आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Nagpur's 20 year old Badminton Player Malvika Wins Over Saina Nehwal | Marathi News

दिव्य मराठी विशेष:मुलीच्या जिद्दीला मिळाली डॉक्टर असलेल्या आईच्या प्रेरणेची जोड, नागपूरची 20 वर्षीय बॅडमिंटनपटू मालविकाचा सायनावर विजय

भोपाळ / शेखर झाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायनाला हरवणारी दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली मालविका, याआधी सिंधूने हरवले होते

नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडने इंडिया ओपनच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये भारतीय बॅडमिंटनची सर्वात मोठी खेळाडू आणि ऑलिम्पिक विजेत्या सायना नेहवालला (३१) सलग गेममध्ये ३४ मिनिटांत हरवून विक्रम केला आहे. सायनाने २०१० मध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिला पराभूत करणारी मालविका दुसरी भारतीय खेळाडू आहे, त्यामुळेही हा विजय महत्त्वाचा आहे. याआधी २०१७ मध्ये पी. व्ही. सिंधूने सायनाला पराभूत केले होते. या विक्रमात मालविकाच्या मेहनतीसोबत तिची आई डॉ. तृप्ती बनसोड यांचा त्याग आणि प्रशिक्षक संजय मिश्रा यांच्या प्रशिक्षणाचे सर्वात मोठे योगदान आहे.

डेंटिस्ट डॉ. तृप्ती यांनी मुलीच्या प्रशिक्षणासाठी फक्त घरच नव्हे तर डॉक्टरचा पेशाही सोडला. मालविका रायपूरमध्ये भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय मिश्रांकडे प्रशिक्षण घेते. मुलीच्या सरावादरम्यान तृप्ती रोज ६ ते ९ तास बॅडमिंटन हॉलमध्ये बसतात. मुलीला खेळात मदत करण्यासाठी तृप्ती यांनी डेंटिस्टचे (बीडीएस) शिक्षण घेतल्यानंतर स्पोर्ट‌्स सायन्समध्ये मास्टर्सची पदवी घेतली. मालविकाचे वडील डॉ. प्रबोध बनसोडही नागपूरमध्ये डेंटिस्ट आहेत. तृप्ती सांगतात,‘मालविकाने कनिष्ठ गटात अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. या काळात संजय मिश्रा मालविकाचे प्रशिक्षक होते. २०१८ मध्ये सीनियर झाल्यानंतर मालविका त्यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ शकत नव्हती, कारण संजय हे रायपूरचे आहेत. तिच्या प्रशिक्षणासाठी मी २०१६ मध्ये तिच्यासोबत रायपूरला शिफ्ट झाले. मालविकाने २०११ पासून बॅडमिंटन खेळणे सुरू केले. मी जास्तीत जास्त काळ तिच्यासोबत असते. माझ्या या त्यागामुळे मालविकाने देशाला पदक मिळवून दिले तर माझ्यासाठी त्यापेक्षा मोठे काहीही असणार नाही.’ आता क्वार्टर फायनलमध्ये मालविकाची लढत आकर्षी कश्यपशी होईल.

स्टार खेळाडू समोर असल्याचा दबाव घेऊन मालविका कोर्टवर उतरली नाही
प्रशिक्षक संजय मिश्रा म्हणाले, सायना समोर असल्याने या सामन्याच्या आधी मालविकाही दबावात होती. दबाव घेऊन कोर्टवर जाऊ नको, एवढेच मी तिला म्हटले होते. मालविकाने हीच रणनीती अवलंबली आणि चांगल्या व्यूहरचना करत खेळली. मालविकाने दीर्घ रॅलीचा खेळ केला, शटल कोर्टवर ठेवले आणि निगेटिव्ह गुण टाळले. त्यामु‌ळेच ती सायनाला हरवू शकली. ही मोठी कामगिरी आहे.

मी सायना नेहवालला पाहतच बॅडमिंटन खेळणे सुरू केले होते. ती माझी आदर्श आहे.- मालविका बनसोड