आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kho Kho Competition : Need To Increase Stamina And Strength For Competition On Mats: Dr. Wagh

कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा:मॅटवरील स्पर्धेसाठी स्टॅमिना व ताकद वाढवणे गरजेचे : डॉ. वाघ

भुवनेश्वर (अजितकुमार संगवे)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इनडोअर व आउटडोअरमुळे निर्णय क्षमतेत फरक

खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धा यापुढे मॅटवर होणार असल्यामुळे मॅटवर सराव करणं जास्त महत्त्वाचं आहे. ते करत असताना शूज घालून खेळणे, स्टॅमिना, शरीराची ताकद आणि मानसिकता वाढविणे या बाबींचा विचार खेळाडू व प्रशिक्षकांनी करणे गरजेचे आहे, असा सल्ला महाराष्ट्र खो खो संघाचे वैद्यकीय सल्लागार डॉ. किरण वाघ यांनी दिला

येथे झालेल्या चाळीसाव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो खो संघटनेने कुमार गटासाठी प्रथमच वैद्यकीय सल्लागार नियुक्त केला होता. 'दिव्य मराठी'शी बोलताना डॉ. वाघ यांनी हा सल्ला खेळाडू व प्रशिक्षकांना दिला. ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्राच्या स्पर्धा मातीवर झाल्या. सराव थोडे दिवसच मॅटवर झाला. महाराष्ट्राच्या खेळाडूंकडे स्किल आहे. परंतु भरपूर प्रमाणात स्टॅमिना व शारीरिक क्षमता या गोष्टी वाढवणंआणि दुखापती होऊ न देणे या गोष्टीचा विचार त्यांना करावा लागणार आहे. दुखापती होऊ नये यासाठी एक्झरसाइज व स्ट्रेचिंग करणे यावर त्यांना भर देणे गरजेचे राहणार आहे "

खेळाडूंचे आरोग्य चांगले ठेवून त्यांच्या कामगिरीवर काय परिणाम होतो याचा विचार करणे महत्त्वाचे असते हे सांगून डॉ. वाघ पुढे म्हणाले," स्पर्धेच्या वेळी कोविड१९ या आजाराचे सर्व प्रोटोकॉल पाळण्यात आले. भुवनेश्वर येथील वातावरण खूपच दमट असल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होत होते. त्यामुळे 'सोडियम पोटॅशियम'सारखे इलेक्ट्रोलाईट कमी जास्त होतात. या स्पर्धा इनडोर स्टेडियममध्ये होत्या. ते स्टेडियम पत्र्याचे होते, व्हेंटिलेशन कमी होते आणि फ्लड लाईटचे प्रमाणही जास्त होते. विशेष म्हणजे या स्पर्धा संपूर्णपणे मॅटवर खेळविण्यात आल्या.

मातीच्या मैदानावर आणि मॅटवर या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. मॅटवर खेळाडूंना दुखापती होण्याचे प्रमाण जास्त असते. जसं की पाय मुरगळने, पायाची बोटे दूमडने, खुब्याची सांधे दुखवणे,जास्त प्रमाणात थकवा जाणवणे आणि पायाला गोळे येणे या गोष्टी जास्त प्रमाणात होतात. त्याच गोष्टी मातीच्या मैदानावर खेळताना खूप कमी प्रमाणात होतात. जो खेळाडू मातीच्या मैदानावर दोन मिनिटे संरक्षण करू शकत होता तो मॅटवर फक्त एकच मिनिटात थकू शकतो."

इनडोअर व आउटडोअरमुळे निर्णय क्षमतेत फरक
महाराष्ट्राचे प्रशिक्षक राजेंद्र साप्ते, सचिन चव्हाण व सोमनाथ बनसोडे या मार्गदर्शकांना मदत होईल या दृष्टीने खेळाडूंचा विचार करून प्रत्येकाला किती वेळ खेळू द्यावे आणि किती वेळ आराम द्यावा, याचे नियोजन कसे केले हे सांगताना डॉ. वाघ म्हणाले, "स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये होती. त्यामुळे खेळाडूच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. मेंदूमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे खेळाडूंची निर्णय क्षमता कमी होते. त्यामुळे त्याच्याकडून जास्त चुका घडतात. तीच गोष्ट आउटडोर मॅचेसमध्ये होत नाहीत. खोखो खेळामध्ये खेळाडूला निर्णयक्षमता "प्रेझेन्स ऑफ माइंड" हे असने खूप गरजेचे आहे आणि त्याला क्षणात निर्णय घेऊन त्यानुसार कृती करायची असते. असे घडलं तरच खेळाडूची कामगिरी चांगली होणार आहे आणि संघाला त्याची मदत होणार आहे. त्यामुळे सामना चालू असताना सोडियम आणि पोटॅशियम हे घटक असलेले 'ओ.आर.एस.'चे पाणी पिण्यास देणे, पायांना बर्फाने शेक देणे या गोष्टी करने खूप गरजेचे होते. दिवसभर खेळाडूच्या शरीरातून घामाच्या धारा निघत होत्या, शरीरातील पाणी खूप कमी होत होते. यावर सर्व खेळाडूंना भरपूर प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला तसेच आहारात अंडी, केळी, नारळाचे पाणी, संत्री, सलाड या गोष्टींचा सेवन होत असल्यामुळे खेळाडूंना बाकीच्या आजारापासून वाचवता आले. या बाबीवर महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी चांगलं वर्कआऊट केलं. त्याचा महाराष्ट्राच्या दोन्ही संघाला फायदा झाला."

बातम्या आणखी आहेत...