आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • IND Vs PAK Asia Cup 2022 Memorable Moments Rohit Sharma Kl Rahul Hardik Pandya Mohammad Rizwan Virat Kohli Ravi Bishnoi Arshdeep Singh Catch

भारत-पाक सामन्यातील टॉप 6 क्षण:अर्शदीपने झेल सोडला अन् रोहित मैदानातच ओरडला, हुड्डाने 90 अंश मागे वाकून चौकार ठोकला

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारचा दिवस. दुबईचे मैदान आणि आमने-सामने दोन संघ ज्यांना एकमेकांविरुद्ध हरणे अजिबात आवडत नाही. आशिया चषक स्पर्धेत रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचे हे वातावरण. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडींनी पराभव केला. 39.5 षटकांच्या खेळात असे अनेक क्षण होते जे भारत किंवा पाकिस्तानचे क्रिकेट चाहते कधीही विसरणार नाहीत. पाहूयात त्यापैकी 6 महत्त्वाचे क्षण...

6. खुशदिल आणि फखर जमान यांनी 14 वर्षांपूर्वींची चूक पुन्हा केली नाही

2008 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सईद अजमल आणि शोएब मलिक यांनी ख्रिस गेलचा झेल अत्यंत विचित्र पद्धतीने सोडला होता. त्याक्षणी गेलचा झेल झेलण्यासाठी अजमल आणि मलिक दोघेही चेंडूखाली आले पण गैरसमजामुळे कोणीही झेल पकडला नाही. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या अजूनही तो क्षण लक्षात असेल.

रविवारच्या सामन्यातही असेच काहीसे घडणार होते. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्मा मोठा शॉट खेळायला गेला, पण चेंडू फार दूर गेला नाही आणि चेंडूखाली खुशदिल शाह आणि फखर जमान हे दोन क्षेत्ररक्षक होते. हा झेल सुटेल, अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. दोघांची टक्कर झाली, पण खुशदिलने कर्णधार रोहितचा झेल सोडला नाही. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार 16 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

5. नाणेफेकीदरम्यान रवी शास्त्रींची चूक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असते. त्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडू प्रचंड दबावाखाली असल्याने अनेक वेळा छोट्या-छोट्या चुका होतात. असाच काहीसा प्रकार कालच्या सामन्यात पाहायला मिळाला. पण यावेळी चूक खेळाडूंनी नव्हे तर सामन्याचे समालोचक रवी शास्त्री यांनी केली.

नाणेफेकीसाठी रोहित शर्माने नाणे फेकले आणि बाबर आझमने टेल्स म्हटले. मात्र, रवी शास्त्री माईकवर टेल्स ऐवजी हेड म्हणाले. नाणे टेल्स पडले म्हणजेच पाकिस्तानच्या बाजूने पडले. मात्र, रवी शास्त्रींनी हेड म्हटल्यामुळे सामना अधिकारी आणि रवी शास्त्री क्षणभर गोंधळले. पण लवकरच हा गोंधळ दूर झाला. रोहित शर्माने बाबरच्या बाजूने नाणे पडल्याचे सांगितले आणि पाकिस्तानने नाणेफेक जिंकली.

4. रिझवानला दुखापत, सामना 10-15 मिनिटे थांबला

सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अनेक अतिरिक्त धावा दिल्या. त्याला रोखण्यासाठी पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानला अधिकचे प्रयत्न करावे लागले. एका बाऊंसरला रोखण्याच्या प्रयत्नात रिझवान जखमीही झाला.

14व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद हसनैनने हार्दिक पांड्याला 0 धावांवर बाद केले. हार्दिक बाद झाल्यानंतर हसनैन चांगलाच आक्रमक झाला. नव्याने आलेला फलंदाज दीपक हुडा याचे त्याने बाऊन्सरने स्वागत केले. हा चेंडू विकेटकीपरच्याही डोक्यावरून गेला. रिझवानने उडी मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडू शकला नाही. यादरम्यान रिझवानच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे सामना सुमारे 10 ते 15 मिनिटे थांबवावा लागला. त्यानंतर उपचार करत वैद्यकीय पथकाने रिझवानला तंदुरुस्त घोषित केले आणि त्यानंतर तो पुन्हा खेळू लागला.

