आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Maharashtra Won 11 Gold Medals On The Same Day; First To Win 5 Golds In Gymnast Joint Debut

विक्रमाचा गोल्डन धमाका:महाराष्ट्राने एकाच दिवशी जिंकली 11 सुवर्णपदके; जिम्नॅस्ट संयुक्ता पदार्पणातच 5 सुवर्ण जिंकणारी पहिली

पंचकुला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत चॅम्पियन महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया यूथ गेम्समधील आपली सोनेरी यशाची कामगिरी कायम ठेवताना विक्रमाचा पल्ला गाठला. यादरम्यान चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया स्पर्धेत युवा जिम्नॅस्ट संयुक्ता काळेसह महाराष्ट्र संघाने मंगळवारी सर्वाेत्तम कामगिरीच्या बळावर विक्रमाचा डबल गाेल्डन धमाका उडवला. महाराष्ट्र संघाने एकाच दिवशी विक्रमी ११ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम गाजवला.

याचबरोबर ठाण्याच्या युवा संयुक्ताने आपल्या पदार्पणातील खेलो इंडिया स्पर्धेत ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये पाचही सुवर्णपदके जिंकण्याच्या विक्रमाला गवसणी घातली. मंगळवारी तिची स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. जिम्नॅस्टिकमध्ये पाचही सुवर्णपदकांचा बहुमान पटकावणारी संयुक्ता ही स्पर्धेतील पहिलीच खेळाडू ठरली. याशिवाय साताऱ्याची सुदेष्णा शिवणकर ही यंदाच्या स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटू ठरली. याच कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाने दिवसअखेर ११ सुवर्णांसह एकूण २० पदकांची कमाई केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाच्या नावे पदकतालिकेत सर्वाधिक २४ सुवर्णपदकांची नोंद झाली. महाराष्ट्र संघाने सुवर्णपदकांमध्ये एकाने यजमान हरियाणा संघावर आघाडी घेतली आहे. अव्वल स्थानावरील हरियाणा संघाची २३ सुवर्णपदके आहेत. महाराष्ट्र संघाने पाचव्या दिवशी मंगळवारी जिम्नॅस्टिकसह बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कबड्डी, सायकलिंग आदी खेळ प्रकारांमध्ये पदकांची कमाई केली. यामध्ये जिम्नॅस्टिकमधील पाच सुवर्णपदके लक्षवेधी ठरली. तसेच दर्शन पुजारीने बॅडमिंटन स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. अॅथलेटिक्समध्ये कोल्हापूरचा अनिकेत माने व सुदेष्णा शिवणकरने चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला.

साताऱ्याची सुदेष्णा शिवणकर खेलो इंडिया यूथ गेम्समधील सर्वात वेगवान धावपटू ठरली. तिने महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या गटात चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. तिने ११.७९ सेकंदात निश्चित अंतर गाठले. तिने प्रतिस्पर्धी अवंतिलाला मागे टाकले. तिने स्पर्धेत एकाच दिवशी दाेन सुवर्णपदके जिंकली. तिने ४ बाय १०० रिलेमध्येही चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे.

पूजाचे वर्चस्व कायम : कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सायकलिंगमधील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. त्यामुळे तिला सलग दुसऱ्या दिवशी आपल्या नावे पदकाची नोंद करता आली. तिने ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात पूजा दानोळेने रौप्यपदक पटकावले.

क्रीडा आयुक्तांकडून अभिनंदन
क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना फोन करून पदकासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा संघ हरियाणात दाखल झाल्यापासून ते त्यांच्या निवास आणि भोजन व इतर बाबींचा आढावा घेत आहेत.

संयुक्ताची पदार्पणात विक्रमाला गवसणी
ठाण्याच्या युवा जिम्नॅस्ट संयुक्ता काळेने पहिल्यांदाच खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत सहभाग घेतला. या पदार्पणाच्या स्पर्धेतच तिला सर्वाेत्तम कामगिरीतून विक्रमाला गवसणी घालता आली. तिने रिदमिक जिम्नॅस्टिकच्या पाचही प्रकारात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.

