आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Kesari Wrestling Championship To Be Held In Satara From April 5| Marathi News

दिव्य मराठी विशेष:कुस्ती स्पर्धेचा थरार, उद्यापासून 900 मल्ल गदेसाठी लढणार, 5 एप्रिलपासून साताऱ्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुप्रतीक्षित महाराष्ट्र केसरी आणि कनिष्ठ व वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार येथील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये ५ एप्रिलपासून रंगणार आहे. साताऱ्याच्या आखाड्यात विविध गटात ९०० मल्ल झुंजणार आहेत. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला.

तब्बल ५९ वर्षांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. ही स्पर्धा ५ ते ९ एप्रिलला जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व सातारा जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यभरातून ९०० मल्ल, १०० पंच आणि संघ व्यवस्थापक असे एकूण ११०० जण येणार आहेत. त्यांची निवास व्यवस्था, रयत शिक्षण संस्थेची वसतिगृहे, शाळा व शासकीय आयटीआय येथील वसतिगृह येथे करण्यात आली आहे. आयटीआय येथे जेवणाची व्यवस्था असेल. त्याचबरोबर पंच आणि अधिकाऱ्यांची वेगळी व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुलातील वसतिगृहात करण्यात आली आहे.

५ आखाडे सज्ज, ५० हजार प्रेक्षक व्यवस्था
या स्पर्धेसाठी एकूण ५ आखाडे तयार करण्यात आले आहेत. यात २ मातीच्या आणि ३ गादीच्या मैदानावर सामने होतील. त्याचबरोबर मैदानावर ५० हजार प्रेक्षक बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मार्गदर्शक फलके व बॅनर लावण्यात आली आहेत. प्रशिक्षक, खेळाडू आणि व्हीआयपी व्यक्तींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. ‘स्पर्धेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.’

बातम्या आणखी आहेत...