आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Physical Education Of 1200 Universities, 850 Colleges In The Country In Difficulty

काेराेनाचे संकट कायम:देशातील 1200 विद्यापीठे, 850 काॅलेजचे शारीरिक शिक्षण अडचणीत; एआययूचे वेट अँड वाॅच; ऑल इंडियासह क्रीडा महाेत्सवला यंदा ब्रेक

एकनाथ पाठक | आैरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे यंदाच्या सत्रातील क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर नाही; आयाेजनावर टांगती तलवार

काेराेनाच्या संकटामुळे मागील चार महिन्यांपासून जागतिक स्तरावरील स्पाेर्ट््स इव्हेंट पूर्णपणे बंद आहेत. हे अद्यापही पूर्वपदावर येण्यासाठीचे चित्र धूेसर आहे. महामारीचा वाढता धाेका लक्षात घेऊन अद्याप अखिल भारतीय विद्यापीठाने (एआययू) आंतरविद्यापीठ आणि इतर माेठ्या स्पर्धांच्या आयाेजनाबाबतचा काेणताही निर्णय घेतलेला नाही.एआययूची नजर केंद्र सरकारच्या निर्णयाकडे लागलेली आहे. याच वेट अँड वाॅचमुळे देशभरातील जवळपास १२०० विद्यापीठांच्या क्रीडा विभाग आणि ८५० पेक्षा अधिक शारीरिक शिक्षण महाविद्यालयांतील फिजिकल एज्युकेशन अडचणीत सापडले आहे. काेराेनाच्या भीतीमुळे याचा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय अद्याप घेतला गेला नाही. त्यामुळेच यंदा स्टेडियमपाठाेपाठ एज्युकेशनही लाॅक झालेले आहे. याच लाॅकमुळे यंदाच्या सत्रातील विविध खेळाडूंच्या आंतरविद्यापीठ ‘आॅल इंडिया’ आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या आंतरविद्यापीठ क्रीडा महाेत्सव आयाेजनाला ब्रेक लागणार आहे. पाच टक्के आरक्षणाच्या दृष्टीने या स्पर्धा महत्वाच्या आहेत.

तंदुरुस्ती हा आत्मा; शासनाच्या पुढाकाराची माेठी गरज
शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाचा शारीरिक तंदुरुस्ती हा आत्मा आहे. महामारीच्या या कालखंडात शारीरिक तंदुरुस्तीचे उपक्रम, अभ्यासक्रम हे प्रकर्षाने सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. युवक, विद्यार्थी शारीरिक तंदुरुस्ती राखून मानसिक स्वास्थ्य, निरामयता आणि रोगप्रतिकारक्षमता वाढीस लागून या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या लढ्यात यशस्वीपणे तोंड देण्यास तयार होईल. त्यामुळे आता शासनाने याबाबत परिस्थितीचा अंदाज घेऊन याेग्य प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

नाेव्हेंबरात शैक्षणिक सत्र सुरू हाेण्याची माेठी आशा!
देशभरामध्ये काेराेनाच्या महामारीचा धाेका अद्याप कायम आहे. मात्र, परिस्थितीचा याेग्य प्रकारे अंदाज घेऊन देशभरातील विद्यापीठांमध्ये नाेव्हेंबरपासून शारीरिक शिक्षणाच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात हाेण्याची आशा आहे. यासाठी क्रीडातज्ज्ञांकडून एआययू प्रतिक्रिया मागवून घेत आहे.

नियमांचे पालन व सावधगिरी हे खेळाडूंसाठी सक्तीचे
कोरोनामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच परिस्थितीचा विपरीत असा परिणाम यंदाच्या स्पाेर्ट‌्स इव्हेंटवर झाला आहे. खेळाडूंनी हा धाेका लक्षात घेऊन निश्चित नियमाचे काटेकाेरपणे पालन करावे. मैदानावर सराव आणि खेळताना सावधगिरी पाळावी, हेच खेळाडूंसाठी सक्तीचे आहे.

आॅनलाइन शिक्षणातून मिळणार माेठा पर्याय : साळंुखे
काेराेनाच्या महामारीमुळे यंदा जागतिक दर्जाच्या माेठ्या स्पर्धांच्या आयाेजनाला स्थगिती देण्यात आली. मागील चार महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय मैदानावरील अॅक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद आहे. भारतासह महाराष्ट्रातही अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता आॅनलाइनच्या माध्यमातून शिक्षण आणि काेचिंग देण्याचा पर्याय महत्त्वाचा ठरू शकताे. याच्या आधारे सध्या यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात करता येईल. यासाठी यातील सकारात्मक बाजू लक्षात घेतली जावी, असे मत आॅल इंडिया युनिव्हर्सिटीचे माजी अध्यक्ष साळंुखे यांनी मांडले.

क्रीडा महाेत्सव : राजभवनच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
यंदा महाराष्ट्रातील आंतरविद्यापीठांचा क्रीडा महाेत्सव अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हाेणार आहे. मात्र, या विद्यापीठाचे हे यजमानपद अडचणीत सापडले आहे. सध्या महामारीबाबतची परिस्थिती गंभीर आहे. अमरावतीमध्येही काेराेनाचा धाेका वेगाने वाढत आहे. त्यामुळे नाेव्हेंबर-डिसेंबरमधील ही स्पर्धा आयाेजित करण्याचे आव्हान विद्यापीठासमाेर आहे. त्यामुळे या विद्यापीठाची नजर राजभवनाच्या निर्णयाकडे लागलेली आहे. जवळपास अद्याप पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तरीही आयाेजनाची तयारी लवकरच करावी लागेल.

