आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव:5व्या कसोटीत 7 विकेटने इंग्लंड विजयी, 350+ लक्ष्य देऊनही टीम इंडिया प्रथमच पराभूत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव केला. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या जो रूट (142*) आणि जॉनी बेअरस्टो (114*) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी केलेल्या 269 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली आहे.

भारताने विरोधी संघाला 350 हून अधिक धावांचे लक्ष्य दिले आणि तरीही सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रूटची शानदार खेळी

जो रूटने पाचव्या दिवशी कसोटी कारकिर्दीतील 28वे शतक झळकावले. 2021 नंतर इंग्लंडच्या या फलंदाजाने 47 डावांत 11 शतके ठोकली आहेत.

भारताविरुद्ध रुटचे 9वे शतक होते.भारतीय संघ दुसऱ्या डावात 245 धावांत ऑलआऊट झाला आणि इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य मिळाले.

लक्ष्य मोठे आहे असे वाटले, पण भारतीय गोलंदाजांची इंग्लंडच्या सलामीवीरांनी प्रथम धुलाई केली. एलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली.

यानंतर 3 फलंदाज 2 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले आणि भारत सामन्यात परतल्याचे दिसत असले तरी तसे झाले नाही. जॉनी बेअरस्टो आणि जो रूटने आपल्या तडाखेबंद खेळीने सामना पूर्णपणे उलटा फिरवला.

बुमराहने घेतले दोन विकेट, भारताने गमावले दोन रिव्ह्यू

टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दोन्ही सलामी विकेट घेतल्या. टीपूर्वी, त्याने जॅक क्रॉलीला वैयक्तिक 46 धावांवर बोल्ड केले. त्याचवेळी टी नंतरच्या पहिल्याच चेंडूवर ओली पोप विकेटच्या मागे झेलबाद झाला. इंग्लंडला हे दोन्ही धक्के अजूनही पेलता आले नाहीत तोपर्यंत मोहम्मद शमीच्या एका शानदार थ्रोने एलेक्स लीसला धावबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

पंत-पुजाराने सर्वाधिक धावा केल्या

भारताकडून दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 66 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 8 चौकार आले. स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेतेश्वरला ब्रॉडचा घसरलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता, पण तिथेच उभ्या असलेल्या एलेक्स लीसने सोपा झेल घेतला.

त्याचवेळी पहिल्या डावात 146 धावा करणाऱ्या ऋषभने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. तो 86 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक होते. त्याला जॅक लीचने आपला बळी बनवले.

श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. त्याला मॅथ्यू पॉट्सचा शॉर्ट बॉल ओढायचा होता, पण त्याने जेम्स अँडरसनकडे सोपा झेल दिला. अय्यरच्या बॅटमधून 19 धावा झाल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 4 बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...