आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र संघाला यंदा चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघ ४५ सुवर्णांसह एकूण १२५ पदकांसह स्पर्धेच्या पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला. यजमान हरियाणा संघाने सर्वाधिक १३७ पदकांसह चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. यामध्ये ५२ सुवर्णपदकांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी बाॅक्सिंगमध्ये सर्वाधिक ९ सुवर्णपदकांची कमाई करत हरियाणा संघाने पदकतालिकेत महाराष्ट्राला मागे टाकले. यातून हरियाणा संघाला तब्बल चार वर्षांनंतर खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अव्वल स्थान गाठता आले. तसेच महाराष्ट्र संघ चार वर्षांनंतर पदकतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला. यापूर्वी दोन्ही संघांनी २०१८ मधील दिल्ली येथील पहिल्या सत्राच्या स्पर्धेत हे यश संपादन केले हाेते. महाराष्ट्र संघाला साेमवारी अवघ्या तीन सुवर्णपदकांची कमाई करता आली. महाराष्ट्र संघाने खाे-खाेमध्ये दोन सुवर्णपदके आपल्या नावे केली. त्यामुळे खाे-खाेमध्ये महाराष्ट्र संघ सुवर्णपदकासह सर्वसाधारण विजेतपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांनी फायनलमध्ये आेडिशाच्या दोन्ही संघांना पराभूत केले.
रामजीचे कुशल नेतृत्व; महाराष्ट्र डावाने विजयी
साेलापूरच्या युवा कर्णधार रामजीने कुशल नेतृत्वातून स्पर्धेतील खाे-खाेमधील महाराष्ट्र संघाचे साेनेरी यश कायम ठेवले. त्याच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये आेडिशाचा पराभव केला. महाराष्ट्राने एक डाव आणि तीन गुणांनी सामना जिंकून जेतेपद मिळवले. पहिल्याच डावात ओडिशाला फॉलोअॉन मिळाल्याने सामन्याचा निकाल महाराष्ट्राच्या बाजूने झुकला होता. पहिल्या डावात आक्रमण करताना महाराष्ट्राने तब्बल १४ गडी बाद केले. ओडिशाला पहिल्या डावात अवघे सहा गडी बाद करता आले. या डावात ८ गुणांच्या आघाडीसह ओडिशाला फॉलोअॉन मिळाला. रामजी कश्यपने १.५० पळती करून चार गडी बाद केले. आकाश तोगरे १.२० पळती, रोहन कोरेची एक मिनिट पळती आणि दोन गडी बाद, शुभम थोरातची २ मिनिटे पळती आणि १ गडी बाद, आदित्य कुदळेने १.४० पळती करून एक गडी बाद केला. नरेंद्र कातकडेनेही चमक दाखवली. त्याने एक मिनिट संरक्षण करीत १ गडी माघारी धाडला. अर्णव पाटणकरने दोन गडी टिपत १ मिनिट संरक्षण केले. ऋषिकेश शिंदेनेही एक मिनिट पळतीचा खेळ करून संघाचे संरक्षण अभेद्य ठेवले.
बॉक्सिंगमध्ये सुरेशला सुवर्ण, तीन रौप्य
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राला गोल्डन चौकाराची अपेक्षा होती. मात, १ सुवर्ण व ३ राैप्य मिळाले. सुरेश विश्वनाथ सुवर्ण पटकावले. महाराष्ट्राच्या व्हिक्टर सिंग, विजयसिंग कुणाल घोरपडेने प्रत्येकी एक राैप्यपदके जिंकली.
टेटेमध्ये दीपितला कांस्यपदक
शेवटच्या दिवशी टेबल टेनिसमधील एकच लढत उरली होती. कांस्यपदकासाठी महाराष्ट्राच्या दीपित पाटील आणि दिल्लीच्या आदर्श ओम क्षेत्री यांच्यात लढत झाली. त्यात दीपितने महाराष्ट्राला कांस्यपदक पटकावून दिले. त्याने क्षेत्रीचा ४ विरुद्ध ० असा पराभव केला.
प्रीती काळेची सर्वाेत्तम खेळी; महाराष्ट्र चॅम्पियन
डावललेल्या प्रीती काळेनेच महाराष्ट्राच्या साेनेरी यशात माेलाचे याेगदान दिले. मिळालेल्या संधीला सार्थकी लावत तिने लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्राने फायनलमध्ये आेडिशाचा एक गुणाने पराभव केला. प्रीती काळेने १ मिनिट ४५ व २ मिनिटे ४० पळतीचा खेळ करीत २ गडीही बाद केले. संपदाने दोनदा दीड मिनिट व एक मिनिट दहा सेकंद बचाव केला. त्यानंतर सहा गडी बाद करून विजयात मोठा वाटा उचलला. तसेच कौशल्या पवार १.५०, १.४०, १.३० पळती व २ गडी बाद केले. जान्हवी पेठे - १.३५, १.३०, २.१०, श्रेया पाटील - १.१०, १.१० व तीन गडी टिपले. वृषाली भोयेने ४ गडी बाद करून सामना फिरवला. गौरी शिंदेने २ गडी तंबूत धाडले. दीपालीने एक मिनिट पळतीचा खेळ करीत २ गडी टिपले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.