आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्राच्या गुणवंत खेळाडू राही सरनाेबतसह तेजस्विनी सावंत अाणि स्वप्निल कुसाळेने अापल्या अव्वल कामगिरीतून अायएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत गाेल्डन हॅट्ट्रिक साधली. काेल्हापूरच्या या तिन्ही सुपरस्टार नेमबाजांनी विश्वचषकात अापल्या इव्हेंटमध्ये सांघिक गटातून सुवर्णपदकाची कमाई केली. अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंतने अापल्याच देशाच्या संजीव राजपूतसाेबत ५० मीटर रायफल थ्री पाेझिशनच्या मिश्र गटात सुवर्णपदकाची कमाई केली. दुसरीकडे काेल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यासह यजमान भारतीय संघाला अापल्या घरच्या रेंजवरील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत वर्चस्व कायम ठेवता अाले. दाेन दिवसांपूर्वी राहीने २५ मीटर पिस्तूल प्रकारातील टीम इव्हेंटमध्ये सुवर्ण व वैयक्तिक राैप्य जिंकले.
भारतीय संघाने आयएसएसएफ नेमबाजी विश्वकपच्या आठव्या दिवशी तेजस्विनी सावंतच्या एका सुवर्णासह एकूण २ सुवर्णपदके आपल्या खात्यात जमा केली. त्याचबरोबर एक रौप्य व एक कांस्यपदक जिंकले. भारतीय संघ १२ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्यसह एकूण २५ पदकांसह तालिकेत अव्वलस्थानी आहे. भारताचा मिश्र संघ व पुरुष संघ ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पहिल्या स्थानी राहिला. अनुभवी संजीव राजपूत व तेजस्विनी सावंतच्या जोडीने युक्रेनच्या सेरहिए कुलिश-एना इलिनाला ३१-२९ ने पराभूत करत सुवर्ण मिळवले. या प्रकारातील कांस्यपदकदेखील भारताने जिंकले. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर व सुनिधी चौहान जोडीने अमेरिकन जोडीला ३१-१५ ने हरवत कांस्यपदक आपल्या नावे केले. ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये नीरज कुमार-स्वप्निल कुसाळे-चैन सिंग या पुरुष संघाने अमेरिकेच्या संघाला पराभूत करत सुवर्ण जिंकले. भारतीय संघाने निकोलस मोरर- शेरी-पॅट्रिकला ४७-२५ ने मात दिली. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये विजयवीर सिद्धूने अंतिम फेरीत पराभवानंतर राैप्यपदकाची कमाई केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.