आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी २०२८ आणि २०३२ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रीयन खेळाडूंचा भारतीय संघातील टक्का वाढवण्यासाठी क्रीडा आयुक्त बकोरिया यांनी खास पुढाकार घेतला. यातूनच राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचा ३७१ सदस्यीय संघ खेलो इंडियामध्ये चॅम्पियनशिपची हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच स्पर्धेच्या तयारीसाठी खास ६१ लाखांचा खर्च करण्यात आला. सलग दोन वेळा सर्वाधिक पदकांची कमाई करून महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. २०१९ मध्ये सर्वाधिक २२८ व २०२० मध्ये २५६ पदके महाराष्ट्र संघाने जिंकली होती. यंदाच्या चौथ्या सत्रातही आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे खेळाडू आजपासून मैदानावर उतरणार आहेत. हरियाणाच्या पंचकुला येथे शनिवारपासून चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेला सुरुवात होत आहे. हरियाणानंतर महाराष्ट्राचा स्पर्धेत सहभागी होणारा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. पहिल्या सत्रात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी होता.
कबड्डी :विशाल नागरे, हरजीतच्या नेतृत्वात विजयी सलामी; यंदाही जिम्नॅस्टिकचा मोठा संघ
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष कबड्डी संघांची दमदार सुरुवात
अमरावतीच्या विशाल नागरे आणि हरजीत काैरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या पुरुष व महिला कबड्डी संघाने शुक्रवारी चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पहिल्याच सामन्यात आंध्र प्रदेशवर ४८-२९ ने मात केली. त्यापाठोपाठ महिला संघानेही एकतर्फी विजयाचा कित्ता गिरवला. महाराष्ट्र महिला संघाने सलामीला झारखंड टीमवर ६०-१५ ने विजय संपादन केला. विजयात कर्णधार हरजीतने ११ व ऋतुजाने ८ गुणांचे मोलाचे योगदान दिले.
गुणवत्तेसाठी २ कोटीं; संघ थेट विमानाने स्पर्धेच्या ठिकाणी रवाना
महाराष्ट्राच्य युवा खेळाडूंनी पहिल्या सत्रापासून खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या काैशल्याची चुणुक दाखवली. महाराष्ट्र संघाने पदार्पणातच १११ पदकांसह पहिल्या सत्राच्या स्पर्धेत पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले होते. त्यानंतर सलग दोन्ही वर्षे महाराष्ट्र संघ पदकतालिकेत अव्वलस्थानी आहे. त्यामुळे हेच साेनेरी यश कायम ठेवण्यासाठी यंदा २ कोटींचा खर्च करण्यात आला. यामध्ये २० खेळ प्रकारांतील खेळाडूंच्या सरावावर ६१ लाखांचा खर्च करण्यात आला. खेळाडूंना स्पर्धेतील सहभागासाठी थेट विमानाने रवाना करण्यात आले, अशी माहिती क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
ऑलिम्पियन खेळाडूंची संख्या वाढणार : आयुक्त
^महाराष्ट्रातील युवा खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. याच्या बळावर महाराष्ट्रातील ऑलिम्पियन खेळाडूंची संख्या २०२८ आणि २०३२ दरम्यान वाढलेली असेल. या दृष्टीने सध्या युवा खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करत आहे. याचा निश्चित असा मोठा फायदा या युवा खेळाडूंना होणार आहे.
ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त
महाराष्ट्राचे सलग दुसऱ्यांदा वर्चस्व
वर्ष पदके सुवर्ण रौप्य कांस्य
२०१९ २२८ ८५ ६२ ८१
२०२० २५६ ७८ ७७ १०१
महाराष्ट्र संघाने आतापर्यंत सलग दोन वेळा खेलो इंडिया स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. घरच्या मैदानावरील दुसऱ्या सत्राच्या व गुवाहाटी येथे तिसऱ्या सत्राच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघ चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला होता. यजमान महाराष्ट्राने दुसऱ्या सत्राच्या स्पर्धेत पुण्यात सर्वाधिक २२८ पदके जिंकली होती. यात ८५ सुवर्णांसह ६२ रौप्य व ८१ कांस्यचा समावेश होता. त्यानंतर महाराष्ट्राने गुवाहाटीत ७८ सुवर्णांसह २५६ पदकांची कमाई केली.
२० खेळ प्रकार ३७१ खेळाडू १९३ महिला खेळाडू १७८ पुरुष खेळाडू ४५ खेळाडू जिम्नॅस्टिकमध्ये
चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राचा ४५ सदस्यीय जिम्नॅस्टिक संघ सहभागी झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.