सीईटी आॅनलाइन; ५० गुणांचे फील्ड प्रॅक्टिकल असते सक्तीचे
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, झारखंड व गुजरात विद्यापीठातील क्रीडा विभाग व अंतर्गत शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्रवेशसाठी सीईटी घेतली जाते. ही बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांना अनिवार्य असते. महाराष्ट्रामध्ये यासाठी ५० गुणांची आॅनलाइन सीइटी घेतली जाते. याशिवाय उर्वरित ५० गुणांसाठी फील्ड प्रॅक्टिकल सक्तीचे असते. यात पाच टेस्टसाठी ५० गुण असतात. यात प्रत्येक टेस्टला १० गुण दिले जातात.

हे ठरेल अधिक प्रभावी
पहिले सेमिस्टर
: जुलै ते ऑक्टोबर हे रद्द करून नोव्हेंबरपासून सेमिस्टर सुरू करावे. एप्रिलपर्यंत हे सेमिस्टर घ्यावे. मेमध्ये परीक्षा.
दुसरे सेमिस्टर : जूनपासून दुसरे सेमिस्टर. ऑक्टोबरमध्ये परीक्षा
तिसरे सेमिस्टर : नोव्हेंबरपासून व पुन्हा
चौथे सेमिस्टर : जून ते ऑक्टोबर या पद्धतीने नियोजन करावे.

शारीरिक शिक्षणाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये (बी.पी.एड. आणि एम.पी.एड.) मैदानी प्रॅक्टिकलला महत्त्वाचे स्थान आहे. याचा अभ्यासक्रमच यावर अधिकाधिक आधारे आहे. यात मैदानी प्रॅक्टिकलचे प्रमाण हे ६० टक्के आहे. तसेच ४० टक्के अभ्यास हा थिअरीचा आहे. त्यामुळे या दाेन्ही अभ्यासक्रमांसाठी मैदानावरील वर्कआऊट महत्त्वाचे मानले जाते. अशात आता काेराेनामुळे मैदानावरील खेळ आणि वर्कआऊट पूेर्णपणे बंद आहे. त्यामुळे अद्याप हे सर्व काही खुले हाेण्याचाही निश्चित असा काेणताही कालावधी ठरलेला नाही. त्यामुळेच यंदा हा अभ्यासक्रम अडचणीत सापडला आहे. याशिवाय स्पर्धांचे आयाेजनही संकटात आहे.

काय म्हणतात तज्ञ : क्रीडा क्षेत्राला चालना मिळण्यासाठी खेळाडूंचा मैदानावर वावर महत्त्वाचा; काेराेनामुळे सराव आणि स्पर्धांना ब्रेक, शासन निर्णयानेच हाेणार आयाेजन
कौशल्य ऑनलाइन शिकवताना यापुढे अडचणींचे

महामारीचा सामना करताना अनेक अडचणी जाणवत आहेत. ऑनलाइन शिक्षण व तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शिक्षण प्रणालीसाठी तज्ञ मंडळी सरसावली आहेत. शारीरिक शिक्षणातील कारकक्षमताे व शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठीचे व्यायाम प्रकार ज्याला कमीत कमी साहित्य आवश्यक आहे, वा कमी जागेमध्ये व्यायाम प्रकार ऑनलाइन पद्धतीवर करून घेतले जाऊ शकतात. परंतु विविध खेळांचे कौशल्य ज्यामध्ये विविध साहित्य व साधनांची आवश्यकता असते, अशी कौशल्ये ऑनलाइन शिकवताना यापुढे अडचणीचे ठरणार आहे. बीपीएड व एमपीएड प्रवेशासाठी सैद्धांतिक पन्नास मार्काची ऑनलाइन परीक्षा तर, प्रात्यक्षिक प्रत्यक्ष मैदानावर जाऊन द्यावे लागते. - डॉ. मकरंद जोशी सहयोगी प्राध्यापक, मसांमचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, औरंगाबाद.

गंभीर परिस्थितीमुळे निर्णय घेणे अधिक आव्हानात्मक
सध्याच्या परिस्थितीत देशात क्रीडा, शारीरिक शिक्षण, योग व शारीरिक स्वास्थ्य असे चार प्रवाह वाहताहेत. कोविडमुळे जगात स्पर्धा आयाेजनाबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याने क्रीडाक्षेत्र त्यापासून वंचित नाही. महाविद्यालयीन क्रीडा व शारीरिक शिक्षणाचा विचार केल्यास आंतरविद्यापीठांच्या आयोजनावरही हे सावट पसरले आहे. एआययू ही केंद्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष ठेवून आहे. प्रतिवर्षी एप्रिल, मे महिन्यात प्राप्त होणारे स्पर्धांचे वेळापत्रक अद्याप तयार नाही. या वेळापत्रकावर आंतर व महाविद्यालयीन सराव शिबिरे अवलंबून असतात. - डाॅ. अविनाश असनारे, संचालक, क्रीडा व शा.शि., संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

शासन निर्देशानुसार स्पर्धा आयाेजनातून खेळाडूंना न्याय
महाराष्ट्रासह देशभरामध्ये सध्याच्या परिस्थितीमुळे क्रीडा स्पर्धांचे आयाेजन करणे आव्हानात्मक आहे. मात्र, शासनाच्या निर्देशांनुसारच स्पर्धा आयाेजनातून खेळाडूंना याेग्य प्रकारचा न्याय देण्यात येईल. देशभरामध्ये काेराेनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा संकटात सावधगिरीतूनच सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच गुणवंत खेळाडूंचे काेणत्याही प्रकारचे नुकसान हाेणार नाही. याशिवाय देशासह महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या परिस्थितीचा आढावा घेऊन शासन निर्णय घेईल. - डाॅ. दीपक माने, क्रीडा संचालक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे