• Home
  • Sports
  • IOC under pressure; 6 nation association with the United States demands for Olympic postponement

आयओसी दबावात; अमेरिकेसह 6 देशांच्या संघटनेची ऑलिम्पिक स्थगितीची मागणी

  • अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि नाॅर्वेच्या संघटनांचा आक्रमक पवित्रा
  • जपानला २४ जुलैपासून ऑलिम्पिकचे आयाेजन

दिव्य मराठी वेब टीम

Mar 23,2020 09:30:00 AM IST

पॅरिस : कोरोना व्हायरसचा धाेका वेगाने वाढत आहे. हा धाेका लक्षात घेऊन खेळाडूंच्या आराेग्यासाठी आता टाेकियाेतील ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करावी, अशी मागणी अमेरिकेसह सहा देशांच्या सात संघटनांनी केली आहे. अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि नार्वेच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्थगितीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे व्हायरसचा धाेका वाढत असताना या स्पर्धेच्या आयाेजनाला स्थगिती देण्यासाठीचे लेखी पत्रही आता आयओसीला देण्यात आले आहे. सहा देशांच्या सात संघटनांच्या या भूमिकेमुळे आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) प्रचंड दबावात आली आहे. येत्या २४ जुलैपासून स्पर्धेला जपानमध्ये सुरुवात हाेणार आहे.


खेळाडूंच्या अडसराची माहिती मागवली


आता काेराेना व्हायरसमुळे काेणत्या खेळाडूंच्या सरावावर परिणाम झाला आहे. याच्या अडसरामुळे किती खेळाडूंना आपल्या सरावाला थांबवावे लागले, याची माहिती आयओसीने आपल्या सदस्य देशांकडून लेखी स्वरूपात मागवली.


स्पर्धा स्थगितीचा निर्णय विचाराधीन


टाेकियाे ऑलिम्पिक स्पर्धा स्थगितीबाबतचा निर्णय हा विचाराधीन आहे. यासाठीचे एक पॅनल सखाेल अभ्यास करत आहे. त्यामुळे सारासार अभ्यास करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती स्पर्धा आयाेजकाच्या वतीने देण्यात आली.


क्रीडा ज्याेत पाहण्यास ५० हजार चाहते हजर


जपानमध्ये शनिवारी ऑलिम्पिकची क्रीडा ज्याेत दाखल झाली. यादरम्यान मियामीच्या सेंडई सेंटरमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक चाहते उपस्थित हाेते. त्यांनी जल्लाेषात स्वागत केले. आता ज्याेतीच्या रॅलीला २६ मार्च राेजी सुरुवात हाेईल.


आयाेजनाची वेळ अवघड; मात्र कसून सराव करतेय : मनू


काेराेना व्हायरसमुळे सध्या दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर हाेत आहे. अशात स्पर्धा आयाेजनासाठी ही अवघड वेळ आहे. मात्र, असे असतानाही मी या स्पर्धेच्या तयारीसाठी कसून सराव करत आहे, अशी प्रतिक्रिया ऑलिम्पिक काेटा मिळवून देणारी १८ वर्षीय युवा नेमबाज मनू भाकरने दिली. अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे सरावाला अडचणीत येत आहेत. दुसरीकडे वेटलिफ्टर मीराबाई चानूने ऑलिम्पिक स्थगितीबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली. ही स्पर्धा रद्द झाल्यास पदक जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरले जाईल, असे मीराबाई म्हणाली.

X