आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धवन भारताचे नेतृत्व करणार?:जुलैमध्ये तीन वनडे व तीन टी-20 मालिकेसाठी भारत श्रीलंका दौऱ्यावर जाणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाईल. अखेरच्या वेळी संघ २०१८ मध्ये निदाहस ट्रॉफीसाठी शेजारी देशात गेला होता. कसोटीसाठी प्रमुख खेळाडू इंग्लंड दाैऱ्यावर असतील, त्यामुळे संघाकडे राखीव खेळाडूंना आजमावण्याची संधी आहे. अद्याप दौऱ्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. सूत्रांनूसार, १४ ते २७ जुलैदरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळवले जातील. विराट-रोहित जोडी इंग्लंड दौऱ्यावर असल्याने सर्वाधिक चर्चा कर्णधाराबाबत आहे. त्यासाठी श्रेयस अय्यर व शिखर धवन दावेदार आहेत. अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो तंदुरुस्त होणे कठीण आहे, त्यामुळे धवन कर्णधार बनणे जवळपास निश्चित आहे. त्याच्या आधी एकदिवसीयमध्ये २४ आणि टी-२० मध्ये सहा खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. धवनसोबत सलामी फलंदाजांच्या शर्यतीत पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड व देवदत्त पडिक्कल आहेत. ईशान किशन व सूर्यकुमार यादवचे मधल्या फळीत खेळणे निश्चित वाटते. संजू सॅमसनला संधी मिळेल. दुसरीकडे, अनुभवामुळे दिनेश कार्तिक मजबूत दावेदार आहे.

एकदिवसीय, टी- २० साठी एकच संघ निवडला जाणार
निवड समिती एकदिवसीय व टी-२० दोन्ही प्रकारांसाठी २० सदस्यीय एकाच मोठ्या संघाची निवड करू शकतो. कारण, सर्व खेळाडू एकदाच श्रीलंकेला रवाना होतील व परततील. या दौऱ्यासाठी प्रशिक्षकाची निवडदेखील मजेशीर राहील. भारतीय अ संघ आणि १९ वर्षांखालील संघाचा सपोर्ट स्टाफ पारस म्हाम्ब्रे, सीतांशू कोटक व अभय शर्मा संघासोबत जाऊ शकतात. मात्र, एनसीए प्रमुख राहुल द्रविड संघासोबत जातील की नाही, हे पाहणे रंजक ठरेल.

गोलंदाजीत दावेदारांची रांग
वरुण चक्रवर्ती तंदुरुस्त झाल्यास त्याला टी-२० संघात स्थान दिले जाऊ शकते. राहुल चाहर व युजवेंद्र चहलला दोन्ही प्रकारांत संधी मिळू शकते. कुलदीप यादवचे एकदिवसीयमध्ये खेळणे निश्चित आहे. त्याचबरोबर रवी बिश्नोई रांगेत आहे. भुवनेश्वर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. टी-२० मध्ये त्याच्यासोबत दीपक चाहर, हर्षल पटेल व खलील अहमद व एकदिवसीयसाठी नवदीप सैनी व जयदेव उनाडकट असू शकतात. युवा खेळाडू चेतन साकरिया, कार्तिक त्यागी आणि ईशान पोरेल यांनी आपली दावेदारी ठोकली आहे.. २०१८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा हीरो कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी सलग जखमी असल्याने त्यांची नावे यादीत तळाला आहे.

अष्टपैलूची निवड सर्वात महत्त्वाची ठरणार
टी-२० विश्वचषकाचे आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे अष्टपैलूची भूमिका महत्त्वाची ठरेल. हार्दिक व कृणाल पांड्या बंधू दौऱ्यावर असतील. इंग्लंड मालिकेतील संघाचा सदस्य राहुल तेवतियानेदेखील दावेदारी ठोकली. वेगवान गोलंदाजीत अष्टपैलू शिवम दुबे व विजय शंकर पर्याय ठरू शकतात. हे पाहणे रंजक ठरेल की, निवड समिती हार्दिकसोबत शंकर आणि शिवम दुबेला श्रीलंकेला पाठवील का?

बातम्या आणखी आहेत...