आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विराट काेहलीच्या कणखर नेतृत्वात टीम इंडिया आता काेराेनाच्या संकटकाळातही आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. आज शुक्रवारपासून भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. शानदार विजयी सलामी देऊन मालिका जिंकण्याच्या आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही १३ वी द्विपक्षीय मालिका आहे. आतापर्यंत झालेल्या १२ मालिकांमध्ये दाेन्ही संघांच्या विजयाचे रेकाॅर्ड प्रत्येकी ५० टक्के राहिलेले आहे. म्हणजेच आतापर्यंत प्रत्येकी सहा मालिका जिंकून दाेन्ही संघांनी विजयात बराेबरी साधली. दाैऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. टीम इंडिया मार्च महिन्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे.
दाेन्ही संघांत १२ वनडे मालिका-प्रत्येकी सहा जिंकून दाेन्ही संघ बराेबरीत
२१ महिन्यांनंतर झुंजणार दाेन्ही संघ :
भारत आणि आॅस्ट्रेलिया संघ जवळपास २१ महिन्यांनंतर समाेरासमाेर असतील. आॅस्ट्रेलियातील मैदानावर १५ जानेवारी २०१९ मध्ये हे दाेन्ही संघ झुंजले हाेते. अॅडिलेडमधील या वनडे सामन्यात भारताने सहा गड्यांनी आॅस्ट्रेलियावर मात केली हाेती. त्यानंतर पहिल्यांदाच सामना खेळणार आहेत. ऑस्ट्रेेलियाने याच वर्षी जानेवारीत भारताचा दाैरा केला हाेता.
अनफिट राेहित शर्माबाबतची प्रतिक्रिया कर्णधार काेहलीने नाकारली
अनफिट असलेल्या राेहित शर्माच्या दुखापतीबाबत प्रतिक्रिया देण्यास कर्णधार काेहलीने नकार दर्शवला. ‘राेहितच्या दुखापतीबाबत आपण कन्फ्यूज आहे. आम्हाला याबाबत अधिक स्पष्ट माहिती नाही,’ असेही ताे म्हणाला. सध्या राेहित हा दुखापतीने त्रस्त आहे.
श्रेयसला चाैथ्या स्थानावर संधी
भारताच्या गाेलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह आणि माे. शमीवर असेल. याशिवाय साेबतीला शार्दूल व नवदीप सैनी हे दाेन्ही युवा गाेलंदाज राखीव आहेत. श्रेयस अय्यरला चाैथ्या स्थानावरून फलंदाजीची संधी मिळेल. हार्दिकला संधी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, त्याच्यासाेबत संघातील प्रवेशासाठी मनीष पांड्याही शर्यतीत आहे. हार्दिक हा फिनिशरच्या भूमिकेत उल्लेखनीय कामगिरी करताे.
धवनसाेबत हाेईल मयंकची निवड
भारतीय संघाला मालिका विजयाच्या या माेहिमेला सुरुवात करताना राेहित शर्माची माेठी उणीव भासणार आहे. अनफिटमुळे राेहित या मालिकेत सहभागी करण्यात आला नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीमध्ये शिखर धवनसाेबत काेणाला संधी देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष असेल. यात सध्या शुभमान गिल व मयंक अग्रवालच्या नावाची चर्चा आहे. यापैकी एकालाच ही संधी मिळणार आहे.
काेहलीला बाद करण्यासाठी डावपेच! ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचची कबुली
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीची जगात वनडे फाॅरमॅटमधील सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून ख्याती आहे. त्यामुळे काेहलीच्या माेठ्या खेळीला ब्रेक देण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल. यासाठीच आता या अव्वल फलंदाजाला झटपट बाद करण्यासाठी संघाचे गाेलंदाज डावपेचाची आखणी करत आहेत, अशी कबुली यजमान आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अॅराेन फिंचने दिली. आज शुक्रवारपासून भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेत आहे. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच हा नुकत्याच झालेल्या १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विराट काेहलीच्या नेतृत्वात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे. त्यामुळे आता त्याला यादरम्यान फायदा हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘वनडेच्या फाॅरमॅटमध्ये काेहली हा दर्जेदार कामगिरी करताे. त्यामुळे त्याला झटपट राेखण्यावर आमचा भर आहे. यावर आम्ही लक्ष केंद्रित करून वेगळ्या प्रकारचे डावपेच आखले आहेत. याशिवाय आमच्या गाेलंदाजांनीही याचा सखाेल अभ्यास केला आहे. काेहलीला स्वस्तात बाद केल्याने आमचा मालिका विजयाचा मार्ग अधिक सुकर हाेऊ शकताे, असा विश्वासही फिंचने व्यक्त केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.