आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय फुटबॉलसाठी आजचा दिवस काळा:फिफाकडून भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाने एकत्रितपणे काम केले तरच निलंबन मागे घेतले जाईल, असे फिफाच्या वतीने सांगण्यात आले आहे. बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे फिफाने नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.

भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. फिफाने निलंबन केल्यामुळे, भारत यापुढे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही किंवा कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. मोठा धक्का म्हणजे महिलांचा अंडर 17 वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होता. आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकत नाही, असे फिफाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

तरच बंदी उठवणार
राष्ट्रीय संघटनेचे सदस्य हे सरकार आणि न्यायपालिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त राहिले पाहिजेत, अशी ‘फिफा’ची भूमिका आहे. त्यामुळे एआयएफएफ (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) ने आपली कार्यकारिणी जाहीर केली तरच हे निलंबन मागे घेण्यात येईल, असे फिफाने म्हटले आहे. 2017मध्ये ‘फिफा’ने पाकिस्तान फुटबॉल महासंघाला निलंबित केले होते. न्यायालयाने प्रशासक नेमल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झाली होती.

फिफा काय आहे?
फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरुपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणाऱ्या या संघटनेची स्थापना 21 मे 1904 रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या 209 इतकी आहे. फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत.

प्रफुल्ल पटेल संपुर्ण वादाला कारणीभूत
2004 मध्ये काँग्रेस सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले प्रफुल्ल पटेल यांना 2009 मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदावरून काढून टाकेपर्यंत ते अध्यक्ष राहिले. भारतीय क्रीडा संहितेनुसार कोणतीही व्यक्ती 3 पेक्षा जास्त वेळा अध्यक्ष होऊ शकत नाही. अध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतरही पटेल यांनी नवीन अध्यक्ष निवडेपर्यंत आपला कार्यकाळ वाढवावा, अशी मागणी करणारी याचिकाही दाखल केली. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत प्रशासकांची समिती फुटबॉलच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने (CoA) निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. 28 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे.

28 ऑगस्ट रोजी निवडणूक
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आणि भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भास्कर गांगुली यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एआर दाबे यांना या समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे. प्रफुल्ल पटेल यांना फिफा आणि शिया फुटबॉल कॉन्फेडरेशन (एएफसी) मधील त्यांच्या सर्व पदांवरून काढून टाकण्याची शिफारस सीओएने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. प्रफुल्ल पटेल राज्य संघटनांच्या संगनमताने निवडणुका होऊ देत नाहीएत, असा आरोप आहे. न्यायालयीन कामकाजात देखील ते हस्तक्षेप करत आहेत. उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य फुटबॉल संघटनांना स्पष्ट इशारा दिला आहे. अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकांमध्ये राज्य संघटनांनी सहभाग घेतल्यास न्यायालयही स्वतःहून कारवाई करेल.

बातम्या आणखी आहेत...