आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणीच्या युवा खेळाडू सीमा व जान्हवी खिस्तेने महाराष्ट्र संघाला चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेत पदकाचे खाते उघडून दिले. या दोघींच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने गतका खेळ प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. यासह महाराष्ट्र संघ पदार्पणात या खेळ प्रकारात पदकाचा मानकरी ठरला. परभणीच्या विजयालक्ष्मीने याच खेळ प्रकारात वैयक्तिक गटात कांस्यपदक पटकावले. यासह महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन पदके आपल्या नावे केली. दुसरीकडे हरजितकौरच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
सीमा-जान्हवीची सर्वोत्तम कामगिरी; कांस्य निश्चित
महाराष्ट्राने गतका (सोटी-फरी सांघिक) या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले. तगड्या पंजाबसोबत झालेल्या उपांत्य फेरीत पराभव झाला. ताऊ देवीलाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला. महाराष्ट्राचा पहिला सामना तामिळनाडूसोबत झाला. यात महाराष्ट्राचे ७४ तर तामिळनाडूचे अवघे २१ गुण होते. दुसरा सामना छत्तीसगडसोबत झाला. त्यात महाराष्ट्राने ११७-४८ ने विजय मिळवला. उपांत्य फेरीची लढत पंजाबसोबत झाली. शुभांगी अंभुरे, सीमा खिस्ते, जान्हवी खिस्ते, नंदिनी पारधे या खेळाडूंनी पंजाबसोबत शर्तीची लढत दिली.
परभणीच्या विजयालक्ष्मीची सुवर्णसंधी हुकली; शुभांगी पदकाची दावेदार
परभणीच्या विजयालक्ष्मी पिंपरीकरने वैयक्तिक गटात शानदार कामगिरीच्या बळावर पदकाचा बहुमान पटकावला. तिने कौशल्य दाखवत जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेशसोबतचे सामने जिंकले. चंदीगडच्या खेळाडूसोबत झालेल्या उपांत्य सामन्यात ती जखमी झाली. परिणामी प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. सोटी-फरी वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राची शुभांगी अंभुरेने उपउपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. तिचा सामना पंजाबच्या खेळाडूसोबत होईल. तिच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे.
आज महाराष्ट्राला विजयी हॅट्ट्रिकची संधी
मुंबईच्या हरजितकौरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला संघाने शनिवारी खेलो इंडिया स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने दुसऱ्याच सामन्यात छत्तीसगडचा पराभव केला. महाराष्ट्र संघाने ६२-१८ ने सामना जिंकला. संघाच्या विजयात हरजितकौर (१३ गुण), मनीषा राठोडचे (१२) मोलाचे योगदान राहिले. तसेच सर्वोत्तम डिफेन्स करताना बीडच्या कोमल ससाणे (५), निकिता लंगोटेसह (२) यशिका पुजारी (७), शिवरजनी पाटील (४), ऋतुजा अवघडी (३) , मुस्कान लोखंडे (२), किरण तोडकरची (२) खेळी लक्षवेधी ठरली. आज महाराष्ट्र महिला संघाला विजयी हॅटट्रिकची संधी आहे. टीमचा तिसरा सामना रविवारी आंध्र प्रदेशविरुद्ध होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.