आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफॉर्मात असलेल्या जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिसने नव्या विक्रमासह चौथ्या सत्राच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला. तिने शनिवारी महिलांच्या २०० मीटर मिडलेमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय आकांक्षा निठुरेने टेनिसमध्ये सुवर्णपदकाची नोंद केली. त्यापाठोपाठ दिया चितळे व स्वस्तिका घोषने टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे महाराष्ट्र संघाने आता एकूण ३७ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली.
संघाने शनिवारी तीन सुवर्ण, ४ रौप्य तर ५ कांस्यपदके जिंकली. त्यामुळे गत चॅम्पियन महाराष्ट्राच्या नावे आत ९८ पदकांची नोंद झाली. यजमान हरियाणा संघ १०७ पदकांसह दुसऱ्या स्थानावर अाहे. महाराष्ट्राचा सिद्धेश पाटील हा रोड सायकलिंगमध्ये मास स्टार्ट प्रकारात रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तो पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू आहे. तसेच मल्लखांबमध्ये वैयक्तिक प्रकारात प्रणाली मोरेने कांस्यपदक पटकावले.
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष खो-खो संघांनी उपांत्य फेरी गाठली. पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगालचा पराभव केला. महिला संघाने पंजाबवर मात केली.
अपेक्षाकडून किनिषाचा विक्रम ब्रेक
जलतरणमध्ये अपेक्षा फर्नांडिसने २०० मीटरमध्ये विक्रम प्रस्थापित केला. तिने २ मि. २५.१० से. अशी विक्रमी वेळ नोंदवली. यापूर्वी किनिषा गुप्ताचा २.२५.८० असा विक्रम होता. ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नांडिस, संजिती साहा, आन्या वाला यांचा संघ होता. पलक जोशीने २००मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य (२.२७.०१), रिषभ दासने २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य (२.१२) पटकावले.
आकांक्षाला सुवर्ण; वैष्णवीला कांस्यपदक
महाराष्ट्राची युवा टेनिसपटू आकांक्षा निठुरे महिला एकेरीच्या गटात चॅम्पियन ठरली. तिने फायनलमध्ये कर्नाटकच्या सुहिथा मयूरीचा पराभव केला. तिने रंगतदार अंतिम सामना ६-७, ७-६, ६-४ ने जिंकला. यासह ती या गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या गटात सकाळीच महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरने (पुणे) कांस्यपदक पटकावले. कडाक्याच्या उन्हात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरेने कर्नाटकच्या सुहिथा मयूरीचा ६-७, ७-६, ६-४) ने पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
टेबल टेनिस : दिया-स्वस्तिकाला किताब
आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू दिया चितळेने आपली सहकारी स्वस्तिका घोषसोबत टेबल टेनिसच्या महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या या जोडीने फायनलमध्ये यजमान हरियाणाच्या प्रिथोकी - सुहाना सैनीला घरच्या मैदानावर धूळ चारली. दिया-स्वस्तिकाने १४-१२, ११-०९, ११-६ ने अंतिम सामना जिंकला. या सोनेरी यशाला गवसणी घालणारी दिया आता आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.