आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला हवेत धोनी-युवीसारखे खेळाडू:दोघांच्या पॉवर हिटिंगवर चाहते होते फिदा; आज त्यांची कमी का जाणवतेय? जाणून घ्या 3 कारणे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 फेब्रुवारी 2006 चा दिवस. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 288 धावा केल्या. शोएब मलिकने 108 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 5 विकेट्स घेऊन 190 धावा केल्या.

सचिन तेंडुलकर 95 धावा करून बाद झाल्याने भारतीय चाहत्यांच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला विशेष काही करता आले नव्हते. टीम इंडिया हा सामना पराभूत होई असे वाटत होते, पण त्या दिवशी भारताचे दोन असे सुपरस्टार उदयास आले, ज्यांनी येणाऱ्या काळात भारताला असंख्य सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. हे खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग होते.

धोनी आणि युवराजची 102 धावांची भागीदारी झाली आणि भारताने 47.4 षटकात 292 धावा करत सामना जिंकला. धोनीने अवघ्या 46 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याचवेळी युवराजने धमाकेदार खेळी करत 79 धावा केल्या. धोनी आणि युवराज हे दोन्ही खेळाडू उत्तम फिनिशर तर होतेच मात्र, त्यांच्यात अनेक इतर चांगलेही गुण होते.

टीम इंडिया आता आशिया कपमधूनही बाहेर आला आहे. 2021 च्या टी-२० विश्वचषकातही टीम इंडिया विशेष कामगिरी करू शकली नाही. त्यामुळे आता ऑक्टोबरमध्ये होणारा विश्वचषक टीम इंडियाला जिंकायचा असेल तर धोनी आणि युवीसारख्या खेळाडूंची गरज आहे. अशी गरज का आहे, हे 3 मुद्द्यांद्वारे समजून घेऊया...

3. दोघेही हार्ड पॉवर हिटर

टीम इंडिया काही काळापासून ऋषभ पंतला टी-20 क्रिकेटमध्ये हिटर बॅट्समन म्हणून तयार करत आहे. मात्र तो सतत फ्लॉप होत आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राइक रेट फक्त 126 राहिला. पंतशिवाय हार्दिक पंड्याचीही अवस्था अशीच आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ संघाबाहेर होता आणि तो परतल्यावर त्याच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही.

हार्दिक पंड्या आणि पंतला युवराज आणि धोनीचा पर्याय म्हणून पाहिले जात होते.

युवराज आणि धोनी जेव्हा बॅटिंग करायचे, तेव्हा त्यांच्या पॉवर हिटिंग बॅटिंगबाबत कोणालाही शंका नव्हती. 2007 मध्ये आपल्या पहिल्याच T20 विश्वचषकात युवीने इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. त्याचवेळी, धोनीने शेवटच्या षटकांमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातला होता.

पॉवर हिटिंगमुळे धोनीने टीम इंडियासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. टीम इंडिलाला जेव्हा जेव्हा कमी चेंडूत जास्त धावा हव्या होत्या तेव्हा तेव्हा चाहत्यांना धोनी आणि युवीकडून प्रचंड अपेक्षा असायच्या. त्यांनीदेखील फार कमी वेळेस भ्रमनिरास केला. त्याच वेळी, आज टीम इंडियाकडे असे फार कमी फलंदाज आहेत जे शेवटच्या षटकात कमी चेंडू खेळून जास्त धावा करू शकतात आणि टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकतात.

2. दोघेही बहुप्रतिभावान होते

युवराज सिंग आणि धोनी हे दोघेही केवळ फलंदाजीमुळे संघाचा भाग नव्हते. त्यांच्यात एकापेक्षा एक गुण होते. युवराजचेच म्हणायचे झाले तर तो फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही अप्रतिमपणे करत असे. युवीच्या वनडेत 111 विकेट्स आहेत. त्याचबरोबर या खेळाडूने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याचबरोबर धोनी त्याच्या उत्कृष्ट यष्टिरक्षण आणि कर्णधारपदाने जगभर प्रसिद्ध झाला. धोनीने वनडेमध्ये 321 झेल आणि 123 स्टंपिंग केले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 57 झेल आणि 34 स्टंपिंग केले आहेत.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनी 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तसेच पहिल्या T20 विश्वचषकात चॅाहीच्या नेतृत्वाखालीच टीम इंडिया चॅम्पियन ठरली. भारताने शेवटच्या वेळी जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफीचाही माही कर्णधार होता. भारताने 2013 मध्ये इंग्लंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

1.अमेझिंग फिनिशर्स

युवराज आणि धोनीमध्ये सामना संपवण्याची अप्रतिम क्षमता होती. शेवटच्या षटकापर्यंत दोघेही सामना बरोबरीत आणायचे आणि तिथून संघाला जिंकून द्यायचे. या दोघांच्या दीर्घ भागीदारीमुळे भारताने वनडे आणि टी-20 मध्ये अनेक सामने जिंकले आहेत.

एखाद्या सामन्यात आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरले, तरी दोघेही शेवटपर्यंत संघाचे आशास्थान राहिले. आज आघाडीचे फलंदाज बाद झाले तर खालच्या फळीतील फलंदाजही अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. युवी आणि माही जेव्हा फलंदाजी करत होते, तेव्हा ते मैदानावर असेपर्यंत विरोधी संघाच्या खेळाडूंना धडकी भरायची.

या दोघांच्या निवृत्तीनंतर आजतागायत भारतीय संघ व्यवस्थापन त्यांना पर्याय शोधू शकलेले नाही. त्यामुळेच गेल्या 9 वर्षांत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीही जिंकू शकली नाही. त्यामागे हेच एक मोठे कारण आहे.

बातम्या आणखी आहेत...