आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:आॅगस्टनंतर देशातील खेळाडू मैदानावर, फेडरेशनचा आराखडा तयार; सुरुवातीला राष्ट्रीय शिबिर आयाेजित करण्याच्या निर्णयावर एकमत 

भोपाळ/नवी दिल्ली (कृष्णकुमार पांडे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या महामारीचा धाेका आता एकीकडे वेगाने वाढत आहे. मात्र, याच संकटातून सावरताना भारतामधील क्रीडाविश्व आता पूर्वपदावर येण्यासाठी सक्रिय झाले आहे. यासाठी फेडरेशन आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सातत्याने पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळेच महामारीच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून भारतामध्ये आॅगस्ट महिन्यानंतर क्रीडाविश्व नव्या उमेदीने सुरू हाेण्याचे चित्र आहे. यासाठीची तयारी देशभरातील अव्वल १५ खेळांच्या फेडरेशनने दाखवली आहे. यासाठी या सर्व फेडरेशनने केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि साईसाेबत चर्चा केली. यासाठीचा आराखडाही फेडरेशनने तयार केला. यात राष्ट्रीय शिबिराच्या आयाेजनाला पहिली पसंती दर्शवण्यात आली आहे.

वेटलिफ्टिंग : शिबिर सुरू; आॅक्टाेबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा

आम्ही सध्या सराव शिबिराच्या आयाेजनाला सुरुवात केली. यातून खेळाडूंना नित्यनेमाने सराव करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आम्ही आॅक्टाेबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयाेजनाचा निर्णय घेणार आहाेत, अशी माहिती फेडरेशनचे सचिव सहदेव यादव यांनी दिली.

नेमबाजी : फेडरेशनच्या बैठकीत १६ जुलै राेजी ठाेस निर्णय

आमची राष्ट्रीय रायफल असाेसिएशनची बैठक येत्या १६ जुलै राेजी हाेणार आहे. या बैठकीमध्ये आगामी काळात नेमबाजी सुरू करण्याची चर्चा करणार आहे. त्यामुळे आम्ही याच बैठकीत पुढील वेळापत्रकाबाबत ठाेस निर्णय घेणार आहाेत. खेळाडूंच्या आराेग्याबाबत अधिक खबरदारी आम्ही घेऊ. त्यामुळे या सर्व गाेष्टींचा विचार करून सर्व निश्चित हाेईल, असे सचिव राजीव भाटिया यांनी सांगितले.

तिरंदाजी : पुण्यातील रद्द; शिबिर साेनिपतमध्ये

सरावावर आम्ही काम करत आहाेत. हे सप्टेंबरमध्ये सुरुवात हाेईल. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने पुण्यातील शिबिर रद्द करून साेनिपतमध्ये हाेईल, असे भारतीय तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमाेद चांदूरकर यांनी सांगितले.

कयाकिंग-केनोइंग : के-१, सी-१ शिबिर सुरू

भारतीय कयाकिंग-केनोइंग संघटनेचे सचिव प्रशांत कुशवाहा म्हणाले की, परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही कयाकिंग-केनाेइंगच्या के-१, सी-१ च्या सरावाला सुरुवात केली. त्यानंतर स्पर्धा आयाेजनाचा निर्णय हाेईल.

वुशू : आॅगस्टमध्ये युवांच्या राष्ट्रीय स्पर्धेची तयारी 

‘आम्ही सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करणार आहाेत. मात्र, त्याआधीच युवांची राष्ट्रीय स्पर्धा आयाेजनावर सध्या चर्चा सुरू आहे, अशी माहिती भारतीय वुशू संघटनेचे सचिव सोहेल अहमद यांनी दिली.

स्नूकर : फेडरेशन शासन निर्णयाची पाहतेय वाट

आम्ही शासनाच्या एसी सुरू करण्याच्या निर्णयाची वाट पाहताेय. त्यानंतरच आमचा या खेळ प्रकाराच्या आयाेजनावर आराखडा तयार हाेईल, अशी माहिती संघटनेचे सचिव सुनील बजाज यांनी दिली.

ज्युदाे : राष्ट्रीय स्पर्धेचे आयाेजन आॅगस्टमध्ये

मैदानावर कमबॅक करण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे. यातून आॅगस्टमध्ये राष्ट्रीय स्पर्धा आयाेजित हाेईल, असे संघटनेचे सचिव मनमोहन जायसवाल म्हणाले.

कुस्ती : शिबिर अद्याप नाही; गाइडलाइन स्पष्ट

कुस्तीला सध्या सुरू करण्याचा विचार नाही. हा खेळ थेट शरीराशी स्पर्श करणारा आहे. त्यामुळे आम्ही याबाबत फक्त गाइडलाइन निश्चित केली. अद्याप शिबिराचा विचार नाही, असे महासंघाचे संयुक्त सचिव ताेमर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...