आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुण्यातील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याच्या कार्याला आता वेग येणार आहे. या विद्यापीठासाठी विधिमंडळात सादर केलेल्या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता अंदाजे चारशे कोटी चा खर्च करून पुण्यामध्ये क्रीडा विद्यापीठ होणार आहे. या विद्यापीठांमध्ये सुरुवातीच्या स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स ,स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. या विद्यापीठासाठी सुमारे दोनशे पन्नास विविध प्रकारची पदे भरण्यात येणार आहेत. क्रीडामंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील बालेवाडी येथे आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे.
इमारतीसाठी चारशे कोटींचा खर्च
विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२००.०० कोटी याप्रमाणे एकूण रु. ४००.०० कोटी खर्च अपेक्षित आहे.
माजी कुलगुरू डॉ. खोले यांच्या नेतृत्वात समिती
या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयक मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली.
पहिल्याच वर्षी दीडशे विद्यार्थ्यांना प्रवेश
विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स ,स्पोर्टस टेक्नॉलॉजी व स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील. यामुळे शारिरीक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाची व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारिरीक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल.
पहिल्या वर्षी 133 पदे
विद्यापीठासाठी सध्याच्या आवश्यकतेनुसार ५ वर्षांकरिता २१३ पदे ( नियमित वेतनश्रेणीतील १६६ पदे व ठोक वेतनावरील ४७ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये कुलगुरु, रजिस्ट्रार त्यांची कार्यालयीन पदे, शिक्षकीय पदे व प्रशासकीय पदे यांचा समावेश आहे. यापैकी पहिल्या वर्षी १३३ पदे (नियमित वेतनश्रेणीतील १०० पदे व ठोक वेतनावरील ३३ पदे) निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच मानधनावरील विशेष तज्ञ देखील आंमत्रित करण्याबाबत अधिनियमात तरतूद असल्याचे केदार यांनी यावेळी सांगितले
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.