आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेलो इंडिया यूथ गेम्स:महाराष्ट्राला विक्रमी 9 सुवर्णांसह 17 पदके; रिद्धीला कांस्य

पंचकुलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्र संघाने आपले निर्विवाद वर्चस्व गाजवत चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये एकाच दिवशी विक्रमी १५ पदकांचा बहुमान पटकावला. यामध्ये नऊ सुवर्णांसह तीन रौप्य व पाच कांस्यपदकाचा समावेश आहे. औरंगाबादच्या रिद्धी हत्तेकरने महिला आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकच्या आॅल राऊंडमध्ये कांस्यपदक जिंकले. या खेळ प्रकाराच्या पुरुष गटात मनेष गाढवेने कांस्य पटकावले. सांगलीच्या काजल सरगरने सकाळच्या पहिल्याच सत्रात वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. तिने पदार्पणात चॅम्पियनचा पराक्रम गाजवला. याच खेळ प्रकारामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदक विजेत्या हर्षदाने सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राला दिवसभरात एकूण १७ पदकांची कमाई करता आली. यामध्ये योगामध्ये पाच, वेटलिफ्टिंगमध्ये तीन आणि सायकलिंगमधील एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. महाराष्ट्राला पदार्पणात योगा खेळ प्रकारात पाच सुवर्णपदकांचा बहुमान मिळाला. वेटलिफ्टिंगमध्येही दोन मुली व एका मुलाने सुवर्ण मिळवले. सायकलिंगमध्ये सुवर्ण कामगिरी झाली. याशिवाय स्पर्धेत योगा (१), सायकलिंग (२) व कुस्तीत (१) अशी चार रौप्यपदके तर दोन कुस्तीत कांस्यपदके मुलींनी जिंकून दिली.

योगात महाराष्ट्राचा दबदबा; पाच सुवर्णांसह १ रौप्य
यंदा चौथ्या सत्रापासून योगाचा खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या योगपटूंनी पदार्पणात सोनेरी यशाचा पल्ला गाठला. यात संगमनेरच्या सुमीत बंडालेने सुवर्णपदकाने योगात खाते उघडले. तो पारंपारिक योगामध्ये चॅॅम्पियन ठरला. त्यापाठाेपाठ आर्टिस्टिक पीअरमध्ये वैदेही मयेकर व युगांका राजम (सुवर्ण), आर्टिस्टिक पीअरमध्ये (मुले) आर्यन खरात व निबोध पाटील (सुवर्ण), रिदमिक योगा - नानक अभंग व अंश मयेकर (सुवर्ण), मुली - स्वरा गुजर व गीता शिंदे (सुवर्ण) यांनी सुवर्ण जिंकले. त्यापठाेपाठ महिला गटाच्या पारंपरिक योगामध्ये तन्वी रेडीज रौप्यपदकाचा मानकरी ठरली.

संज्ञा चॅम्पियन : सायकलिंगमध्ये टाइम ट्रायलमध्ये संज्ञा कोकाटेने चॅम्पियनचा बहुमान पटकावला. तिने स्पर्धेत पदकाचा डबल धमाका उडवला. तिने टीम स्प्रिंटमध्ये रौप्य जिंकले. स्क्रॅच रेसमध्ये पूजा दानोळेस (रौप्य), टीम स्प्रिंटमध्ये अदिती डोंगरे, पूजा दानोळे व संज्ञा कोकाटे रौप्यपदकाचे मानकरी ठरले.धनश्रीला

कांस्यपदक : राष्ट्रीय कुस्तीपटू धनश्री फंडने ५७ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. तसेच काेल्हापूरची गाैरी पाटील ही ४६ किलो वजन गटात कांस्यपदकाची मानकरी ठरली. प्रगती गायकवाडने ५७ किलो वजनगटात रौप्यपदकावर नाव कोरले. तिचा फायनलमध्ये पराभव झाला.

काजलचा प्रेरणादायी प्रवास; पदार्पणात चॅम्पियन
सांगलीच्या काजल सरगरचा सोनेरी यशाचा पल्ला हा देशभरातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरला. वडिलांच्या चहाच्या टपरीवरील श्रमाचे मोल जाणून तिने पदार्पणात खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. तिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले. या खेळ प्रकारात ५५ किलोमध्ये मुकुंद आहेर आणि ४५ किलो वजनगटात हर्षदा गरुड चॅम्पियन ठरले. युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील हर्षदाने गत महिन्यात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर तिने या स्पर्धेतही पदक जिंकले. तिने औरंगाबादच्या साईत वेटलिफ्टिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...