आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्राच्या ‘एकलव्या’चा ऑलिम्पिक प्रवेशाचा लक्ष्यभेद! शेतमुजराचा मुलगा करणार टोकियोत देशाचे प्रतिनिधित्व

अमरावती / वैभव चिंचाळकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला महाराष्ट्राचा पहिला धनुर्धर

भूमिहीन शेतमजुराचा पुत्र असलेल्या धनुर्धर प्रवीण जाधव याने खडतर परिस्थितीत एकलव्यासारखी अखंड साधना करून यंदाच्या टाेकियाे आॅलिम्पिकमधील प्रवेशाचे लक्ष्य अचूक भेदले आहे. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला ताे महाराष्ट्राचा पहिला धनुर्धर ठरला आहे. आता तेथून पदक आणण्याच्या इराद्याने तो कसून मेहनत घेत आहे.

पुण्यातील आर्मी स्पोर्ट््स इन्स्टिट्यूट येथे ६ ते ८ मार्चदरम्यान झालेल्या ऑलिम्पिक निवड चाचणीत तीन वेळा देशाचे प्रतिनिधित्व करणारे अग्रणी धनुर्धर अतनू दास आणि तरुणदीप राॅय यांना त्याने मागे टाकले. ७० मी. प्रकारात आठ प्रयत्नांमध्ये एकूण २७२७ गुण मिळवून त्याने अव्वलस्थान पटकावले. दास आणि राॅय अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

प्रवीण हा सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील सरडे गावामधील भूमिहीन शेतमजूर रमेश जाधव यांचा मुलगा. त्याने २००६ ते २०११ या कालावधीत अमरावती येथील शासनाच्या धनुर्विद्या क्रीडा प्रबोधिनीत सरावाला सुरुवात केली. येथेच तो प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनात घडला. माजी भारतीय धनुर्धर आणि भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर यांचेही त्याला मार्गदर्शन िमळाले. प्रवीण २०११ मध्ये प्रबोधिनीतून पुण्याला गेला आणि नंतर २०१२ ते १७ या कालावधीत पुन्हा अमरावतीत डांगे यांच्याकडे प्रशिक्षणास आला.

पदकांचे पोते मिरवतेय तिरंदाजीतील श्रीमंती
प्रवीणने धनुर्विद्येत असंख्य पदके मिळवली आहेत. त्याचे कुटुंब नाल्याच्या काठावरील दोन खोल्यांच्या घरात राहते. त्याने मिळवलेली पदके त्याच्या वडिलांनी एका पोत्यात भरून ठेवली आहेत. जिथे धान्याने भरलेले पोते एक वेळ दिसणार नाही असे घर प्रवीणने मिळवलेल्या पदकांची अशी पोत्यातून ओसंडणारी श्रीमंती मिरवते आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या मुलाने किती मोठे यश मिळवलेय हे समजल्यावर वडिलांचे डोळे पाणावले. अगदी लहानपणापासून धनुर्विद्येच्या प्रेमाने झपाटलेला प्रवीण सरावामुळे त्यांच्यापासून अनेक वर्षे लांब राहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...