आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी दिग्गज मल्ल सोमवारी साताऱ्यात दाखल झाले आहेत. स्पर्धेत गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षल सदगीर आपला किताब राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याला रोखण्यासाठी माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिकसह जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता युवा मल्ल पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर), सिकंदर शेख व माउली जमदाडे (सोलापूर), आदर्श गुंड (ठाणे ), सागर बिराजदार (उस्मानाबाद ), गत उपविजेता शैलेश शेळके (लातूर) हे सर्व प्रमुख दावेदार सज्ज झाले आहेत. यंदा घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दावेदार किरण भगतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.
तब्बल ६१ वर्षांनंतर साताऱ्यात महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगत असून या कुस्तीचा थरार मंगळवारपासून सातारकर कुस्तीशौकिनांना अनुभवता येणार आहे. कुस्तीशौकिनांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९.३० वाजेदरम्यान दोन सत्रांमध्ये ३ गादीच्या व २ मातीच्या अशा एकूण ५ आखाड्यांमध्ये या कुस्त्या रंगणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्पर्धेसाठी प्रयत्न करणाऱ्या साताऱ्याला यंदा स्पर्धेचे यजमानपद मिळाले. तालीम संघाने या स्पर्धेचे कल्पक नियोजन केले असून या संपूर्ण पाच दिवसांच्या स्पर्धेवर तब्बल तीन कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सातारा जिल्हा तालीम संघाचे निमंत्रक दीपक पवार यांनी सांगितले.
स्पर्धेत केसरीसह विविध वजन गटात ९०० मल्ल सहभागी होतील. पहिल्या दिवशी पंचांचा उजळणी वर्ग होईल. त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण ४५ संघांचे आगमन आणि त्यांची नोंदणी, दुपारी १२ ते २ कुस्तीगिरांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. मंगळवारी सायंकाळी ५७ किलो, ७० किलो आणि ९२ किलो वजन गटातील सामने सुरू होतील, असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे समन्वयक ललित लांडगे आणि सुधीर पवार यांनी सांगितले.
सुरक्षेसाठी ५५० पोलिस तैनात, मैदान सज्ज
खेळाडू, प्रेक्षक, स्पर्धेच्या सुरक्षेसाठी जवळपास ५५० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. येथील स्टेडियममध्ये ५५ हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली. लढतीसाठी ५ आखाडे सज्ज झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शाहू स्टेडियमवर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.