आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Sarfaraz's 12th Century; Kedar's Century Led Maharashtra To 481 In Mumbai's First Innings Against Tamil Nadu

रणजी करंडक:सरफराजचे 12 वे शतक; केदारच्या शतकाने महाराष्ट्र संघाची आघाडी,  तामिळनाडूविरुद्ध मुंबईच्या पहिल्या डावात 481 धावा

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान मुंबई संघाच्या २५ वर्षीय सरफराजने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत घरच्या मैदानावर तामिळनाडू संघाविरुद्ध शानदार शतकी खेळी केली. त्याने पहिल्या डावात ७३.६३ च्या स्ट्राइक रेटने २२० चेंडूंत ९ चाैकार आणि एका षटकारासह १६२ धावा काढल्या. याच शतकाच्या बळावर यजमान मुंबई संघाने पहिल्या डावात ४८१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात तामिळनाडू संघाची दुसऱ्या डावातही निराशाजनक सुरुवात झाली. संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ६२ धावा काढल्या. पहिला डाव १४४ धावांवर गुंडाळणारा तामिळनाडू संघ आता २७५ धावांनी पिछाडीवर आहे. दुसरीकडे केदार जाधव (१४२) आणि सिद्धेश वीर (नाबाद ९४) यांनी संयमी खेळीतून महाराष्ट्र संघाला आघाडी मिळवून दिली. महाराष्ट्र संघाने बुधवारी आसामविरुद्ध सामन्याच्या पहिल्या डावात २ बाद ३०७ धावा काढल्या. यासह टीमने ३९ धावांची आघाडी घेतली. आसाम संघाला पहिला डाव २७४ धावांवर गुंडाळावा लागला हाेता.

मुंबई संघाच्या सरफराजने घरच्या मैदानावर पाहुण्या तामिळनाडू संघाची सुमार गाेलंदाजी फाेडून काढली. त्याने शानदार खेळी करताना १६२ धावा काढल्या. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० व्या डावात १२ वे शतक साजरे केले. यात ९ अर्धशतकांचीही नाेंद आहे. मंुंबई संघाने कालच्या ६ बाद १८३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. मुंबईने ४८१ धावा काढल्या. यासह मुंबई संघाला सत्रात दुसरी माेठी धावसंख्या उभी करता आली. यापूर्वी मंुबई संघाने हैदराबाद संघाविरुद्ध ६ बाद ६५१ धावा काढल्या हाेत्या.

आसाम संघाविरुद्ध केदार, सिद्धेशचा झंझावात अंकित बावणेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने बुधवारी आसामविरुद‌्ध सामन्याच्या पहिल्या डावात सर्वाेत्तम खेळी केली. यादरम्यान केदार जाधव, सिद्धार्थ यांची खेळी लक्षवेधी ठरली. यात केदार जाधवने दमदार पुनरागमन करताना शतक साजरे केले. त्याने १४६ चेंडूंचा सामना करताना १४ चाैकार आणि सहा षटकारांसह १४२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने आपला सहकारी सिद्धार्थ साेबत माेठी भागिदारी रचली. आता सिद्धार्थलाही शतकाची संधी आहे. त्याने २७४ चेंडूंत ७ चाैकार व २ षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी केली.

गाेवा संघाकडून अर्जुनचे दाेन बळी अर्जुन तेंडुलकरने बुधवारी गाेवा संघाकडून खेळताना केरळ संघाविरुद्ध शानदार गाेलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात २ बळी घेतले. त्यामुळे केरळने २६५ धावांवर आपला पहिला डावा गुंडाळला.

चेतन शर्माने दिले सरफराजला संधीचे संकेत सरफराज सध्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत टाॅप-स्काेेअरर फलंदाज आहे. त्याच्या नावे पाच डावात ९७.०० च्या सरासरीने ३८८ धावांची नाेंद आहे. यामध्ये दाेन शतकांसह एका अर्धशतकाचा समावेश आहे. याच खेळीमुळे आता लवकरच सरफराजला भारतीय संघाकडून संधी मिळू शकते, असे संकेत निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दिले. त्यांनी शतकी खेळी करणाऱ्या सरफराजवर काैतुकाचा वर्षाव केला.

विदर्भ संघाविरुद्ध आवेश खानचे पाच बळी यजमान मध्य प्रदेश संघाच्या आवेश खानने घरच्या मैदानावर विदर्भ संघाविरुद्ध लक्षवेधी खेळी केली. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्यामुळे विदर्भ संघाचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. संघाने पहिल्या डावात दिवसअखेर ७ बाद १४५ धावा काढल्या आहेत. अद्याप १६४ धावांनी पिछाडीवर असलेल्या विदर्भ संघाचा संजय रघुनाथ (५३) व नचिकेत (६) मैदानावर कायम आहेत. सलामीवीर कर्णधार फैज फझलने ८ आणि अ‌थर्वने २ धावांची खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...