपर्यंत आपल्या नावे केली. इंग्लंडचा ऑस्ट्रेलियात खेळलेल्या गत ११ कसोटीमध्ये दहावा पराभव ठरला आणि एक सामना बरोबरीत राहिला. या वर्षी इंग्लंडने आतापर्यंत १३ कसोटी खेळल्या आणि संघाने ७ सामने गमावले व ३ लढती जिंकल्या. सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी इंग्लंडने आपल्या तिसऱ्या दिवसाच्या २ बाद २२० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. धावसंख्येत ३ धावा जोडल्यानंतर मलानला (८२) नॅथन लायनने बाद केले. तो कसोटीत लायनचा ४०० वा बळी ठरला. तो अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा आणि एकूण १७ वा गोलंदाज ठरला.
कर्णधार रुट आपल्या धावसंख्येत ३ धावा जोडू शकला आणि ८९ धावांवर कॅमरुन ग्रीनने त्याला तंबूत पाठवले. यानंतरही नियमित अंतराने गडी बाद हाेत गेले. संघाचा दुसरा डाव २९७ धावांत आटोपला. नॅथनने ४ तर कमिन्स आणि ग्रीनने प्रत्येकी २ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने या सामन्यात ८ झेल घेतले. तो पदार्पणाच्या कसोटीत सर्वाधिक झेल घेणारा यष्टीरक्षक बनला. पहिल्या डावात २७८ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या २० धावांचे लक्ष्य मिळाले होते.
संथ गाेलंदाजीमुळे इंग्लंड टीमवर कारवाई; पाच गुणांची कपात
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये संथ गाेलंदाजी प्रकरणी इंग्लंडला ५ गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संघातील सर्व खेळाडूंचा १००% सामनानिधी कपात करण्यात आला. चॅम्पियनशिपमधील ५ सामन्यांत इंग्लंडला फक्त एक विजय मिळाला आहे. संघाचे ९ गुण आहेत व १५ टक्के गुणांसह ९ संघांपैकी सातव्या क्रमांकावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.