आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Premier League |Mumbai Indians | IPL 2023 | Jofra Archer Out | Chris Jordan

IPL 2023:मुंबई इंडियन्सच्या आयपीएल मोहिमेला धक्का, वेगवान इंग्लिश गोलंदाज स्पर्धेबाहेर, ख्रिस जॉर्डनची होणार एन्ट्री

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई इंडियन्सच्या IPL 2023 मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या संघातील आघाडीचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर पडला आहे. मुंबईने 2022 मध्ये जोफ्रा आर्चरला 8 कोटी रुपयांना विकत घेतले. आता त्याच्या जागी ख्रिस जॉर्डनचा संघात समावेश करण्यात आला आहे. जोफ्रासाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही.

जोफ्रा या आयपीएलमध्ये 5 सामने खेळला. त्यात त्याला केवळ 2 विकेट्स मिळाल्या. 2022 च्या आयपीएल हंगामातही जोफ्रा मुंबई इंडियन्ससाठी एकही सामना खेळू शकला नव्हता. जोफ्रा आर्चरला सातत्याने फिटनेसच्या समस्येशी सामना करावा लागत आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) त्याच्या फिटनेसवर सातत्याने लक्ष ठेवून होते. मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडल्याल्यानंतर जोफ्रा आता मायदेशी परतणार आहे. तिथे त्याच्या रिहॅब प्रोसेस सुरू होईल. दुसरीकडे, ख्रिस जॉर्डन आता उर्वरित सामन्यांमध्ये मुंबई संघासोबत उपस्थित राहील.

गत आयपीएलमध्ये ख्रिस जॉर्डनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण, त्याला कुणीही खरेदीदार सापडला नाही. जॉर्डन यापूर्वी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे.

ख्रिस जॉर्डन व जोफ्रा आर्चर इंग्लिश खेळाडू

34 वर्षीय जॉर्डनने आयपीएलमध्ये एकूण 28 सामने खेळलेत. त्यात त्याला 27 विकेट्स मिळाल्या. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या ख्रिस जॉर्डनने आतापर्यंत इंग्लंडसाठी 8 कसोटी, 35 एकदिवसीय व 86 टी-20 सामने खेळले आहेत.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 10 सामने खेळलेत. त्यात त्यांचा 5 सामन्यांत विजय झाला आहे. मुंबईचा संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर आहे. आज (9 मे) मुंबईची वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी लढत होणार आहे. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.