आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००४ पासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कसाेटी मालिकेचा माेठा धसका घेतला आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेतील आपली पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. मात्र, प्रत्यक्षात ऑस्ट्रेलिया संघ मैदानावर कितपत यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ९ फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर या मालिकेला सुरुवात हाेत आहे. यादरम्यान व्हीसीएवर सलामीची कसाेटी खेळवली जाणार आहे. याच मालिकेच्या तयारीसाठी सध्या ऑस्ट्रेलियन फलंदाज अश्विनचा डुप्लिकेट मानल्या जाणाऱ्या २१ वर्षीय युवा गाेलंदाज महीश पिठियाच्या चेंडूंवर कसून सराव करत आहे. या युवा गाेलंदाजाची चेंडू टाकण्याची शैली पूर्णपणे अश्विनसारखीच आहे. त्यामुळे त्याला डुप्लिकेट अश्विन मानले जाते. यामुळे सध्या ऑस्ट्रेलिया संघाने सुटकेचा श्वास साेडला आहे. कारण, ऑस्ट्रेलियाला माेठा धाेका अश्विन व ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांच्याकडून आहे. यांच्या जाळ्यात संघ अडकू नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अनेक डावपेच आखले. यातून राष्ट्रीय संघासाठी सिडनीमध्ये खास स्पिन पिच तयार केली आहे.
२०१३ मध्ये अश्विनची शैली आत्मसात; ८ बळी बडाेदा येथील युवा गाेलंदाज महीशने २०१३ मध्ये पहिल्यांदाच अश्विनला गाेलंदाजी करताना पाहिले हाेते. हे पाहून महीशने आपणही अश्विनसारखेच हाेण्याचा निर्धार केला. यादरम्यान केलेल्या प्रचंड मेहनतीच्या बळावर त्याला अल्पावधीत ही शैली आत्मसात करता आली. महीशने डिसेंबरमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने बडाेदा संघाचे प्रतिनिधित्व करताना चार सामन्यांत ८ बळी घेतले आहेत.
अलूर येथील टर्निंग ट्रॅकवर महीशची शानदार गाेलंदाजी अश्विन आणि जडेजाच्या गाेलंदाजीचा धसका घेतलेले ऑस्ट्रेलियन फलंदाज स्मिथ, लबुशेन आणि ट्रेव्हिस हेड सध्या महीशच्या चेंडूवर कसून सराव करत आहेत. यातून त्यांना फिरकीच्या चेंडूवर सर्वाेत्तम कामगिरीची आशा आहे. अलूर येथे तयार केलेल्या टर्निंग ट्रॅकवर हे सर्व फलंदाच महीशच्या चेंडूंचा सामना करत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ मालिका विजयासाठीचा आपला आत्मविश्वास मजबूत करताना दिसत आहे.
महीशला दिला ऑस्ट्रेलिया संघाने खास काॅल अश्विन आणि जडेजाच्या चेंडूंवर आपला संघ झटपट गारद हाेऊ नये म्हणून ऑस्ट्रेलिया संघ कसून सराव करत आहे. यादरम्यान अश्विनसारखीच गाेलंदाजी बडाेदा येथील २१ वर्षीय युवा गाेलंदाज महीश करताे, याची माहिती ऑस्ट्रेलिया संघाला मिळाली. त्यामुळे टीमने त्याला झटपट रिकाॅल करण्याचा निर्णय घेतला. त्याला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला गाेलंदाजी करण्यासाठी आणले आहे. येथील पाच दिवसांच्या कसून सरावानंतर ऑस्ट्रेलिया संघ नागपूरमध्ये दाखल हाेणार आहे. येथे टीम सलामीची कसाेटी खेळणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.