आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील नंबर वन बॉक्सर अमित पंघाल टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला लागला आहे. ५२ किलो गटात पंघालने नुकत्याच जर्मनीतील विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण जिंकले. पंघालने लॉकडाऊनदरम्यान सराव व फिटनेसवर प्रशिक्षक अनिल धनकड यांच्यासोबत काम केले. तो आपल्या प्रशिक्षकासोबत ऑलिम्पिकची तयारी कायम ठेवू इच्छितो. त्याच्या प्रशिक्षकाला अद्याप राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही. तो म्हणाला, राष्ट्रीय शिबिरात त्याच्या प्रशिक्षकांना स्थान मिळाले नाही तर आपणही शिबिरात सहभागी होणार नाही. पंघालशी झालेल्या चर्चेतील भाग....
> कोराेनानंतर पहिल्या स्पर्धेत खेळला, काय वेगळेपणा जाणवला?
यावर्षी फेब्रुवारीत अखेरची स्पर्धा खेळली होती आणि आता थेट डिसेंबरला रिंगमध्ये उतरलो. अनेक महिन्यांनी खेळण्यासाठी उतरल्याने खूप वेगळा अनुभव आला. २०१७ नंतर दीर्घ विश्रांती मिळाली. कोरोना व लाॅकडाऊनमुळे सराव चांगला झाला नाही. त्यानंतर राष्ट्रीय शिबिर सुरू झाले आणि तेथे सहकारी उपलब्ध नाही. सहकारी नसल्याने आमचा सराव न झाल्यासारखा होता. २ महिने विदेशात गेल्यावर सहकाऱ्यांसोबत जो सराव झाला त्यामुळे आत्मविश्वास वाढला. विना सहकारी बॉक्सिंग होऊ शकत नाही. तेथे आम्ही सहकाऱ्यांसोबत कमी वेळेत जेवढे शक्य होते तेवढे शिकण्याचा प्रयत्न केला.
> तू ७-८ महिन्यांनंतर रिंगमध्ये परतला, काय अडचणी आल्या?
रिंगमध्ये पुनरागमन करताना अडचणी आल्या नाहीत. स्पर्धेसाठी आम्ही तयार होतो. माझा प्रतिस्पर्धी चांगला हाेता व जागतिक स्तरावर पदक जिंकलेला होता. मी जागतिक स्पर्धेत ज्या प्रकारे खेळलो होतो तसाच खेळ केला. मी त्याला पाहूनच तयारी केली होती व जसा विचार केला तसेच घडले. मी सुवर्ण जिंकले व त्यामुळे आत्मविश्वास वाढला. माझी तयारी वाया गेली नाही. विश्रांतीदरम्यान सरावाचा फायदा झाला.
> देशात अद्याप स्पर्धा सुरू झाल्या नाहीत. त्याचा काय परिणाम होतो?
खेळाडूंवर त्याचा निश्चित परिणाम हाेतोय. भारतात स्पर्श हाेणारे खेळ सुरू झाले नाहीत. मात्र, विदेशात सुरू झाले आहेत. आपल्या खेळाडूंना स्पर्धा मिळाल्या नाहीत तर ते मागे पडतील. त्यामुळे थोडेफार नुकसान होणारच. विश्रांती काळात युवा खेळाडूंचा तोटा होतोय.
> खेळ सुरू करण्याबाबत तुझे मत काय? सध्या चांगला सराव होत नाही का?
ऑलिम्पिक पात्रता मिळवलेल्या खेळाडूंवर त्याचा खूप परिणाम होतोय. ऑलिम्पिकसाठी आम्हाला अधिक सरावाची गरज आहे व अनेक सहकारी हवेत. ऑलिम्पिक छोटी स्पर्धा नाही. त्यासाठी आपण कितीही सराव केला तरी कमीच पडतो. सरावादरम्यान सतत सहकारी बदलला तर फायदा होतो. केवळ ४-५ महिने महत्त्वाचा वेळ आपल्या हातात आहे. हीच वेळ सर्व काही बदलू शकते.
> लॉकडाऊनदरम्यान काय केले व विश्वचषकाची तयारी कशी केली?
मी लॉकडाऊनदरम्यान एकही दिवस सराव बंद केला नाही. माझ्या प्रशिक्षकासोबत नियमित सराव करत होतो. मी अनेक त्रुटी दूर केल्या. विश्वचषकापूर्वी प्रशिक्षकाशी चर्चा केली व सल्ला घेतला. त्याचा मला फायदा झाला.
> तुझ्या प्रशिक्षकांना अद्याप राष्ट्रीय शिबिरासाठी परवानगी मिळाली नाही?
अनेक वेळा माझे प्रशिक्षक अनिल धनकड यांना राष्ट्रीय शिबिरात सहभागी करण्याची विनंती केली. मात्र, मला अद्याप लेखी परवानगी मिळाली नाही. अनेक खेळाडूंना तयारीसाठी वैयक्तिक प्रशिक्षक, फिजिओ व ट्रेनर मिळाले, परंतु मला परवानगी दिली जात नाही? पुढील राष्ट्रीय शिबिरात माझ्या प्रशिक्षकांना स्थान मिळाले नाही तर मीदेखील शिबिरात सहभागी होणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.