आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Neeraj Chopra Said That While Sleeping At Night, He Was Adamant That His National Anthem Should Be Played On The Field Tomorrow

भारतमातेचा सुवर्ण शृंगार:नीरज चोप्राने सांगितले, रात्री झोपताना मनात जिद्द होती की उद्या मैदानावर आपले राष्ट्रगीत व्हायलाच हवे

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 121 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच नीरजने मिळवून दिले ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूच्या रौप्यपदकाने सुरू झालेला भारताचा प्रवास सुवर्णपदकावर थांबला. २३ वर्षीय नीरज चोप्राने शनिवारी भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. नीरजने ८७.५८ मी. भाला फेकून ही कामगिरी केली. १२५ वर्षांच्या इतिहासात ॲथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. लष्करात सुभेदार असलेल्या नीरजच्या या यशाबद्दल हरियाणाने त्याला ६ कोटी रुपये, ए ग्रेड नोकरी देण्याची घोषणा केली. पंजाब सरकारने २ कोटी, बीसीसीआय व चेन्नई सुपर किंग्जने १-१ कोटी बक्षीस जाहीर केले.

बजरंगने जिंकले कांस्य
दरम्यान, बजरंग पुनियानेही पुरुष फ्रीस्टाइल (६५ किग्रॅ) कुस्तीत कांस्यपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

नीरज चोप्राने सांगितले, रात्री झोपताना मनात जिद्द होती की उद्या मैदानावर आपले राष्ट्रगीत व्हायलाच हवे
आदल्या रात्री जेव्हा झोपलो तेव्हा मनात एकच विचार होता की उद्या मैदानावर राष्ट्रगीत गाजले पाहिजे. पात्रताफेरीत अव्वल आल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला होता. म्हणूनच अंतिम लढतीत दबाव नव्हता. एकच विचार होता, सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. पहिला थ्रो ८७ मीटरहून अधिक गेला तेव्हा मनात अधिक हिंमत आली. दुसऱ्या थ्रोनंतर तर स्पष्ट दिसू लागले की आता ऑलिम्पिक पदक आपल्या नजीक आले आहे. तो आनंद व्यक्त करण्यासाठीच मी हात उंचावले. ॲथलेटिक्समध्ये पदक मिळवण्याचे जे स्वप्न मिल्खासिंग आणि पी. टी. उषा यांनी पाहिले होते ते आज पूर्ण झाले. मिल्खासिंग आज या जगात नाहीत, परंतु आता तेही आनंदी झाले असतील. हे पदक त्यांनाच समर्पित आहे. कुटुंबाचा त्याग आणि प्रशिक्षकांची मेहनत याशिवाय काहीच शक्य नव्हते. कित्येक महिने मी घरीच गेलो नव्हतो. हे इतके सोपे नसते. जर्मनीचा दिग्गज थ्रोअर जोहन्स वेटरचे आव्हान माझ्यासाठी प्रेरणा ठरली. तो म्हणाला होता, की मी उत्तम कामगिरी करू शकतो, परंतु त्याला (मला) पराभूत करू शकत नाही. तो महान खेळाडू आहे. परंतु, मी त्याला थ्रोमधून प्रत्युत्तर दिले.

एक्स्पर्ट व्ह्यू : ही दबावाची रणनीती हाेती.../ बहादूरसिंग, माजी ॲथलेटिक्स प्रशिक्षक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट््स, पतियाळा
नीरजने पात्रता फेरी पार केली तेव्हाच रणनीती आखली. सिंगल थ्रोमध्ये पात्र झाला तेव्हापासूनच विरोधकांवर दबाव होता. हीच रणनीती त्याने कायम ठेवली. नीरजची सरळ योजना होती की कोणताही दबाव येऊ न देता प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणायचा. पहिला थ्रो ८७ मीटरहून अधिक फेकत त्याने आव्हान दिले. त्यामुळे दबाव वाढला. प्रतिस्पर्ध्यांनी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही.

नीरजचे गुरू पण महान : नीरजचे प्रशिक्षक उवे हॉन एक महान भालाफेकपटू होते. जर्मनीचे उवे यांनी १०४.८ मी. भालाफेकीचा विक्रम केला आहे. परंतु ते कधीही ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकू शकले नाहीत.

पदक मिल्खा यांना समर्पित : गोल्डन बॉय नीरज
ॲथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यापूर्वी १९००च्या पॅरिक ऑलिम्पिकमध्ये नॉरमन रिचर्डने ब्रिटिश इंडियाच्या वतीने खेळताना ॲथलेटिक्समध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. नीरज म्हणाला, हे पदक मिल्खांना समर्पित आहे.

13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये गाजले जन-गण-मन...
अभिनव बिंद्राने २००८ मध्ये नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते. आता नीरजने ही कामगिरी केली. म्हणजे, हॉकी वगळता १२५ वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात पोडियमवर फक्त दुसऱ्यांदाच “जन-गण-मन...’ धून वाजली.

या ऑलिम्पिकमध्ये भारताची एकूण ७ पदके
भारत १९०० मध्ये प्रथमच ऑलिम्पिकमध्ये उतरला. त्यानंतर ११२ वर्षांनी म्हणजे २०१२ मध्ये सर्वाधिक ६ पदके जिंकली. त्यापूर्वी ही संख्या ३ पदकांच्या पुढे जाऊ शकली नव्हती. आता टोकियोत ७ पदके जिंकली.

यशाची महत्त्वाकांक्षा तुमची झोप उडवते, परिश्रमांशिवाय काहीच मनाला रुचत नाही, प्रचंड कष्ट घेऊनही जेव्हा थकवा येत नाही, तेव्हा ओळखा की नवा इतिहास घडणार आहे. - नीरज चोप्रा (आशियाई स्पर्धा 2017 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर)

बातम्या आणखी आहेत...