आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण:आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भोसले करणार भारताचे प्रतिनिधित्व

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ (पोखरा) येथे १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान सातव्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत औरंगाबादचे प्रसिद्ध जलतरणपटू राजेश भाेसले-पाटील भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते ५० वर्षांवरील गटात आपले कौशल्य पणाला लावतील.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते ४०० मीटर फ्रीस्टाइल, ८०० मीटर फ्रीस्टाइल, १५०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण क्रीडा प्रकारात सहभागी होईल. त्याचबरोबर मैदानी खेळात भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक प्रकारात मैदानात उतरतील. गतवर्षी मडगाव (गाेवा) येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत भोसले यांनी वरिल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

स्पर्धेसाठी एमजीएम येथील स्विमिंग पूलवर सराव करणारे राजेश भोसले हे गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत क्रीडा शिक्षक आहेत. ते महाविद्यालयीन जीवनात अॅथलेटिक्सचे उत्कृष्ट खेळाडू होते. आज वयाच्या ५० व्या वर्षीही तेवढ्याच उत्साहाने ते विविध स्पर्धेत सहभागी होतात. एवढेच नाही तर पदकही जिंकतात. विशेष म्हणजे गेल्या ३५ वर्षांपासून जलतरण करणाऱ्या भोसले यांचा खुल्या व सागरी जलतरणामध्ये हतखंडा आहे. त्यांनी सनरॉक ते गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा ते गेट वे ऑफ इंडिया या प्रसिद्ध स्पर्धेत सहभाग घेतला. तसेच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी जून २०२२ मध्ये सलग २४ तास जलतरण करण्याचा उपक्रम केला आहे.

बातम्या आणखी आहेत...