आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमार कामगिरीला जबाबदार काेण?:5 पॉवर भारी पडत असल्याने टीम इंडिया अडचणीत, आता उपांत्य प्रवेश कठीण

मुंबई / चंद्रेश नारायणनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२००७ च्या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला यंदा आयसीसीच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग दुसऱ्या सामन्यातही पराभवाची धूळ चाखावी लागली. सुमार कामगिरीमुळे सलामीला पाकिस्तान व त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला. यामुळे टीम इंडियाची उपांत्य फेरीतील प्रवेशाची वाट खडतर झाली. विश्वचषकाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय संघ प्रथमच सुरुवातीच्या दाेन सामन्यांत पराभूत झाला आहे. त्यामुळे कोहली बॉइजच्या कामगिरीवर आता प्रचंड टीका केली जात आहे. भारताच्या या सलग दाेन लाजिरवाण्या पराभवांसाठी जबाबदार काेण, यावरच सध्या जाेरदार चर्चा सुरू आहे. ड्रेसिंग रूममध्ये चार प्रशिक्षकांसह मेंटॉर आहेत. त्यांनी आखलेल्या रणनीतीनंतही यश मिळत नसल्याने टीकेची धार वाढत आहे.

ड्रेसिंग रूम : ‘एक ना धड भाराभार चिंध्या’अशी मोर्चेबांधणीची स्थिती
सध्या भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये निर्णय घेणारे अनेक जण आहेत. यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गाेलंदाजी प्रशिक्षक अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांचा समावेश आहे. याशिवाय माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनी मेंटॉर आहे. हे सर्व जण वेगवेगळे निर्णय घेत आहेत. यातून अचूक असे डावपेच आखण्यात ड्रेसिंग रूम अपयशी ठरत आहे. त्यामुळेच सध्या टीम इंडियासाठी ड्रेसिंग रूम ही ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’सारखीच झाली आहे. गाेलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी परिणामकारक निर्णय घेण्यात यातील कोणीही यशस्वी ठरत नाही. संघाला ठाेस निर्णय घेणाऱ्या एका जबाबदारी व्यक्तीची गरज आहे. याच दिशेने विचार करण्यात यावा, यातूनच टीमला तारणारा निर्णय घेतला जाईल. मात्र, याच गाेष्टीचा सध्या ड्रेसिंग रूममध्ये अभाव असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात आहे.

गाेलंदाजी : बळी घेण्यात अपयश; संघासाठी धाेकादायक
भारतीय संघाच्या पराभवासाठी सुमार गाेलंदाजीही कारणीभूत मानली जात आहे. गाेलंदाजांची निवड हा विषय सध्या अधिकच चिंताजनक ठरला आहे. प्रतिष्ठा आणि चर्चेतील गाेलंदाजांची निवड आतापर्यंतच्या दाेन सामन्यांत झाली. मात्र, हा निर्णय साफ चुकीचा ठरल्याचे आता जगजाहीर झाले. भुवनेश्वर कुमारच्या निवडीचा निर्णय चुकीचा असल्याचेही आता स्पष्ट झाले. खरेतर दीपक चहर,आवेश खान आणि हर्षल पटेलची निवड महत्त्वाची ठरली असती. फिरकीत काेणालाही छाप पाडता आली नाही. भारताकडे ऐन मोक्याच्या क्षणी बळी घेणाऱ्या गाेलंदाजांची उणीव भासत आहे. सध्या फक्त जसप्रीत बुमराह हाच आपल्या डावपेचांप्रमाणे गोलंदाजी करताना दिसत आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध चार षटकांत १९ धावा देताना दाेन विकेट घेतल्या. त्यामुळे पाकविरुद्धच्या जोरदार पराभवानंतर बुमराहला थोडासा दिलासा मिळाला. भारताला नाही.

शेड्यूल : संघाच्या भूमिकेतून भारताला मिळाली नाही तयारीची संधी; दिग्गज खेळाडूंनी गत मार्च महिन्यात खेळला टी-२० सामना
यंदा टीम इंडियाच्या वेळापत्रकामध्ये माेठी गडबड झाली आहे. याचाच माेठा फटका काेराेना महामारीच्या काळात बसला आहे. टीम इंडियाला टी-२० विश्वचषकाच्या तयारीची संधीच मिळाली नाही. भारताने गत मार्च महिन्यात इंग्लंड टीमविरुद्ध एकमेव टी-२० मालिका खेळली हाेती. त्यानंतर टी-२० सामना किंवा मालिका खेळण्याची संधीच मिळाली नाही. आयपीएलच्या आयाेजनामुळे या मालिकाकडे दुर्लक्ष झाले. याचाच माेठा परिणाम भारताच्या कामगिरीवर झाला असावा, असे वाटते. टी-२० मधील भारताच्या सांघिक कामगिरीचा दर्जा घसरल्याने सलग दाेन सामन्यांत पराभव झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (टेस्ट चॅम्पियनशिप) आणि इंग्लंडविरुद्ध कसाेटी मालिकेच्या दरम्यान महिनाभराच्या विश्रांतीत टी-२० सामन्यांचे आयाेजन हाेऊ शकले असते, मात्र, तसे झाले नाही.

बॅटिंग आॅर्डर : सुरुवातीपासूनच सुमार खेळी, राेहितसाेबत सलामीला काेहलीची खेळी उपयुक्त; किशनला चाैथ्या स्थानी मिळावी संधी
भारतीय संघाची सुमार फलंदाजी ही सध्या चर्चेचा विषय आहे. कारण, सुुरुवातीपासूनच हाेणाऱ्या गडबडीने टीमचा माेठ्या धावसंख्येचा प्रयत्न अपयशी ठरत आहे. हीच कसर दूर करण्यासाठी आता फलंदाजीत बदल महत्त्वाचा ठरेल. यासाठी राेहित शर्मासाेबत सलामीला विराट काेहलीला दिलेली संधी, संघासाठी अधिक फायदेशीर ठरणारी असेल. याच निर्णयात माेठी गडबड हाेताना दिसते. सलामीवीर राहुल गत पाच डावापासून समाधानकारक खेळी करू शकला नाही. यासाठी संघ व्यवस्थापनाने ठाेस असा माेठा निर्णय घेण्याची गरज आहे. पाकिस्तानविरुद्ध राेहितने शून्य, राहुलने अवघ्या ३ धावा काढल्या. एकमेव काेहलीला अर्धशतकी खेळी करता आली. न्यूझीलंड संघाविरुद्ध राहुलने १८, राेहितने १४ व काेहलीने ९ धावांची खेळी केली. त्यामुळे राेहितसाेबत काेहलीला संधीची गरज आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार हा बिग हिटरची भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकेल.

बातम्या आणखी आहेत...