3. फखर जमानने हसन अलीची आठवण करून दिली

आशिया कपमध्ये सुरुवातीच्या सामन्यात रविवारी भारताने पाकिस्तान संघाला धूळ चारली होती. पाक या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला होता. पण सुरुवातीचा पाकिस्तानचा खेळ तसा दिसत नव्हता. सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना अनेक वेळा पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते. रवी बिश्नोईने भारतीय डावातील शेवटच्या षटकात दोन चौकार मारले. हे दोन्ही चेंडू रोखता आले असते, पण फखर जमानच्या अत्यंत कमकुवत क्षेत्ररक्षणामुळे भारताला दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी चार धावा मिळाल्या. हे सुमार क्षेत्ररक्षण पाहून त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या हरिस रौफने तर डोक्यालाल हात लावला होता. कर्णधार बाबर आझमही त्रस्त दिसत होता.

सामन्यात फखर जमानच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे अनेकांना 2021 च्या T20 विश्वचषकातील हसन अलीच्या ड्रॉप कॅचची आठवण झाली. तेव्हा हसनने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा झेल सोडल्यामुळे तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. पण, कालच्या सामन्यात फखरचे खराब क्षेत्ररक्षणही भारताला पराभवापासून वाचवू शकले नाही. नशिब पाकिस्तानच्या फलंदाजांनी चोख कामगिरी करत चांगल्या धावा केल्या. अन्यथा फखर जमानला पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले असते.

2. हुड्डाच्या फटकेबाजीचा विराटही कायल

भारतीय डावाच्या 17व्या षटकात दीपक हुड्डा खेळपट्टीवर होता. मोहम्मद हसनैन गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हसनैनने बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू टाळण्यासाठी हुड्डा मागे झुकला. जवळजवळ 90 अंश मागे झुकल्यानंतर त्याने चेंडूवर एक वरचा कट केला आणि चौकार ठोकत चार धावा आपल्या नावे केल्या. हुडाचा हा शॉट पाहून दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या विराट कोहलीलाही आश्चर्याचा धक्का बसला आणि तो हुड्डाचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

1. एका चुकीमुळे कर्णधार रोहित संतापला

रवी बिश्नोई पाकिस्तानच्या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरत होता. लेगस्पिनर बिश्नोई आपल्या गोलंदाजीतून पाकिस्तानला अडचणीत आणत होता. अशा स्थितीत कर्णधार रोहितनेही 18व्या षटकाची जबाबदारी बिश्नोईकडे सोपवली. पण या षटकात अर्शदीपच्या एका चुकीमुळे कर्णधार इतका संतापला की तो मैदानातच त्याच्यावर ओरडला.

बिश्नोईने पहिल्या दोन चेंडूत फक्त दोन धावा दिल्या. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीने स्लॉग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या काठाला लागला आणि वर गेला. अर्शदीप हा झेल सहज घेईल असे वाटत होते. पण, तसे झाले नाही. त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि खाली पडला. सामन्यात एवढा महत्त्वाचा झेल गमावल्याने कर्णधार रोहितचा संताप अनावर झाला. त्यामुळे भर मैदानातच तो प्रचंड ओरडला.

रोहित शर्माचा राग कॅमेऱ्यात कैद होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. भारतीय डावाच्या 13व्या षटकात पंत रिव्हर्स शॉट खेळताना बाद झाला. पंत पॅव्हेलियनमध्ये पोहोचल्यावर रोहितने पंतच्या या बेजबाबदार वृत्तीवर त्याला चांगलेच धारेवर धरले. पॅव्हेलियनमध्ये रोहित पंतवर रागावलेला स्पष्ट दिसत होता.

बातम्या आणखी आहेत...