अॅथलेटिक्स : अनिकेतला सुवर्णपदक
अॅथलेटिक्समध्ये अनिकेत मानेने सुवर्णपदक पटकावले. त्याने उंच उडीत हे सोनेरी यश संपादन केले. त्याने २.०७ मीटर उडी घेत सुवर्णपदक पटकावले. आर्यन पाटीलने (उत्तेखोल, रायगड) याच प्रकारात (२.०४ मी.) रौप्य जिंकले. ४ बाय १०० मी.रिलेमध्ये दिग्विजय चौघुले, सार्थक शेलार, आर्यन कदम व आकाश सिंग यांच्या संघानेही सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे टीमला या गटात आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले.

कुस्ती : नरसिंगला सुवर्णपदक :
महाराष्ट्र संघाकडून कोल्हापूरच्या नरसिंग पाटीलने हरियाणातील कुस्तीचा आखाडा गाजवला. त्याने मंगळवारी ५१ किलो वजन गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले. याच गटात रोेहित पाटीलला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटाच्या सुवर्णपदकासाठी रोहित आणि नरसिंग यांच्यात फायनल रंगली होती. यात बाजी मारून नरसिंगने सुवर्णपदक आपल्या नावे केले.
मुलींमध्ये ४९ किलो गटात अहिल्या शिंदेने कांस्यपदक जिंकले. ६५ किलो फ्रीस्टाइलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलने सुवर्णपदक उंचावले. ७१ किलो गटात संकेत पाटीलने (कोल्हापूर) कांस्यची कमाई केली.

आैरंगाबादच्या रिद्धीला राैप्य; यंदाच्या स्पर्धेत दुसरे पदक पटकावले
आैरंगाबादच्या रिद्धी हत्तेकरने पदकाची लय कायम ठेवली. यासह तिने चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत दुसरे पदक आपल्या नावे केले. तिने यंदाच्या स्पर्धेत मंगळवारी राैप्यपदकाचा बहुमान पटकावला. तिने जिम्नॅस्टिकच्या बॅलेन्सिग बीम प्रकारामध्ये दुसरे स्थान गाठले. तिने सोमवारी याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. यासह आता तिच्या नावे खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये आतापर्यंतचे पाचवे पदक ठरले. तिची या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. तिने सोमवारी जिम्नॅस्टिकमध्ये महाराष्ट्राला पदकाचे खाते उघडून दिले. यासह महाराष्ट्र संघाला या खेळ प्रकारात आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले.

रिलेत साक्षीला सुवर्ण; १०० मी. मध्ये सहाव्या स्थानी
महाराष्ट्राचा महिला संघ रिले गटात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यामध्ये सुदेष्णासह अवंतिका, साक्षी चव्हाण व संजयाने सर्वाेत्तम कामगिरी केली. यासह महाराष्ट्राचा महिला संघ चॅम्पियन ठरला. यासह आैरंगाबादच्या साक्षीला सुवर्णपदकाने गाैरवण्यात आले. तिने १०० मीटर धावण्याच्या गटातही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तिला या गटात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने १२.४१ सेंकदांत हे अंतर गाठले.

बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीची सुवर्ण कामगिरी; संजीवचा केला पराभव
महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने बॅटमिंटनमध्ये तामिळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवून सुवर्णपदकास गवसणी घातली. पहिला गेम त्याने २१ विरुद्ध १५ असा तर दुसरा गेम २२ विरुद्ध २० या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या तालिकेत सुवर्णपदकांच्या संख्येत भर पडली आहे. दर्शनच्या आक्रमक फटक्यांचा ऋत्विकने तितक्याच लीलया प्रतिकार केला. पहिला गेम हरल्यानंतर त्याने दुसऱ्या गेममध्ये आघाडी घेतली होती. परंतु दर्शनने त्याचा प्रतिकार भेदत सुवर्णपदक पटकावले. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दर्शनने दोन गुण घेऊन आघाडी घेत खाते उघडले. ऋत्विकशी तीन-तीन गुणांची बरोबरी झाली.

बातम्या आणखी आहेत...