आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी मुलाखत:सुरुवातीला धोनीसोबत काही क्षणांच्या चर्चेत जाणवले की, त्याचे डोके मैदानावर चांगले चालते, विचार स्थिर आहे, तो कर्णधार बनू शकतो : सचिन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिनच्या शिफारशीवर मंडळाने 2007 मध्ये धोनीला कर्णधार केले

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. धोनी २००७ मध्ये संघाचा कर्णधार बनला. सचिन तेंडुलकरच्या शिफारशीवर बीसीसीआयने त्याला कर्णधारपदी नियुक्त केले होते. सचिनप्रमाणे धोनी मैदानावर शांत राहत होता. ‘दिव्य मराठी’शी बोलताना सचिनने धोनीच्या निवृत्तीवर म्हटले की, त्यात आपण लक्ष देऊ नये. तो खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे, त्याच्यावर सोडायला हवा. भारताच्या इतिहासात धोनीचे नाव राहील. सचिन तेंडुलकरशी झालेली चर्चा .......

> तू अनेकांच्या नेतृत्वाखाली खेळला. धोनी इतर कर्णधारांपेक्षा कसा वेगळा होता?

प्रत्येक कर्णधार वेगळा असतो. मी के. श्रीकांत, अजहर, रवी शास्त्री, सौरव, राहुल, अनिल व त्यानंतर धोनीसोबत खेळलो. धोनी शांत होता, संघाला चांगल्या प्रकारे हाताळायचा. चालू सामन्याचा चांगला अभ्यास, हे विशेष कौशल्य होते. प्रत्येक कर्णधाराचा प्रयत्न असतो आपण सामना कसा जिंकू शकतो? क्षेत्ररक्षण कसे असावे? कोणाला गोलंदाजी द्यावी? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी होती. मात्र, सर्वजण एकाच ठिकाणी पोहोचतात, विजय मिळवणे.

> तू मैदानावर शांत होता, धोनीला कूल म्हटले जाते. तू खेळताना तुझी मानसिकता ओळखणे कठीण होते, तसेच धोनीचीही. तुमच्या दोघांत काय समानता आहे?

होय, निश्चित. डोके शांत ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. अनेक खेळाडू डोके शांत ठेवतात, विविध प्रकारे खेळतात. खेळाडूला अखेर कोणत्या गोष्टीमुळे उत्कृष्ट कामगिरी होईल, हे माहिती असायला हवे. कोणी आक्रमक व कोणी शांत राहून चांगले असतात. कदाचित मी व धोनी मैदानावर शांत राहत होतो, ही आमच्यातील समानता असेल. प्रत्येक खेळाडूचे वर्तन वेगळे असते. माझ्यावर जे योग्य वाटते, तसेच व्हायला हवे असा मी विचार केला. योगायोगाने आमच्या दोघांत तो भाग सारखा ठरला. स्वत:ची एक वेगळी अोळख असावी. असे नाही, सर्व खेळाडू एकसारखे खेळतात. प्रत्येक खेळाडूला स्वत:च्या शैलीवर विश्वास असायला हवा.

> धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली, त्यावर तुझी काय प्रतिक्रिया?

निवृत्ती कशी घ्यावी, कधी घ्यावी, कशी असावी हे खेळाडूला माहिती असते. त्याच्या डोक्यात काय चालले हे त्यालाच माहिती असते. त्याचा दर्जा काय आहे? फिटनेस किती आहे? तो स्वत:ला प्रेरित करू शकतो की नाही? त्याचे मन खेळू इच्छिते की नाही. या सर्व गोष्टी त्या खेळाडूवर सोडून द्यायला हव्यात. धोनीने आपल्याला जल्लोष करण्याच्या किती संधी दिल्या. आता त्याच्या करिअरची जल्लोषाची वेळ आहे, त्याला आखण्याची नाही. त्याने भारतासाठी ज्या प्रकारे क्रिकेट खेळले, ते अद्भुत आहे. किती तरी युवा खेळाडूंना प्रोत्साहित केले. हे त्याचे मोठे योगदान आहे. हे मी पुढील पिढीला सांगेल. भारताच्या इतिहासात त्याचे नाव कायम राहील.

> तू धोनीला पहिल्यांदा कुठे व कधी पाहिले? तो भारतीय संघात स्थान मिळवेल असे वाटले होते का?

मी सर्वात पहिले धोनीला बांगलादेशमध्ये खेळताना पाहिले. त्या सामन्यात त्याने केवळ १२-१४ अशा धावा काढल्या होत्या. त्यावेळी चर्चा होती, तो मारू शकतो. त्याने त्या सामन्यात एकच शॉट मारला. माझ्या बाजूला सौरव गांगुली बसला होता. मी त्याला म्हटले, हा खेळाडू मला वेगळा दिसतो. त्याच्या बॅट फिरवण्यात एक वेगळा झटका होता, त्यामुळे त्याला अंतर मिळत होते. तो सहज षटकार मारू शकत होता. तो पाहिलेला त्याचा पहिला प्रभाव होता. या खेळाडूत आग दिसते, जो भारतासाठी दीर्घकाळ खेळेल, असे मी त्यावेळी म्हटले होते.

> असे म्हणतात, तू सुचवल्यानंतर धोनीला संघाचे नेतृत्व मिळाले. त्याच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव नव्हता, कोणत्या आधारे तू धोनीचे नाव सुचवले?

मी अनेक वेळा त्याच्या जवळ स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण केले. आम्ही सामन्याच्या परिस्थितीवर चर्चा करत होतो. त्यादरम्यान मी अनेक वेळा त्याला प्रश्न केले. त्याचे उत्तर अचूक होते. मैदानावर अधिक चर्चा होऊ शकत नव्हती. एक-दोन मिनिटे. जसे गोलंदाज रनअपवर परत जात असे, षटकादरम्यान चर्चा केली. तेव्हा अनुभवले त्याचे डोके मैदानावर खूप चालते. विचारात एक स्थिरता व शांती होती. ज्यामुळे मी नेहमी प्रभावित होत होतो. त्यामुळे मी त्याच्या नावाची शिफारस केली.

बातम्या आणखी आहेत...