आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्म ः १४ सप्टेंबर १९९० कुटुंब ः वडील अशोक इंजिनिअर आहेत, आईचे नाव स्वप्नादेवी, पत्नी देविशा डान्स कोच आहे. शिक्षण ः केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण, मुंबईच्या पिल्लई कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेतले. मालमत्ता ः ३० कोटी रु.
सूर्यकुमार यादव २०२२ च्या टी २० विश्वचषकातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चर्चेत आहे. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सूर्यकुमार एका कॅलेंडर वर्षात एक हजार टी २० आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. सूर्या वयाच्या १० व्या वर्षापासून क्रिकेटमध्ये सक्रिय आहे, परंतु त्याने २०१० पासून भारतीय देशांतर्गत क्रिकेटचा प्रवास सुरू केला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी तब्बल ११ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. सर्वप्रथम सूर्यकुमारने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-१५, अंडर-१७ स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि लवकरच त्याला मुंबई संघात स्थान मिळाले. सूर्याने ६ एप्रिल २०१२ रोजी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. वास्तविक सचिन तेंडुलकर हा सामना खेळू शकला नाही, त्यामुळेच त्याच्या जागी तरुण सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली. यानंतर २०१४ च्या आयपीएलमध्ये सूर्याला कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतले आणि तो ४ वर्षे कोलकातासोबत राहिला. सूर्या भारताच्या २३ वर्षांखालील संघाचा कर्णधारही होता. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सूर्या नेहमीच टीम इंडियामध्ये आपला दावा मांडत राहिला आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर सूर्या २०२१ मध्ये ३१ वर्षांचा झाला तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
वयाच्या ३१ व्या वर्षी १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण. आतापर्यंत ४० टी-२० व १३ वनडे सामने खेळले.
सुरुवात ः बनारसच्या गल्ल्यांमध्ये काकांकडून क्रिकेटचे धडे घेतले सूर्यकुमारचा जन्म मुंबईत झाला. त्याने शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयात घेतले आणि पिल्लई महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी प्राप्त केली. सूर्या लहानपणापासूनच खेळात सक्रिय आहे. त्याला क्रिकेट व बॅडमिंटनमध्ये रस होता आणि शालेय जीवनात सूर्याने बॅडमिंटनमध्ये ज्युनियर विजेतेपदही पटकावले आहे. पण, त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या कारकिर्दीसाठी क्रिकेट किंवा बॅडमिंटन यापैकी एक निवडण्यास सांगितले आणि सूर्याने क्रिकेटची निवड केली. वयाच्या १० व्या वर्षी शाळेच्या संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. बनारसच्या गल्लीबोळात त्याला क्रिकेट शिकवणारे काका विनोद यादव यांच्यामुळे क्रिकेटची आवड निर्माण झाली.
कुटुंब ः पत्नीला म्हणतो कोच, कारण तिने तंदुरुस्त राहायला शिकवले सूर्याचे कुटुंब मूळचे बनारसचे आहे. सूर्या १० वर्षांचा असताना त्याचे कुटुंब बनारसमधून मुंबईत स्थायिक झाले. वडील अशोककुमार यादव यांच्या नोकरीमुळे कुटुंबाला मुंबईत यावे लागले. वडील मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रात अभियंता आहेत. त्याचे आजोबा विक्रम यादव हे सीआरपीएफमध्ये इन्स्पेक्टर होते आणि त्यांना १९९१ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले होते. सूर्याच्या पत्नीचे नाव देविशा शेट्टी असून ती व्यवसायाने डान्स टीचर आहे. कॉलेजमध्ये असताना सूर्याची २०१० मध्ये देविशाशी मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केले. लग्नानंतरच सूर्यकुमारला यश मिळू लागले. कदाचित त्यामुळेच तो आपल्या पत्नीला आपला खरा प्रशिक्षक मानतो. क्रिकेट दौऱ्यापूर्वी देविशा सूर्याचा मोबाइल सोबत ठेवते, जेणेकरून तो फक्त खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल. त्याच्या फिटनेसमागेही देविशाची प्रेरणा आहे. लग्नापूर्वी त्याने आहाराकडे लक्ष दिले नाही. पत्नीने त्याला फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
रंजक ः टॅटूची आवड, गौतम गंभीरने ‘एसकेवाय’ शीर्षक दिले इतर क्रिकेटपटूंप्रमाणे सूर्यकुमारलाही टॅटूची आवड आहे. त्याच्या शरीरावर १० पेक्षा अधिक टॅटू आहेत, त्यात त्याच्या खांद्यावर कोरलेल्या त्याच्या पालकांच्या मोठ्या चित्राचा समावेश आहे. त्याने पत्नी देविशाच्या नावाचाही टॅटू काढला आहे. सूर्यकुमारलाही हायस्पीड लक्झरी कार आवडतात. त्यांच्याकडे कारचे उत्तम कलेक्शन आहे, त्यामध्ये मर्सिडीझपासून बीएमडब्ल्यू-ऑडीपर्यंतच्या महागड्या गाड्या आहेत. सूर्यकुमारने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला वडापाव, पावभाजी आणि रस्त्याच्या कडेला मिळणारे चायनीज पदार्थ विशेषतः ट्रिपल शेझवान राइस आवडतात. गौतम गंभीरने सूर्यकुमारला स्काय शीर्षक दिले आहे. खरं तर तो २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये होता तेव्हा कर्णधार गौतम गंभीर त्याला सरावाच्या वेळी स्काय म्हणत असे. तेव्हापासून त्याला स्काय ही पदवी मिळाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.