आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगली शहरात चहाची टपरी लावत येणाऱ्या पैशातून मुलीच्या डायटवर खर्च करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला सोनेरी यशाचा मुलामा देण्याचे लक्षवेधी काम वेटलिफ्टर काजल सरगरने केले. सांगलीच्या या युवा वेटलिफ्टरने पंचकूला येथे आयोजित चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत रविवारी चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. याच सोनेरी यशाला उजाळा देताना सुमित बंडाळेने योगा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.
खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राने आज सुवर्ण कामगिरी केली. वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्ण पदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. वेटलिफ्टिंगमध्ये काजल सरगरने सुवर्ण कामगिरी महाराष्ट्रासाठी शुभदायी ठरली. ती मूळ सांगलीची कन्या आहे. काजलने ४० किलो वजनगटात हे नैपुण्य दाखवले. या गटात तिने ११३ किलो वजन उचलले. स्नॅच या प्रकारात ५० आणि क्लिन अँड जर्क प्रकारात ६३ किलो वजन उचलले.
काजलचा भाऊ संकेत सरगर हाही खेळाडू आहे. तो सध्या इंडिया कॅम्पमध्ये आहे. कॉमनवेल्थ गेमसाठी त्याची निवड झाली आहे. ती मयूर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या स्पर्धेत तिला प्रशिक्षक उज्ज्वला माने व गीता सिंहासने यांचे मार्गदर्शन लाभले.
देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास
काजल ही सांगलीच्या संजयनगर भागातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांची चहाची टपरी आहे. प्रतिकूल परिस्थितीत सराव करून तिने हे यश मिळवले आहे. महाराष्ट्र सरकारने सुवर्ण पदकासाठी जाहीर केलेले तीन लाख रूपये माझ्यासाठी अनमोल आहेत. त्या पैशांचा वापर माझ्या डाएटसाठी होईल. या यशाने आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे महाराष्ट्र, देशासाठी आणखी पदक मिळवून द्यायची आहेत, अशी प्रतिक्रिया काजल सरगरने पदकानंतर दिली.
योगामध्ये 3 सुवर्ण
खेलो इंडीया स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याला पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्ण पदक, आर्यन खरात व निबोध पाटील यांना अर्टिस्टिक पेअरमध्ये सुवर्ण पदक तर वैदेही मयेकर व युगांका राजम यांना अर्टिस्टिक योगासन प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळाले. अशी एकूण तीन सुवर्ण पदके योगासन प्रकारामध्ये पटकावली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.