आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या T-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 82 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. दिनेश कार्तिक (55 धावा), हार्दिक पंड्या (46 धावा) व आवेश खान (4 विकेट) हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 169 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेला 16.5 षटकांत 9 गडी बाद केवळ 87 धावाच करता आल्या.
टी-20 मधील टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवरील आजवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वीचा विक्रम 48 धावांचा होता. याच मालिकेतील विशाखापट्टणम येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात हा विजय मिळाला. भारताचा हा एकूण 5 वा सर्वात मोठा विजय आहे. विक्रमी विजय 143 धावांचा आहे. भारतीय संघाने 2018 मध्ये आयर्लंडचा या फरकाने पराभव केला होता.
मिलर मोठी खेळी करण्यात अपयशी
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची सर्वात मोठी आशा असलेला डेव्हिड मिलर फार काही करू शकला नाही. तो 7 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्याला हर्षल पटेलने क्लीन बोल्ड केले.
टेंबा बावुमा रिटायर्ड हर्ट
भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा जायबंदी झाला. तिसऱ्या षटकात भुवीच्या एका चेंडूने अचानक उसळी घेतली आणि चेंडू जाऊन थेट बावुमाच्या छातीवर आदळला. त्यानंतरही त्याने काही वेळ खेळण्याचा प्रयत्न केला. पण अस्वस्थ वाटल्याने नंतर तो पॅव्हेलियनमध्ये परत गेला.
त्याच्या जागी ड्वेन प्रिटोरियस फलंदाजीला आला. बावुमा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर ड्वेन प्रिटोरियस आणि क्विंटन डी कॉक लवकर बाद झाले. डिकॉकने 14 धावा केल्या. तर प्रिटोरियसला भोपळाही फोडता आला नाही.
तत्पूर्वी, टीम इंडियासाठी दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 55 धावांची खेळी खेळली. त्याचा स्ट्राइक रेट 203.70 होता. 16 वर्षांच्या कारकिर्दीतील हे त्याचे पहिले टी-20 अर्धशतक आहे. कार्तिकने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 सामना खेळला होता. पण टीम इंडियासाठी त्याला T20I मध्ये अद्याप अर्धशतक करता आले नव्हते.
कार्तिकशिवाय हार्दिक पंड्यानेही या सामन्यात चांगली फलंदाजी केली. त्याने 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 148.38 होता. दोघांमध्ये 33 चेंडूत 65 धावांची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
पंत का फ्लॉप शो कायम
टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत याचा फ्लॉप शो या सामन्यातही कायम राहिला. त्याने 23 चेंडूंचा सामना करत केवळ 17 धावा काढल्या. त्याचा स्ट्राइक रेट केवळ 73.91 चा होता. मागील 3 सामन्यांत त्याने अनुक्रमे 29, 5 व 6 धावा काढल्या.
भारतीय संघाला बसले सलग धक्के
टीम इंडियाचा सलामीवर ऋतुराज गायकवाडला या सामन्यात चमकदार कामगिरी करता आली नाही. तो 7 चेंडूत 5 धावा काढून लुंगी एनगिडीच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरही स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावा केल्या. या मालिकेत अय्यरला फारशी कमाल दाखवता आली नाही.
सध्या शानदार फॉर्मात असणाऱ्या ईशान किशनलाही चौथ्या टी-20 समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्याने सुरूवात चांगली केली. पण, त्याचे रुपांतर त्याला एका मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. ईशान 26 चेंडूत 27 धावा काडून बाद झाला. एनरिक नोर्त्याने त्याचा बळी घेतला.
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंतने सलग चौथ्यांदा नाणेफेक गमावली. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. चौथ्या सामन्यातही उमरान मलिकला मैदानाबाहेरच रहावे लागले.
दोन्ही संघाचे प्लेइंग -11
भारतः ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार व युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकाः क्विंटन डी कॉक, टेंबा बावुमा (कर्णधार), रेसी व्हॅन डेर डुसेन, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, मार्को जेन्सन, लुंगी एनगिडी, केशव महाराज, एनरिक नोर्त्या व तबरेज शम्सी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.