आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत मजबूत पकड घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ २४४ धावांवर बाद झाला. संघाने अखेरचे सहा गडी ४९ धावांत गमावले. प्रत्युत्तरात दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ बाद १०३ धावा काढल्या. एकूण १९७ धावांची आघाडी घेतलेल्या अाॅस्ट्रेलियाकडे ८ गडी शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा काढल्या अाहेत.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी भारतीय संघाने २ बाद ९६ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार अजिंक्य रहाणेला (२२) पॅट कमिन्सने त्रिफळाचित केले. हनुमा विहारी (४) वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. पुजाराने (५०) मालिकेत पहिले अर्धशतक ठोकले. पुजारा व ऋषभ पंतने (३६) पाचव्या गड्यासाठी ५३ धावा जोडल्या. दोन्ही फलंदाज १९५ स्काेअर असताना बाद झाले.
यजमान कमीत कमी ४०० धावांचे लक्ष्य देऊ इच्छितो. ऑस्ट्रेलियात ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना आशियाई संघ अपयशी ठरले. एकही संघ ३०० पेक्षा अधिक धावा करत सामना जिंकू शकला नाही.
ऋषभ पंत, रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीदरम्यान ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा जखमी झाले. कमिन्सचा चेंडू पंतच्या कोपऱ्यावर आणि स्टार्कचा चेंडू जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. पंतने दुसऱ्या डावात यष्टिरक्षण केले नाही. त्याच्या जागी साहाला उतरवण्यात आले. जडेजाने दुसऱ्या डावात अद्याप गोलंदाजी केली नाही.
पुजाराचे २६ वे अर्धशतक, सर्वात संथ फिफ्टी!
चेतेश्वर पुजाराने आपले २६ वे अर्धशतक झळकावले. त्याने १७४ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. ते त्याचे करिअरमधील सर्वात संथ अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने २०१८ मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७३ चेंडूंत ५० धावा काढल्या हाेत्या. त्याला कमिन्सने बाद केले. मालिकेत पाच पैकी चार वेळा पुजाराला कमिन्सने तंबूत पाठवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.