आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​टीकाकारांमुळे आज या उंचीवर पोहोचलो - रहाणे; जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रहाणेने 3 शतके व 6 अर्धशतके काढली आहेत

साऊदम्प्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी शतकासाठी दबाव घेत नाही; पंत-गिलला संधी

भारतीय संघाचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणेला दुसऱ्यांनी केलेल्या टीकेबाबत कुठलाही आक्षेप नाही. त्याच्या खेळाबद्दल लाेक काय विचार करतात, याकडे दुर्लक्ष करत तो संघाला कसोटीत विजय मिळवून देण्यासाठी पुढे वाटचाल करतो. गेल्या काही वर्षांत चढ-उतारातील कामगिरी करत १७ सामन्यांत सर्वाधिक १०९५ धावांसह उपकर्णधाराने दोन वर्षांत भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात पोहोचवले.

रहाणेने म्हटले की, ‘सर्वाधिक धावा केल्यावर निश्चित चांगले वाटते. मात्र, खराब कामगिरी केल्यावर जेव्हा टीका होते, त्याचे काय? माझ्यावर टीका झाल्याचा आनंद वाटतो. मला वाटते, टीका झाल्यामुळे आज मी या उंचीपर्यंत पोहोचू शकलो. मी नेहमी आपले १०० टक्के योगदान देऊ इच्छितो. लोक माझ्यावर टीका करो अथवा ना करो. माझ्यासाठी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात संपूर्ण योगदान देणे महत्त्वाचे आहे.’

आठ वर्षांपेक्षा अधिक काळ कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर रहाणे जाणतो की, लोकांचा विचार सतत बदलतो. तो म्हणतो, ‘खरे तर मी कुणाच्या टीकेबाबत विचार करत नाही. लोक माझ्यावर टीका करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे व त्यांचे कामही. आपण त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी नेहमी स्वत:च्या कामगिरीवर लक्ष देतो, कठोर मेहनत घेतो आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय.’ रहाणे २०१९ मध्ये हॅम्पशायर काउंटीकडून खेळला होता, त्यामुळे त्याला या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे.

मी शतकासाठी दबाव घेत नाही; पंत-गिलला संधी
रहाणे म्हणतो की, केवळ ४० धावा काढल्या आणि त्या संघासाठी फायद्याच्या ठरल्या तरी मला आनंद होतो. मी आपला नैसर्गिक खेळ खेळतो. हीच वास्तविकता आहे, मी शतक केले किंवा नाही तरी. मी कधीच अतिरिक्त दबाव घेत नाही. मी वर्तमानात जगणे पसंत करतो. त्याच परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावे लागते. केवळ स्वतंत्र खेळू इच्छितो. आम्ही अंतिम सामन्यासाठी सज्ज आहोत. ऋषभ पंत व शुभमन गिलला आपल्या छोट्या करिअरमध्ये मोठा सामना खेळण्याची संधी मिळत आहे. त्यांना स्वतंत्र खेळू द्यायला हवे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा.